‘ऑक्सफर्ड ब्ल्यू’ अन् ‘मरंग गोमके’ (भाग-२)

    03-Apr-2022
Total Views |

munda
मागील भागात जयपाल सिंह मुंडा या वनवासींचे नेते आणि हॉकीमधील मेजर ध्यानचंद यांच्यासमवेत भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाचे कप्तानपदही भूषविलेल्या अपरिचित व्यक्तिमत्त्वाची आपण तोंडओळख करुन दिली. आजच्या भागात जाणून घेऊया, मुंडा यांनी वनवासी आरक्षणासाठी उभारलेला लोकसंघर्ष आणि एकूणच त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी...
ऑलिम्पिकनंतर १९२८ मध्ये जयपाल इंग्लंडला परतले. भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांनी त्यांचे उत्कृष्ट कप्तानी आणि संघाच्या विजयासाठी अभिनंदन केले. इरविनच्या विनंतीवरून जयपाल यांना पुन्हा ‘आयसीएस’ प्रबंधात सामील होण्यासाठी विचारले गेले, पण त्यांनी ते नाकारले. ते भारतात परतले आणि बहुराष्ट्रीय तेल कंपनी ‘बर्मा शेल’ येथे नोकरी स्वीकारली. त्या काळात एरवी बाकीच्यांना जेवढे वेतन मिळत असे त्याच्या कित्येक पटीने जास्त गलेलठ्ठ वेतन जयपाल सिंह यांना दिले जात असे. या सगळ्यात आफ्रिकेत काही काळ नोकरी करताना तेथील वनवासींचा अभ्यास करुन स्वदेशात प्रवास करत असताना त्यांना त्यांच्या वनवासी समाजबांधवांसाठी काहीतरी करावे, असे वाटू लागले. जयपाल सिंह मुंडा यांना समजून घेताना त्यांच्या विवाहाबाबतही आपण समजून घेऊ. समाजकारण चालू असताना एकीकडे जयपाल सिंह लग्नाच्या वयाचे झाले होते. घरचे व त्यांचा मित्रपरिवार जयपाल सिंह मुंडा यांच्या लग्नाच्या हालचाली करू लागले. त्यांचा स्वतःचा ओढा होता कला, क्रीडा व समाजकारणाकडे. मुलींशी गप्पा मारत बसणे, हसणे-खिदळणे असा त्यांचा पिंड कधीच नव्हता. लाजाळू होते ते. मुली त्यांच्यावर भाळायच्या, पण मुलींऐवजी समाजसेवेकडे ते गंभीरतेने बघत. दिल्लू नावाचा जयपाल मुंडा यांचा एक जीवश्च-कंठश्च मित्र होता. जयपाल मुंडा यांना भारतात परत बोलवण्यात ते आग्रही होते.
 
भारतासाठी काहीतरी करण्यासाठीही त्यांचे मैत्र होते. जयपाल मुंडा कोलकात्यात सुट्टीसाठी आलेले असताना दिल्लू यांचे धाकटे बंधू अनिल त्यांना एकदा भेटले. दार्जिलिंगला प्रवासासाठी ते मित्र-मित्र गेलेले असताना दिल्लू यांची मावसबहीण तारा बॅनर्जीही त्यांना भेटली. त्या भेटीत तारा बॅनर्जी या जयपाल मुंडांवर मोहीत झाल्या व प्रेमात पडल्या. त्या क्षणापर्यंत लाजाळू असलेले जयपाल मुंडा प्रेमप्रकरण, मुलींशी जवळीक वगैरेंपासून अलिप्त होते. तारा या सधन व प्रसिद्ध घरातल्या होत्या. बांगला आणि भारतातल्या समाजात तारा यांचे वडिल पी. के. मजुमदार आणि आई एग्नेस मजुमदार यांना मोलाचे स्थान होते. तारा यांचे आजोबा ब्योमेशचंद्र बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष होते. कस्टम मैदानावरील हॉकीच्या प्रदर्शनीय सामन्याच्यावेळी तारा-जयपाल यांनी एकमेकांसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. लगेचच एकमेकांच्या घरच्यांची रीतसर बोलणी झाली आणि ते ख्रिस्ती धर्माला अनुसरून एकमेकांच्या लग्नाच्या बेडीत अडकले.
