टिळकांना अभिप्रेत असलेले गणेशोत्सव मंडळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2022   
Total Views |

tilaknagar
 
शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवली शहरातील लोकमान्य टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या टिळकनगर विभागातील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे वर्षभर कार्यरत असणारे व मागील वर्षी ७२ वा गणेशोत्सव साजरे करणारे मंडळ आहे त्याविषयी...
 
 
 
१९५० साली टिळकनगरातील खंडकर, पारखी, सोनटक्के, जपे, पंडित, वीरकर व इतर समविचारी नगरवासीयांनी एकत्र येऊन गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. सुरुवातीच्या काळात नगरातील वेगवेगळ्या मोकळ्या जागांमध्ये हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत असे. मांडवात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवासाठी मुंबईहून ताडपत्री भाड्याने आणून त्याचा मांडव बनवला जात असे. नंतर टिळकनगरातील मोकळ्या जागांच्या ठिकाणी इमारती झाल्यामुळे अकरावा व बारावा गणेशोत्सव के. एन. कुलकर्णी कार्यालयात व १९९२-९३ पासून ‘सुयोग मंगल कार्यालया’त दिमाखात साजरा होत आहे.
 
 
१९९३ पर्यंत मंडळाचा कार्यकाळ हा फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यापर्यंतच मर्यादित होता. कार्यकर्ते उत्सवसत्राच्या अगोदर दोन महिने एकत्र येऊन वर्गणी गोळा करून मांडवातला गणेशोत्सव साजरा करत असत. पहिल्यापासूनच मंडळाचे नाव दर्जेदार कार्यक्रमांसाठी डोंबिवलीत प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रथितयश व्यक्तींनी व कलाकारांनी सादर केलेली भाषणे व करमणुकीचे कार्यक्रम जुन्या डोंबिवलीकरांच्या आजही स्मरणात आहेत.
 
उपक्रमांचे वैविध्य
१९९३ साली सुहास दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ कायमस्वरूपी नोंदणीकृत झाल्यावर कार्याची व्याप्ती फक्त गणेशोत्सवापुरती मर्यादित न राहता मंडळातर्फे वेगवेगळ्या शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास व ते हळूहळू वाढवण्यास सुरुवात झाली. त्यात उल्लेखनीय गोष्ट अशी की, एकदा सुरू केलेला उपक्रम मंडळातर्फे क्वचितच बंद करण्यात आला. मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारे इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन व सराव परीक्षा, दिवाळीत आयोजिण्यात येणारी किल्ले बांधणी स्पर्धा व किल्ले दर्शन शैक्षणिक सहल, दीपावली अभीष्टचिंतनाचा अभिनव उपक्रम, शालेय चित्रकला स्पर्धा, उत्सवसत्रात आयोजिण्यात येणारी अभिनव प्रदर्शने, अभिनव संकल्पनेतून साकारलेली रक्तगट सूची, वसंतोत्सव, मकरोत्सव, वेगवेगळ्या गुणवत्ताप्राप्त विविध क्षेत्रांतील टिळकनगरातील व्यक्तींचा सन्मान, मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते दर्शन निमकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणारी खुली बुद्धिबळ स्पर्धा, शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, १५ ऑगस्ट रोजी होणारे ध्वजवंदन हे असे अनेक उपक्रम मंडळातर्फे गेली १५ ते १६ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येत आहेत. सात ते आठ वर्षे मंडळातर्फे मोफत वृत्तपत्र वाचनालयही चालवण्यात आले. वेगवेगळ्या आपत्तींच्या काळातही मंडळ नेहमीच मदतीला धावून आले आहे, ज्यामध्ये प्लेगच्या साथीच्या वेळी कार्यकर्त्यांनी केलेली नगराची साफसफाई व २६ जुलैच्या आपत्तीच्या वेळी जमा केलेली मदत, त्याला नगरवासीयांनी दिलेली उत्स्फूर्त साथ व त्या मदतीचे नियोजनबद्ध केलेले वाटप आजही टिळकनगरवासीयांच्या स्मरणात आहे.
 
