पौरोहित्य सगळ्यांसाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2022   
Total Views |

shankaracharya
 
 
सर्व हिंदू जातींना पुरोहित बनण्यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत, असे म्हणणार्‍या छगन भुजबळ यांना माहितीच नाही की, पौरोहित्य ही हिंदू संस्कृतीत कधीही एका वर्गाची मक्तेदारी नव्हती. आजही ‘कुर्तकोटी शंकराचार्य न्यास’ आणि ‘धर्म जागरण मंच’ रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ पासून दरवर्षी एप्रिलमध्ये पूजा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. सर्व समाजातील व्यक्तींसाठी हे प्रशिक्षण वर्ग नि:शुल्क आहेत. त्या संदर्भात...
 
 
इस्लामपूरच्या सभेतील अमोल मिटकरी यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण केला जात आहे. पौरोहित्य एक व्यवसाय आहे. पोटापाण्याचा रोजगार आहे. तो सर्व हिंदूंना खुला असावा. म्हणजेच जसे वकील, सीए, डॉक्टर, प्राध्यापक, न्यायाधीश परीक्षा देऊन होता येते, तशीच विद्यापीठीय परीक्षा पास करून कोणाही हिंदूला पुरोहित होता आले पाहिजे. मराठा, कुणबी, तेली, अगदी भंडारी, धनगर, गुरव, मातंग, चर्मकार, कैकाडी, वडार आदी सर्व ४६३५  हिंदू जातींना पुरोहित बनण्यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत,” इति छगन भुजबळ. छगन भुजबळ यांनी कोल्हापूरच्या सभेत कोणाही हिंदूला पुरोहित होता यावे, यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत, असे म्हटले. आता याला महाराष्ट्राचे त्यातही नाशिक शहराचे दुर्दैव म्हणायलाच हवे की, या धार्मिक शहराला असे पालकमंत्री लाभले की, ज्यांना महाराष्ट्रात तसेच या नाशिक शहरात काय घडते ते माहितीच नाही. पुरोहित बनण्यासाठी ‘दरवाजे उघडा’ हे म्हणण्याआधी छगन भुजबळ यांनी गोदावरी तीरावरील ‘कुर्तकोटी शंकराचार्य न्यास’ आणि ‘धर्म जागरण मंच’ रा.स्व.संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या पूजा-प्रशिक्षण वर्गाची माहिती आहे का? भुजबळांनी या धार्मिक सामाजिक कार्याबद्दल माहिती घेतली असती तर...
 
 
‘कुर्तकोटी शंकराचार्य न्यास’ आणि ‘धर्म जागरण मंच’ रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ पासून दरवर्षी एप्रिलमध्ये पूजा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. सर्व समाजातील १६ ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी हे प्रशिक्षण वर्ग नि:शुल्क आहे. आजपर्यंत नाशिक, पैठण येथे आयोजित या प्रशिक्षण वर्गात ७५० पेक्षा जास्त समाजबांधवांनी सहभाग घेतला आहे. यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी त्यांच्या त्यांच्या गावी पौरोहित्याचे कार्य करत आहेत. जातिपातीचे कृत्रिम बंध तोडत धर्म सगळ्यांसाठीचे जगणे जगत आहेत. प्रत्येक जण आपल्या समाजात धर्म-कर्म-संस्कृतींचे अमृत पेरत आहेत. छगन भुजबळ जातिपातीचे नाव घेतात म्हणून त्यांच्याच भाषेत सांगायला हवे. ‘जात’ उच्चारताना बरे वाटत नाही, पण लिहिल्याशिवाय भुजबळ, मिटकरी आणि इतकर असंख्य धर्मविद्वेषी लोकांना कळणार कसे? म्हणून या प्रशिक्षण वर्गात कोणत्या कोणत्या समाजगटाचे बांधव सहभागी झाले होते ते लिहिते.
 
 
 