तारा यांचे बड्या लोकांशी असलेले संबंध व सदान्कदा त्यांचे मोठ्या माणसांत उठणे-बसणे जयपाल यांच्या नोकरीतल्या गोर्‍या साहेबांना आवडत नसे. या नोकरीत जयपाल मुंडांचे त्यावरून अनेकदा खटके उडत, वादावादी होई. शेवटी ती नोकरी सोडून हे दाम्पत्य आपल्या एक वर्षाच्या मुलाला म्हणजे अमर याला घेऊन नवीन नोकरीत रुजू होण्यासाठी आफ्रिकेला गेले. आफ्रिकेत घाना येथे शिक्षकी पेशा स्वीकारुन तेथे काही काळ त्यांनी प्राध्यापकी केली. काही काळ युगांडामधेही त्यांनी रहिवास केला. आफ्रिकेत असताना तारा भारतात दार्जिलिंगला निघून गेल्या. त्यामुळे त्यांना करमेना, एकटेपणा त्यांना सहन होत नव्हता. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या जहाँआरा जयरत्नम या त्यांना मानसिक आधार देऊ लागल्या. भारतात परतल्यावर तारा मजुमदार यांच्याशी त्यांचे संबंध बिघडू लागले. खरंतर तारा मजुमदार यांना राजकारणात कोणत्याही प्रकारे रस नव्हता. तथापि, जयपाल मुंडांची तर राजकारणात जनजाती समाजासाठी कार्य करण्याची विलक्षण तळमळ होती. या कारणांवरुन दोघांचे पटेना. त्यांच्यातील दरी वाढू लागली. परिणामस्वरुप, १९५२ मध्ये तारा मजुमदार यांनी जयपाल सिंह यांच्याबरोबर रीतसर कायदेशीर घटस्फोट घेतला. आपल्या पोटच्या सीता, जोया आणि मुलगा अमर या तीन अपत्यांना घेऊन तारा भारत सोडून इंग्लंडला जाऊन राहू लागल्या. नंतर जयपाल सिंह यांचा दुसरा विवाह दि. ७ मे १९५२ रोजी जहाँआरा जयरत्नम यांच्याशी झाला. त्यांची ही दुसरी पत्नी जयपाल सिंह याच्याप्रमाणेच राजकारणात सक्रिय होती. जयंत आणि बिरसा हे पुत्र त्यांना झाले. असा त्यांचा संसार शेवटपर्यंत चालू होता. स्वतःचे कौटुंबिक जीवन सांभाळत त्यांनी आपल्या वनवासी समाजबांधवांना सांभाळणेही महत्त्वाचे मानले. अशा आपल्या जीवनातील सामन्यातील पुढच्या टप्प्यात बिहारच्या छोटा नागपूरच्या दुर्लक्षिलेल्या आणि शोषित वनवासी बांधवांना हे यांचे सहकारी म्हणवत. ते त्यांचे संघ प्रमुख म्हणून प्रतिनिधित्व करु लागले. त्या संघाला मजबुती देण्यासाठी ते बिहारला परतले.
