प्रार्थना सभा भरवा! आहे का उत्तर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2022   
Total Views |
 

miracle
 
 
 
 
१२ मे, २०२१ रोजी पोप फ्रान्सिस यांनी ‘प्रार्थनेची जादू’ यावर प्रवचन केले होते. त्यात त्यांनी श्रद्धाळूंना अर्जेंटिनामधील एक घटना सांगितली होती. त्यानुसार अर्जेंटिनामध्ये एक मुलगी खूप आजारी असते. तिचा पिता तिला शहरात रुग्णालयात दाखल करतो. त्याला आणि मुलीच्या आईला डॉक्टर सांगतात, “मुलीची प्रकृती अतिगंभीर आहे. आजची रात्र जगेल की, नाही सांगू शकत नाही.” श्रद्धाळू पिता अनेक तासांचा कठीण प्रवास करत ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ लुझान’ या चर्चमध्ये जाण्याचे ठरवतो. पण, चर्चमध्ये पोहोचेपर्यंत रात्रीचे १० वाजतात. चर्च बंद होते. हा पिता चर्चच्या बाहेर थांबतो. रात्रभर ‘अवर लेडी’ला प्रार्थना करतो. सकाळी पुन्हा मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात जातो. तिथे बाहेर त्याची पत्नी त्याची प्रतीक्षा करत उभी असते. मुलीचे काही बरेवाईट झाले असावे, असे त्याला वाटते. पण, ती सांगते, “आपली मुलगी बरी झाली. जादू झाली.” त्या पित्याला कळते की, जादू ‘अवर लेडी ऑफ लुझान’ची आहे, ही घटना सांगून पोप फ्रान्सिस यांनी येशूमसीची करूणा, प्रार्थनेतली जादू वगैरे वर्णनं केली होती. थोडक्यात, येशूच्या प्रार्थनेमध्ये जादू आहे, असे सांगण्याचा पोपच काय, पण जगभरातल्या सगळ्याच पादर-पाद्रींचा प्रयत्न असतो. जगभरात सगळ्याच धर्मांत श्रद्धाळू आहेत. पण, तरीही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा धुसर आहे. त्यातले अंतर जेव्हा केव्हा संपते, तेव्हा जे काही उरते, ते मानवतेच्या सारासार विवेकबुद्धीला आव्हान देण्यासारखेच असते.
 
 
 
असो. एकंदर पोप, चर्च यांच्या पार्श्वभूमीवर ‘प्रार्थनेची जादू’ याबद्दल अनेक गोष्टी श्रद्धेच्या नावावर खपवल्या जातात, हे नक्की! (सेव्हूेन मिरॅकल प्रेअर, २१ मिरॅकल प्रेयर, थ्री डेज मिरॅकल प्रेयर वगैरे वगैरे गुगलवर सर्च करू शकता) ‘प्रार्थनेची किमया’ वगैरे म्हणत आपल्याकडेही गल्लीबोळात, अशी शिबीरं होतातच. कोणतेही वैद्यकीय उपचार न करता आपण बरे होऊ, आपल्याला वेदनेतून मुक्ती मिळेल, म्हणून कितीतरी गरीब भोळेच नव्हे, तर सुशिक्षित, श्रीमंत लोकही या प्रार्थनासभांना जातात. एकदा दोनदा नव्हे, तर कधी ना कधी बरे होऊ म्हणून अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत जाणारेही पाहिलेले आहेत. गरिबांच्या वस्तीमध्ये त्यांच्या छोट्या छोट्या इच्छापूर्तींना हात घालत त्यातून धर्मांतर होताना पाहिले आहे. अर्थात, आज ‘धर्मांतर’ या मुद्द्यापेक्षा पोप फ्रान्सिस यांच्या चमत्काराबद्दल लिहायचे आहे. श्रद्धेत ताकद असतेच. पण, ती श्रद्धा झापडबंद नसावी. त्यानुसार पोप फ्रान्सिस यांच्या खात्यातल्या दोन चमत्कारांबद्दल पाहू.
 
 
 
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एक दहा महिन्यांची मुलगी होती. तिला ट्युमर होता. तिची आई क्रिस्टन मैसीऑनटियो खूप दुःखी होती. मुलगी बरी व्हावी म्हणून तिने खूप उपचार, प्रयत्न केले. पण, सारे व्यर्थ. तो दिवस उजाडला. जादू झाली जादू. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने मुलीला पोप फ्रान्सिस यांच्याकडे आशीर्वादासाठी नेले. पोप फ्रान्सिस यांनी आशीर्वादपर मुलीच्या ट्यूमरचे चुंबन घेतले. काय आश्चर्य!!! त्यानंतरच्या वैद्यकीय अहवालामध्ये ती मुलगी बरी झाली. दुसरी घटना गेल्यावर्षीची, दि. १७ नोव्हेंबरची. पोलो बोनविटा हा दहा वर्षांचा मुलगा खूप आजारी होता. त्याला ‘ब्रेन ट्यूमर’ होता. त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. तो स्वतःहून चालूही शकत नव्हता. इतका आजाराने बेजार झाला होता. पण, एका प्रार्थनासभेत तो पोप फ्रान्सिस यांना भेटला. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर तो बरा झाला, असे त्याच्या आईचे एल्सा मोराचे म्हणणे. अर्थात, ख्रिस्ती श्रद्धाळूंच्या मते हे असले चमत्कार म्हणजे येशूची दयाच असते. तर असो. अशा दोन जणांना पोप फ्रान्सिस यांनी असाध्य रोगातून बरे केले....
 
 
 
तर असे हे पोप फ्रान्सिस यांच्या ‘मिरॅकल’ जादूई प्रार्थनेबद्दल इतके लिहिले. कारण, त्यांची नुकतीच एक प्रार्थनासभा रद्द झाली. त्याआधी श्रद्धाळूंना आशीर्वाद देण्यासाठी पोप उपलब्ध होते. पण, पारंपरिकरित्या आशीर्वाद देताना ते थोडावेळच उभे राहिले आणि नंतर पटकन पुन्हा खुर्चीवर बसले. आपण आशीर्वाद देण्यासाठी उभे राहिलो नाही याचे कारण त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यांचा उजवा पाय दुखतो आहे. त्यामुळे ते जास्तवेळ उभे राहू शकत नाहीत. आता यावर प्रश्न हा आहे की, जगाला नुसत्या प्रार्थनेने, अगदी स्पर्शाने बरे करणारे पोपच नव्हे, तर जगभरात प्रार्थना सभा घेणारे त्यांचे पास्टर, फादर यांना सांगून प्रार्थनासभा घेऊन पोप त्यांच्या पायाचे दुखणे का बरे करत नाहीत? आहे का या प्रश्नाचे उत्तर?
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@