या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते - मेहतर, पारधी, वारली, कोळी, मोची लमाण, पद्मसाळी, मातंग, खैर, धनगर, लिंगायत, नीळकंठ, वाल्मिकी, नाभिक, वडार, कोष्टी, गोंधळी, भिल्ल, टकारी, हिंदू कोकणी, पासे पारधी, गुरव, मोरेपाई वाली, मराठा, ब्राह्मण, जंगम, कोकणा, मांग, ढोर, रंगारी, मसण, जोगी, कुंचीकुर्वे, तळवाट, महादेव कोळी, वाटली, महार, जोशी, चांभार, लोकहार, ओतार, स्वकुळसाळी, लोथी, मंडप, तोगरी, तलवार, माळी, सोनार, बोलाई, गवळी, कोटक, माडिया, वलई, कातरी, वीरशैव, गुरव आणि अज्ञात (ज्यांना जात माहिती नव्हती ते). आता हे मला कसे माहिती तर? सुरुवातीला उत्सुकतेपोटी आणि नंतर समाजक्रांतीची साक्षीदार व्हावे म्हणून मी कित्येकदा या पूजा प्रशिक्षण वर्गामध्ये गेले आहे. प्रशिक्षणात सहभागी होणार्‍यांशी मुक्त चर्चा केली आहे. इतकेच काय? या प्रशिक्षणार्थींच्या जीवनात या प्रशिक्षणामुळे काही बदल झाला का, हेसुद्धा या प्रशिक्षणार्थींच्या गावी जाऊन पाहिलेही.
 
मुकुंदराव खोचे गुरुजी, पंकज गायधनी गुरुजी, मंदार कावळे गुरुजी या वर्गामध्ये विविध सत्र घेतात. सुरुवातीला राजेश पुरोहित गुरुजीही असायचे. या प्रशिक्षणामध्ये योगाभ्यास, संस्कृत संभाषण, शांतिमंत्र, संकल्प, गणपती पूजन, भूमिपूजन, सत्यनारायण पूजा, साखरपुडा, नामकरण, पंचांग वाचन, विवाह संस्कार, दाह विधी, दशक्रिया, नवग्रह पूजा, नवग्रह स्तोत्र इत्यादी प्रशिक्षण दिले जाते. समाजात सकारात्मक बदल घडत आहे. सगळा समाज हिंदू म्हणून उभा आहे, हे सांगायचे होते म्हणून या प्रशिक्षणाबद्दल विद्रोही पुरोगामी गटातल्या लोकांशी चर्चा केली, तर त्यांचा प्रश्न होता, ”बहुजन समाजाच्या लोकांना हे प्रशिक्षण देता. मग, पुजारी म्हणून देवळात फक्त ब्राह्मणांनाच का संधी मिळते” त्यांना म्हणाले, “अरे मी स्वत: सोलापूर, अगदी कोल्हापूरमध्येही देवळांमध्ये या प्रशिक्षणार्थींना पुजाविधी करताना पाहिले. इतकेच काय, ग्रामीण दुर्गम खेड्यात पूजाविधी करण्यासाठी पुरोहित उपलब्ध नसेल किंवा असला तरीसुद्धा आपल्या गावातला मुलगा असे काही प्रशिक्षण घेऊन आला आहे म्हणून लोक या प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना पूजापाठ करण्यास बोलवतात, आदर-सन्मान करतात.” मंदिरात ब्राह्मणच पुजारी असतात का, असा प्रश्न मी मुकुंदराव खोचे गुरूजींनाही विचारला होता. यावर ते म्हणाले, ”मंदिरात केवळ ब्राह्मण पूजा करत नाही, तर श्रीक्षेत्र माहूर येथे भोपी, कैकाडी समाजातील पुरोहित असतात.
 
कोल्हापूर व तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरात मराठा समाज, तर जेजुरी मंदिरात त्या-त्या समाजाचे पुजारी असतात.” खोचे गुरूजींचे म्हणणे खोटे नाहीच. कारण, भाट, जोशी, नंदीबैलवाला समाज, मरिआईवाला समाज, गुरव, नाथपंथी, डवरी गोसावी समाज आणि इतरही अनेक समाज आजही पूजाविधीमध्ये प्रावीण्य मिळवून आहेत. त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. पण पूजापाठ, धर्मविधी याची त्यांना साग्रसंगीत माहिती आहे. मी हे सांगू शकते. कारण, मला आठवते, मी मुंबईतल्या एका वस्तीत गेले होते. तिथे काही कुटुंबे होती. मी भाट समाजाची आहे, हे कळल्यावर त्यांच्यातली एक आज्जी उठली आणि माझी अलाबला काढत म्हणाली, “बाई, तुम्ही पूजापाठ करणारे. पूर्वी आमच्या गावाकुसाबाहेर पूजा करायला तुम्हीच लोक यायचात. आमच्या घरची पूजा आणि लग्न तुम्हीच लावायचात.” थोडक्यात सांगायचे हे की, आपल्या समाजात पूजाविधी आणि संस्कारसंबंधी कार्य करण्याचे काम केवळ ब्राह्मण समाजाकडे नव्हते. पौरोहित्याचे कार्य कुणीही करू शकत होते. पण स्वत:ला स्वत: होऊनच मागासवर्गीय समाजाचा नेता समजणार्‍या छगन भुजबळांना हे माहिती नाही.
 
