उत्तर प्रदेशात विविध धार्मिक स्थळांवरून 6 हजार भोंगे हटविले

30 हजार भोंग्यांचा आवाज मर्यादेत

    28-Apr-2022
Total Views |
UP
 
 
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): उत्तर प्रदेशात गेल्या चार दिवसांत धार्मिक स्थळांवरील (मंदिरे व मशिदी) सहा हजार भोंगे काढून टाकण्यात आले असून 30 हजार भोंग्यांचा आवाज मर्यादेत करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात भोंग्यांविषयी कायद्याचे पालन होताना दिसत आहे. मागील आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकास उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य असले तरीही त्याचा इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनतर, आतापर्यंत विविध धार्मिक स्थळांवरील 6 हजार, 031 भोंगे काढून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 29 हजार, 674 भोंग्यांचा आवाज नियमानुसार मर्यादेत करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली.
 
 
आवाज कमी करण्यासाठी श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्टचा सर्वप्रथम पुढाकार
सर्वप्रथम मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्टने भोंग्यांचा वापर न करण्याचा निर्णय दि. 20 एप्रिल रोजी घेतला. ट्रस्टने पहाटे 5 वाजता भोंग्यांवरून मंगलाचरण आरती प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बलरामपूरमधील शक्तिपीठ देवीपतन तुळशीपूर मंदिराने चारपैकी तीन भोंगे काढण्याचा निर्णय बुधवारी घेतला. मंदिराने उर्वरित एका भोंग्याचा आवाजदेखील परवानगीयोग्य मर्यादेपर्यंत कमी केला आहे. गोरखपूरमध्ये ‘गोरखना मंदिर ट्रस्ट’ने आवारातील भोंग्यांचा आवाज कमी केला असून मंदिराजवळील परिसरातील भोंगे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मेरठमध्ये राजराजेश्वरी मंदिर आणि काली पलटन मंदिरानेही आवाज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कानपूरमध्ये मंदिर-मठ समन्वय समितीने स्वेच्छेने मंदिरांवरील भोंगे काढून टाकले असून अयोध्येतील संतसमुदायानेही या निर्णयास पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे लखनौ येथील ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनीही राज्यातील मशिदींवरील भोंग्यांचा आवाज मर्यादेत ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.