संभाजी नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाजी नगरच्या सभेला अखेर पोलीसांनी परवानगी दिली आहे. १ मे रोजी राज ठाकरेंची प्रस्तावित सभा होणारच असा इशारा मनसेने दिली आहे. पोलीसांनी सभेला अधिकृत होकार अद्याप कळवलेला नसला तरीही तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. राज ठाकरेंची सभा झाल्यास काय नियोजन असेल याबद्दलची चाचपणी पोलीसाकडून सुरू आहे.
१ मे रोजी मनसेची सभा निश्चित होणार आहे, असे मनसे ठासून सांगत आहे. संभाजी नगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. पोलिसांनीही या सभेच्या दिवसासाठी चोख बंदोबस्ताचे नियोजन तयार ठेवले आहे.
संभाजीनगरच्या सभेतून पुन्हा एकदा महाराष्ट्राला राजहुंकार ऐकू येणार आहे. राज ठाकरेंची ही सभा त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर असणार आहे. सोबतच मनसेचे ३ मेचे अल्टीमेटम कायम आहे. त्यावरही राज ठाकरे नेमके काय बोलणार याबद्दल चर्चाही आहे. राणा दाम्पत्यांवरील ठाकरे सरकारची कारवाई, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण, महाविकास आघाडीतील नेत्यानी ठाकरेंवर केलेली टीका सोबतच उद्धव ठाकरेंचे हिंदूत्वाबद्दलचे विधान याचा समाचार राज ठाकरे कसा घेणार याबद्दलची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी संभाजी नगरात घरोघरी मनसेचे झेंडे वाटप आणि कार्यक्रम पत्रिका वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे. सोबतच एक हनुमान चालीसाची प्रतही दिली जात आहे. राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते संभाजी नगरला पोहोचणार आहेत. राज यांच्या सभेला ठाकरे सरकार आडकाठी घालण्याचा कुठलाही हेतू नाही मात्र, ठाकरे सरकार राज यांचे विरोधक पुरेपूर त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा राजकीय फायदा उचलण्याची तयारी करत आहेत.
राज ठाकरेंच्या सभेला पोलीसांनी काय अटीशर्थी आहेत ?
१ ) मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून कोणतेही विधान करू नये
२ ) सामाजिक सलोखा बिघडेल, असे कोणतेही वर्तन करण्यात येऊ नये
३ ) सभेपूर्वी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
४ ) लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
५ ) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करण्यास परवानगी नाही
६ ) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
७ ) सभेदरम्यान कोणत्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
८ ) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
९ ) सभेला येणार्या लोकांनी घोषणा नारेबाजी देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
१० ) वाहन पार्किंगचे नियम पाळावे