मुंबईतील सागरी प्रकल्प कोळी बांधवांच्या मुळावर

काहीही झाले तरीही प्रकल्प होऊ देणार नाही! कफ परेडमधील कोळी बांधवांचा ठाकरे सरकारला थेट इशारा

    03-Apr-2022
Total Views |

Map
 
 
 
मुंबई (ओंकार देशमुख) : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला मागील अनेक महिन्यांपासून तीव्र स्वरूपात होत असलेला विरोध शमण्यापूर्वी आणखी एका प्रकल्पाच्या विरोधात आता नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहेत. कोस्टल प्रकल्पामुळे प्रभावित होत असलेला कोळी समाज आता कफ परेड येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधणीला विरोध करत आहे. "या उड्डाणपुलामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असून काहीही झाले तरी आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही.", असा थेट इशारा कफ परेडच्या स्थानिक कोळी बांधव आणि मच्छिमारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्य सरकारला दिला आहे. कफ परेड भागातील प्रकल्प आणि संबंधित विषयांवर स्थानिकांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'शी नुकताच संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे एका बाजूला कोस्टल रोड प्रकल्पामुळे वरळीच्या कोळी बांधवांची नाराजी ओढवून घेतलेल्या आदित्य ठाकरेंच्या मागे कफ परेडमधील या प्रकल्पामुळे नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
 
 
 
आदित्य ठाकरे मामाकडे जाऊ शकतात, पण इकडे यायला वेळ नाही
'नरिमन पॉईंट ते कफ परेडच्या दरम्यान सागरी मार्गात या ठिकाणी होत असलेल्या उड्डाणपुलाच्या विरोधात आम्ही अनेकवेळा आज उठवला, निवेदने दिले, विधिमंडळ अधिवेशन काळात आंदोलन देखील दिले. मात्र, सरकार कुठल्याही प्रकारे याबाबतीत आमच्याशी सकारात्मक चर्चा करण्यासाठी तयार नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंशी देखील आम्ही वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आदित्य ठाकरेंना मामाच्या गावी जाण्यासाठी वेळ आहे, मात्र मंत्रालयापासून अगदी जवळच्या कफ परेडमध्ये येण्यास वेळ नाही ही वस्तुस्थिती आहे. जर पर्यावरण मंत्री आणि सरकारने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर त्या विरोधात मोठे तीव्र आंदोलन उभारून काम बंद पाडण्याची आमची भूमिका आहे.'
- जयेश भोईर, पदाधिकारी, सर्वोदय मच्छिमार सहकारी सोसायटी लि.
 
 
 
प्रकल्पामुळे मत्स्यबीजावर परिणाम ; अस्तित्व नष्ट होण्याची भीती
'कफ परेडच्या मच्छिमार नगरमधून जाणाऱ्या या उड्डाणपुलामुळे वाहतुकीच्या वेळेत केवळ ५ ते १० मिनिटांचा कालावधी वाचणार आहे, त्यामुळे प्रकल्पाची व्यवहार्यता किती त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भागातून हा प्रकल्प जाणार आहे, तो संपूर्ण भाग मत्स्यबीज आणि मासेमारीसाठी आवश्यक बाबींनी पूर्ण आहे. त्या भागातील मत्स्यबीजावरच आमचा व्यवसाय आणि आमचे अस्तित्व अवलंबून आहे. पर्यावरण मंत्री आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे या प्रकल्पामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामांची माहितीही देण्यात आली, मात्र त्यावर काहीही होऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रकल्प जर झाला त्याचा मत्स्यबीजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असून त्यामुळे आमचे अस्तित्व धोक्यात येण्याची आम्हाला भीती आहे.'
- भुवनेश्वर कृष्ण धनु, तज्ञ संचालक, सर्वोदय मच्छिमार सहकारी सोसायटी लि.
 
 
 
मासेमारीसोबतच जीवितालाही धोका !
'ज्या भागात या प्रकल्पाचे काम सुरु आहे, तोच मासेमारीसाठी आमचा दररोजचा मार्ग आहे. त्या भागात करण्यात येणाऱ्या बांधकामामुळे त्या परिसरातील भौगोलिक रचनेत बदल होण्याची दाट शक्यता असून मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग देखील आम्हाला बदलावा लागेल. त्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या खांबांमुळे बोटींचे अपघात होण्याचीही शक्यता आहे. या प्रकल्पामुळे केवळ आमच्या मासेमारीवरच नाही तर आमच्या जीविताला सुद्धा धोका पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे.'
- धनेश गजानन मेहेर, स्थानिक मच्छिमार
 
 
 
सागरी प्रकल्पांमुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान
मागील काही वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या सागरी प्रकल्पांच्या भोवती वादाची मोठी शृंखलाच निर्माण झाली आहे. आधी कोस्टल रोड आणि आता कफ परेडमध्ये बांधण्यात येत असलेला उड्डाणपूल ही त्यातीलच दोन प्रातिनिधिक उदाहरणं म्हणावी लागतील. ऑक्टोबर २०२१ पासून मुंबई महापालिकेच्या सागरी मार्ग प्रकल्प अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाला वरळीच्या क्लिव्हलँड बंदर परिसरातील स्थानिक मच्छिमारांसह कोळी बांधवांनी तीव्र स्वरूपात विरोध सुरु केला असून प्रकल्पाचे कामही बंद पाडले आहे. वरळी हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असल्यामुळे या विरोधाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. तर दुसरीकडे, कफ परेड येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलामुळे आमच्या मासेमारी क्षेत्रावर आणि उपजिविकेवर बाधा निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत स्थानिक कोळी बांधव आक्रमक झाले आहेत. या दोन्ही प्रकल्पातील काही बाबींना विरोध करणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या निशाण्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असून कोळी बांधवांच्या नाराजीचा फटका येत्या महापालिका निवडणुकीतही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईत होत असलेल्या सागरी प्रकल्पांमुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हानच उभे राहिले आहे.
 
 
स्थानिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार
'कुठलाही प्रकल्प हा जनतेच्या विरोधाला डावलून करणे योग्य नाही. सद्यस्थितीत कफ परेड येथील या उड्डाणपुलाच्या संदर्भात माझ्याकडे आवश्यक ती माहिती नाही, त्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे अधिक उचित ठरेल. जर स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांची नाराजी आणि त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.'
- संजय बनसोडे, राज्यमंत्री, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र सरकार