 
हिंदू धर्माची ही उज्ज्वल परंपरा ‘कुर्तकोटी शंकराचार्य न्यास’ आणि रा.स्व.संघ धर्मजागरणाच्या माध्यमातून पूजा प्रशिक्षण वर्गातून पुन्हा प्रज्वलित केली जात आहे. त्याबद्दल या पूजा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणार्‍या सगळ्यांचेच अभिनंदन आणि कौतुक करावेे तितके थोडे आहे.असो. विषयांतर झाले. या पूजा प्रशिक्षण वर्गामुळे काय झाले? याबद्दल माहिती घेण्यासाठी मी महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागात गेले. सोलापूरमधील जांबमुनी मोची समाजाची वस्ती सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजाची वस्ती होती. आर्थिक परिस्थितीही हलाखीची. हातावरचे पोट. गरिबीमुळे सतराशेसाठ समस्या उभ्याच. त्याचाच फायदा धर्मांतर करणार्‍यांनी घेतला. ते या वस्तीतल्या लोकांना सांगत, ”आमच्यातल्या बारक्या पोराला पण येशूची प्रार्थना येते. तुम्हाला तुमची प्रार्थना येते का? कशी येणार? कारण, तो देव तुमचा नाहीच किंवा ते म्हणत तुम्हाला तुमच्या देवाची प्रार्थना करायची असेल तर भटबामण मिळत नाहीत.
 
देवाचीच प्रार्थना करायची ना? आम्ही आहोत ना?” त्यांच्या अशा बोलण्याने समाजातील अनेक जणांनी देवघरातले देव टाकले आणि चर्चमध्ये जाऊ लागले. पण, देव बदल्यानंतर धर्म बदल्यानंतर त्याच्या दुसर्‍या धर्मातील लोकांनी त्यांना आपले मानले नाही. मग या समाजातील काही तरूणांना वाटले की, हे काही होत आहे ते चांगले होत नाही. फक्त धर्मांतर होते, पण त्यामुळे समाजाचा फायदा नाही, तर समाजाचा तोटाच होतो. त्यांनी विचार केला की हे सगळे का होते, तर आपल्याला देवाधर्माची पूजा करण्यावरून दुसरे लोक काहीबाही सांगायचे. मात्र, धर्माचे ज्ञान नसल्यामुळे आपण आपल्या धर्माला दूषण देणार्‍यांना काय उत्तर देणार? धर्म पूजाविधी आणि हिंदू धर्मातील संस्काराचा अर्थ काय, याबद्दल माहिती घेण्यासाठी मग सोलापूरच्या जांबमुनी मोची समाजाच्या हे तरूण पूजा प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी झाले. या प्रशिक्षण वर्गातून पूजाविधी आणि अन्य संस्काराचे प्रशिक्षण घेतल्यानंतर सोलापूरमधील या समाजाच्या वस्तीत अनन्यसाधारण बदल झाला.
 
या वस्तीतले धर्मांतराचे प्रमाण शून्य तर झालेच. शिवाय धर्मांतर करणारेही स्वगृही परतले. विषय केवळ धर्मांतरापुरताच संबंधित नाही. तर धार्मिक आणि सामाजिक अस्मितेचाही असतोच म्हणा. सामाजिक विषय घेऊन मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक शहरात जाणे-येणे होते. त्यावेळी एक वास्तव जाणवते की, समाजातील एका गटातील तरुणांना समाजकंटक भडकवतात की, ज्या देवाची पूजा करण्याचा तुझ्या समाजाला हक्क नाही, तो देव, तो धर्म, तो समाज तुझा कसा? तुझे काहीच नाही. उलथव सगळं. उद्ध्वस्त कर त्यांना. या असल्या धर्मविघातक शक्तींचे का फावते? तर आपल्याच समाजाची धर्मसंस्कार परंपरा या दुर्लक्षित वस्त्यांतून हद्दपार झाली आहे. धर्म समाजाला स्नेहाने, प्रेरणेने बांधून ठेवतो. पूजाविधी, धर्मसंस्कार यांना धार्मिक आधार आहेतच, पण सामाजिक ऐक्यामध्येही त्यांचे योगदान आहेच. त्यामुळे सर्व समाजांतून धर्मसंस्कार, पूजाविधी, संस्कारविधींबाबत जागृती झाली पाहिजे, ही काळाची गरज आहे. ते कार्य हे पूजाविधी, पौरोहित्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@