आपण जन्मजातच वनवासी आहोत, हे ठामपणे सांगायला त्यांनी नंतर आरंभले. तसेच त्यांनी समाजकारणासमवेत राजकारणातही प्रवेश केला. राज्य आणि केंद्र अशा दोन्ही ठिकाणी निवडणुकांमध्ये यशस्वी होत ते वनवासींचे नेते म्हणून अभिमानाने मिरवू लागले. आधी जेव्हा ते भारतात परतले होते, तेव्हा त्यांचे मन त्यांना आपल्या नावावरून सतत खात होते. तसे पाहता त्यांच्या आडनावातील ‘सिंह’ हे नाव त्यांच्या फायद्याचेच ठरत होते. अनेकांना ते पंजाबी, शीख, किंवा मग बिहार-उत्तर प्रदेशचे रजपूत असे असल्याचे वाटे. वनवासींसाठी ते आपल्या नावाचा वापर करुन घेत त्याच्या वेगळेपणाचा फायदा उठवू लागले होते. त्याचा फायदा उठवत ते त्याकाळी राजेरजवाडे, संपन्न धंदा-व्यवसाय अशा घराण्यातील लोक फक्त विदेशी जाऊन उच्चशिक्षण घेण्याच्या दर्जा, स्थान प्राप्त करु शकत असत. तसे स्वतःबद्दल भासवत आपला फायदा घेऊ लागले, अशांबरोबर ते उठ-बस करू लागले. ऑक्सफर्डला असताना सरोजनी नायडू यांची कन्या लीलामणी नायडू, पतौडीचे नवाब इफ्तीखार अली खान, दिलीपसिंह, जे नंतर श्रीलंकेचे प्रधानमंत्री झाले ते भंडारनायके असे भारतीय व शेजारी देशांचे धर्माध्यक्ष, राजे आणि धनिक व्यावसायिक यांची मुले-मुली असे बरेच प्रसिद्ध त्यांचे सहपाठी होते.
१९४०-५० च्या कालखंडात जेव्हा भारतीय राज्यघटना आणि लोकशाही आकाराला येत होती त्याजोडीने जयपाल सिंह मुंडा भारतातील वनवासी जनतेचा आवाज बुलंद करत होते. भारतात सत्तास्थापनेच्या गडबडीत असलेल्या समस्त राजकारण्यांना ते सांगायचा आटोकाट प्रयत्न करत होते की, वनवासी हेच या देशाचे सगळ्यात प्राचीन रहिवासी, मूळनिवासी आणि भारतीय प्रजासत्ताकाचे पुरस्कर्ते आहेत. हाच वनवासी समाज भारतीय सभ्यतेचे पाईक आहे. जयपाल मुंडा म्हणत की, “हिंदू धर्म खचितच खूप महान आहे, हे मी मनापासून मानतो. परंतु, त्याच जोडीने वनवासी दर्शन हे नैसर्गिकता आणि वैश्विकता याची देण आहे. वनवासी सार्‍या विश्वालाच मिळालेली निसर्गदत्त अशी देणगी आहे. तो काही जादूटोणा नाही, चेटूक वगैरे करणारे ते नाहीत.” जयपाल सिंहांनी ठामपणे म्हटले की, “फक्त वनवासीच या देशाला ’राष्ट्रीय आत्महत्ये’पासून वाचवू शकतात.” वनवासी वर्गाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी जयपाल सिंह यांनी लढा सुरू केला. त्यासाठी त्यांनी ‘आदिवासी महासभा’ तयार केली, जिचं नंतर नाव ‘झारखंड पार्टी’मध्ये बदललं. या पक्षाद्वारे त्यांनी सलग पाच लोकसभा निवडणुका जिंकल्या. १९५२ पासून त्यांनी ‘आदिवासी आरक्षण’ या मुद्द्यावर लोकसंघर्ष सुरू केला आणि त्यांच्या या संघर्षामुळे वनवासींना काही वर्षांनी आरक्षण मिळाले.
छोटा नागपूरच्या जनजाती समाजाचा एक मोठा नेता आणि नंतर भारताच्या संविधान सभेतला एक घटक म्हणून त्यांनी फक्त छोटा नागपूरच नव्हे, तर सगळ्या भारतातील जनजाती समाजाचे प्रतिनिधित्व केले. दि. १९ डिसेंबर,१९४६ रोजी संसदेत संविधान सभेचे सत्र चालू होते. त्यात त्यांनी आपले भाषण दिले होते. संसदेत होणार्‍या चर्चांमध्ये त्यांनी जनजाती समाजाच्या समर्थनार्थ बोलताना अनेकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत ते सहभागी झाले होते. त्यावेळी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. राज गोपालाचारी, सरोजिनी नायडू, जे. बी. कृपलानी असे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्या प्रयत्नांचेच फळ म्हणजे स्वातंत्र्यानंतर जनजाती समाजाला सरकारी नोकरीत आरक्षण मिळण्यासाठीच्या प्रयत्नात त्यांनी सोसलेले त्यांचे कष्ट खूप मोलाचे होते.
