पुणे: एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाच्याही सांगण्याला भुलू नये आणि संप मागे घेऊन कामावर यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना चांगला पगार देण्याचा प्रयत्न करेल. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे त्यांचे पगार वेळेत होतील याकडे आम्ही लक्ष पुरवू असेही पवार यांनी सांगितले. बारामतीतील एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांनी गिरणी कामगारांचे उदाहरण लक्षात ठेवावे आणि कामावर रुजू व्हावे असेही आवाहन पवार यांनी केले.
दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी ३१ मार्च नंतर कामावर न परतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई होईल असा इशारा दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येणयासाठी ३१ मार्चची मुदत दिली होती. तो पर्यंत कामावर परतणाऱ्या कर्मचार्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले होते. या आवाहनाचाही काही फायदा न होऊन संप अजूनही चालूच आहे.