दिग्गज कलावंतांचा सहभाग
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला डोंबिवलीच्या सांस्कृतिक जडणघडणीतही मानाचे स्थान आहे. १९९२ सालापासून शारदीय संगीत महोत्सव, त्यानंतर १९९५ सालापासूनच्या ‘वसंत व्याख्यानमाला’ सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांच्या दहा दिवसांच्या पाच प्रवचनमाला, सु. ग. शेवडे यांची सात दिवसांची आद्य क्रांतिकारकांवरील प्रवचनमाला, तसेच वेगवेगळ्या प्रथितयश वक्त्यांची भाषणे, मुलाखती व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. टिळकनगर शाळेच्या भव्य पटांगणात विनामूल्य सादर करण्यात येणार्‍या वसंतोत्सवाने डोंबिवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण केले आहे. अनेक ज्येष्ठ कलावंत, दिग्गज व्यक्ती व प्रथितयश सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमांस हजेरी लावली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे, गीतकार जगदीश खेबुडकर, प्रभाकर पणशीकर, ‘मॅगसेसे पुरस्कार’ विजेते डॉ. प्रकाश आमटे यांचा उल्लेख वानगीदाखल करता येईल. गेल्या काही वर्षांपासून मंडळाने वसंतोत्सवाच्या आयोजनाचा कालावधी बदलून डिसेंबर महिन्यात ‘मकरोत्सव’ या नावाने त्याचे आयोजन करण्यास सुरुवात केली. यामध्ये विविध उद्योन्मुख कलाकारांनादेखील मंडळातर्फे मोठा रसिकवर्ग उपलब्ध करून देण्यात आला.
 
वर्षभर कार्यक्रमांची मेजवानी
मंडळातर्फे काही विशेष कार्यक्रमांचे आयोजनही अत्यंत वाजवी दरात किंवा मोफत करण्यात येते. संपूर्ण कुटुंबाने एकत्रित येऊन कार्यक्रमाचा आनंद लुटावा, हा त्यामागे उद्देश असतो. डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा सहा तासांचा ’आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम अत्यंत वाजवी तिकीट दरात जेवणासह दर्जेदार कार्यक्रम कसा आयोजित व सादर केला जाऊ शकतो, याची चुणूक मंडळाने डोंबिवलीकरांना दाखविली. उपस्थित १२०० रसिकांची पिण्याच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंतची केलेली सोय व मध्यंतरात पाच मिनिटांत १२०० रसिकांपर्यंत पोहोचलेली जेवणाची पाकिटे हे उत्कृष्ट ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे उदाहरण आजही डोंबिवलीकरांच्या स्मरणात आहे. तसेच पूर्वीचे डोंबिवलीकर व ‘जागतिक शांतिदूत’ म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या संदीप वासलेकर यांच्या ’एका दिशेचा शोध’ या पुस्तकानिमित्त घेण्यात आलेल्या त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम व डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ’लपवलेल्या काचा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम व त्यामध्ये उपस्थित दहा नावाजलेल्या कलाकारांची अदाकारी या दोन कार्यक्रमांचाही विशेष उल्लेख करावा लागेल.
 