 
आज आपण झारखंडकडे स्वतंत्र राज्य म्हणून पाहत असलो, तरी त्याबाबतची कल्पना जयपाल यांनीच सर्वप्रथम मांडली होती. आजही जयपाल मुंडा यांना आदराने झारखंडची वनवासी जनता ’मरंग गोमके’ (सर्वोच्च अगुआ/नेता) असेच संबोधते. जेव्हा जयपाल मुंडा यांच्या वडिलांचे देहावसान झाले होते तेव्हा ते घरी गेले असताना आईला नमस्कार करुन त्यांनी आईला म्हटले होते की, “आई, आपल्या वनवासी समाजासाठी मी राजकारणात प्रवेश करत आहे. मला त्यासाठी तुझा आशीर्वाद हवा आहे.” आपल्या लेकाला आशीर्वाद देत त्या मातेने आपल्या पुत्रास एकच सांगितले होते की, “तुला जे हवे ते तू कर. परंतु, कदापि कोणाकडूनही धन्यवादाची अपेक्षा ठेवू नकोस.” आईच्या याच शब्दांचे स्मरण करत जयपाल मुंडा शेवटपर्यंत आपले कार्य करत राहिले. अनेकदा मतदानात विजय प्राप्त केले, तशी कधी हारही पत्करली. पण, आपल्या वनवासी बांधवांसाठी शेवटपर्यंत स्वतःला समर्पित केले. त्यांनी कोणापुढे कशाची मागणी केली नाही, तर कोणाला शरण जाऊन कोणाकडूनही धन्यवादही मागितले नाहीत. ते फक्त धन्यवाद देतच राहिले. लोकसभेचे सदस्य असतानाच त्यांचं दीर्घ आजाराने दिल्लीत दि. २० मार्च १९७० रोजी निधन झाले. दिल्लीहून झारखंडला त्यांच्या गावी त्यांना आणल्यावर साश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सगळ्या खेड्या-पाड्यातून व शहरातून गोळा झालेल्या जनजाती समाजाच्या मुखी एकच नाव होते अन ते म्हणजे ’मरंग गोमके अमर रहे...’
 
कोणताही नेता असो, मग तो हिंदू असो अथवा ख्रिस्त धर्मांतरित असो, गरिबीत वाढलेला असो वा श्रीमंतीत, प्रत्येक नायकाच्या काही कमतरता तर असणारच. पण, आपण त्यांच्या अशा गोष्टींकडे बघितले पाहिजे व त्यांचे चांगले ते स्मरणात ठेवले पाहिजे की, ज्या गोष्टी त्यांनी मनापासून जनतेच्या भल्यासाठीच केल्या होत्या. जयपाल सिंह मुंडा यांची ओळख ही केवळ एक अव्वल दर्जाचा खेळाडू, एक राजकीय व्यक्तिमत्त्व इथपर्यंत मर्यादित राहता कामा नये. तसे केले तर त्यांच्यावर तो अन्याय होईल. त्यांना अजून ओळखून घ्यायचे असेल, तर त्यांच्यावरील लिखाण जरुर वाचले पाहिजे. जयपाल सिंह मुंडांना समजून घेत आपण देशासाठी त्यांच्याकडून काय धडे शिकले पाहिजेत, हे समजले पाहिजे. आजदेखील जयपाल मुंडा यांचे स्मरण अन्य कोणाला येवो न येवो, पण झारखंडचीच नव्हे, तर सगळी वनवासी जनता त्यांना कधीही विसरणार नाही हे मात्र पक्के! संरक्षक फळी समर्थपणे सांभाळलेल्या त्या ऑलिम्पियन डिफेंडर ते जनजाती समाजाचा संरक्षक असलेल्या अशा या जयपाल सिंह मुंडा यांना आपल्या सगळ्यांचे दंडवत. अशी संरक्षक भिंत असल्यावर भारतावर गोल करणे अवघड असणारच ना!
श्रीपाद पेंडसे
(लेखक वनवासी कल्याण आश्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)