 
कलादिग्दर्शक संजय धबडे यांचे योगदान
सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी एकत्रित येऊन गणेशोत्सवाची सजावट साकारत असत. परंतु, सुवर्णमहोत्सवी वर्षी मंडळातर्फे नगरातील पूर्वीचे रहिवासी व प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी गणेशोत्सवात थायलंडच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्याला दाद मिळाली व त्या वर्षीपासूनच त्यांनी गणेशोत्सवात वेगवेगळ्या देशांतील मंदिरांच्या किंवा वास्तूंच्या भव्य प्रतिकृती साकारल्या जात आहेत, ज्यामध्ये दाक्षिणात्य, चिनी, इजिप्शियन, रोमन, हिमाचल प्रदेश, नेपाळ येथील मंदिर संस्कृती, कंबोडियातील अँगकोर वट, राजस्थानचा व पॅरिसचा महाल, महाराष्ट्रातील लेणी शिल्प, नागा संस्कृती, गावाबाहेरचे जीर्ण मंदिर व समुद्राच्या तळातील सजावट यांचा समावेश आहे. या सर्व प्रतिकृती पाहण्यासाठी फक्त डोंबिवलीकरच नाही, तर ठाणे ते बदलापूरपासून गणेशभक्त आवर्जून हजारोंच्या संख्येने येतात.
विविध प्रदर्शने - पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी
उत्सवसत्रात मंडळातर्फे आयोजिण्यात येणारे प्रदर्शन हीसुद्धा डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते. ‘मॅजेस्टिक’च्या पुस्तक प्रदर्शनाला उत्सवसत्रात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सुरुवात झालेल्या या उपक्रमात नंतर डोंबिवलीच्या लघुउद्योजक महिलांना वाजवी दरात स्टॉल देऊन त्यांच्या उत्पादनांना वाव मिळवून देण्यासाठी तीन वर्षे आयोजिलेली ग्राहक पेठ, त्यानंतर डोंबिवलीतील पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्थांना एकत्रित आणून तीन वर्षे ‘पर्यटन : एक अनोखे दालन’, ‘सुंदर माझे घर’ हे गृहसजावटीवरील प्रदर्शन यांना डोंबिवलीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही मंडळाने ‘भातुकली’ या अनोख्या विषयावर ’आठवणीतील भातुकली’ हे प्रदर्शन आयोजित केले आहे.२०१७ मध्ये ‘स्टार्ट-अप डोंबिवली’ या अनोख्या विषयावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनोख्या संकल्पनांवर आधारित व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचा समावेश होता. डोंबिवलीतील नवोदित व्यावसायिकांसाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आणि म्हणूनच गणेशोत्सव २०१८ मध्ये या प्रदर्शनाचे पर्व दुसरे आयोजित करण्यात आले.

 
शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक
अनंत चतुर्दशीला निघणारी पारंपरिक मिरवणूक पाहण्यासाठी डोंबिवलीतील हजारो गणेशभक्त रस्त्याच्या दुतर्फा व इमारतींवर गर्दी करतात. अत्यंत शिस्तबद्ध आयोजनात तरुण-तरुणी व आबालवृद्ध ढोल, ताशा व हलगीच्या तालावर लेझीम खेळत असतात. श्रींचे विसर्जन झाल्यानंतर मंडळातर्फे दिला जाणारा महाप्रसाद घेण्यासाठी गणेशभक्त पुन्हा हॉलमध्ये परत येतात. पूर्वापार परंपरेप्रमाणे नगरातील स्त्रियांनी एकत्र येऊन बनवलेले 40 ते 45 किलो दडपे पोहे, काकडीचे काप व पेढा असा महाप्रसाद खाऊन व एखाद्या भक्ताने आयोजिलेले थंडगार सरबत पिऊन तृप्त मनाने सर्व गणेशभक्त आपापल्या घरी परतात.
 
 
निमकर कुटुंबीयांची मोलाची साथ
 
वर्षभर कार्यरत असलेले टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नगरातील रहिवाशांकडून उत्सवसत्राच्या आधी एकदाच वर्गणी रूपाने देणगी जमा करते. श्रींचा दिमाखदार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेली २० वर्षे मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ‘सुयोग मंगल कार्यालय’ उपलब्ध करून देणार्‍या निमकर कुटुंबीयांची साथही मोलाची आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच मंडळाने दहा वर्षांपूर्वी नगरातील विराट सोसायटीत स्वतःच्या कार्यालयाची जागा घेतली.
 
 
कार्यकर्ता घडणीचे केंद्र
नगरातील अनेक तरुण आपल्या व्यस्त दिनचर्येतून मंडळासाठी वेळ काढून कार्यकर्ते होतात. ”कार्यकर्ता झाल्यावर पडेल ते काम माझे आणि ते मी उत्तमच करीन,” या विचाराने ते काम करतात आणि हे करत असतानाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास घडत असतो. कारण, गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला जाताना किंवा मंडळासाठी प्रायोजकत्व आणण्यासाठी लोकांना आपले म्हणणे पटवून देताना, प्रसंगी होणारा अपमान गिळून ‘तुम्ही म्हणता तेच योग्य’ असे म्हणायला शिकणे, कितीही दमलो असलो तरी घेतलेली जबाबदारी पूर्ण करणे किंवा दिलेली वेळ पाळणे, एखाद्या कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे पार पाडताना येणार्‍या अडचणी किंवा काही अनुभव इ. अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मुळात डोंबिवली हे मध्यमवर्गीयांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे साहजिकच हे सर्व कार्यकर्ते उच्चशिक्षित आणि मध्यमवर्गातले आहेत.
 
या कार्यकर्त्यांच्या मंडळाबाबतच्या आणि त्यांना दिलेल्या जबाबदारीबाबतच्या निष्ठेचे उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये साकारले जाणारे महिलांचे लेझीम पथक. या पथकामध्ये नगरातील जवळजवळ ३० ते ३५ स्त्रियांचा सहभाग असतो. गणेशोत्सवाच्या किमान दोन महिने आधीपासून या पथकाचा सराव सुरू होतो. हा सराव करून घेणे, त्या सगळ्यांची सांगड घालणे, मिरवणुकीच्या दिवशी उत्तम आणि नेत्रदीपक सादरीकरण होईल, याची काळजी घेणे, तसेच सरावासाठी लागणार्‍या जागेची व्यवस्था पाहणे, सहभागी महिलांचे पोषाख तयार करून आणणे, पथकासाठी लागणारी लेझीम, ढोल इ. तयारी जमवणे अशी असंख्य कामे व जबाबदार्‍या गेली सलग सात वर्षे सिद्धी वैद्य, सोनाली पाठारे आणि चैत्राली भावे या मंडळाच्या तीन युवा कार्यकर्त्या सांभाळत आहेत आणि विशेष म्हणजे स्वतःची नोकरी आणि घर सांभाळून त्या हे सगळे आनंदाने करत आहेत.
 
 
सेतू एक हात मदतीचा
सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून समाजोपयोगी उपक्रम अथवा कामांमध्ये मंडळ कायमच अग्रस्थानी असते. समाजोपयोगी उपक्रम मंडळ ‘सेतू एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत राबवते. मंडळाने २१६-१७ या कालावधीत ‘विवेकानंद सेवा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने विहीगाव येथे सुमारे एक कोटी लीटर पाणी अडवण्याची क्षमता असणार्‍या बंधारा बांधून देण्याचे काम केले. यामुळे विहीगावातील गावकर्‍यांच्या पाणी प्रश्नावर कायमचा उपाय करण्यात आला. या उपक्रमासाठीचा निधीदेखील मंडळाने अभिनव संकल्पनेतून जमा केला.
 
 
मंडळाने नगरवासीयांना त्यांच्या घरातील बाप्पा समोर जमणारी देणगी मंडळास देण्याचे आवाहन केले. या संकल्पनेस नगरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच नुकताच ‘सेतू’ योजनेअंतर्गत मंडळाने दुसरा प्रकल्प केला. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे २५ सायकल्स मुरबाड जवळील अंदाड गावातील आदिवासी पाड्यांमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. यामुळे शाळेसाठी सहा-सात किमीचा पायी प्रवास करणार्‍या या विद्यार्थ्यांना शाळेत येणे सुकर झाले आहे. अनेक उपक्रम येत्या काही वर्षात राबविण्याचा मानस मंडळाचा आहे. मागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे मंडळाचे उपक्रम होऊ शकले नाहीत, पण ७५ व्या वर्षाकडे वाटचाल करणार्‍या मंडळाचे विविध क्षेत्रातील कार्य असे अखंड चालू आहे व ते असेच चालू राहण्यासाठी नगरातले व नगराबाहेरीलही नवे नवे कार्यकर्ते मंडळाच्या कार्यात सतत सहभागी होत आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@