काळ्या सोन्याचे बळी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2022   
Total Views |

nigeria
 
 
 
गरिबी आणि लालसा ही माणसाच्या जीवावरही बेतू शकते, याचे आणखीन एक उदाहरण नुकतेच नायजेरियामध्ये पाहायला मिळाले. मागील शुक्रवारी रात्री तेथील एका अनधिकृत तेल ‘रिफायनरी’मध्ये झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १०० च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे ‘काळे सोने’ म्हणून ओळख असलेल्या तेलातून कमाई करण्याच्या नादात घडलेली ही दुर्घटना नायजेरियातील बेकायदेशीर ‘रिफायनरी’चे वास्तव प्रकर्षाने अधोरेखित करते.
 
 
 
 
 
नायजेरिया... आफ्रिका खंडातील तेलसाठ्यांनी संपन्न असा देश. तसेच,आफ्रिकेतील सर्वाधिक तेलउत्पादक देशांमध्येही नायजेरिया अग्रेसर. दोन दशलक्ष बॅरल प्रति दिवस इतकी या देशाची क्रूड तेल उत्पादन क्षमता. पण, या देशाच्या दक्षिणेकडील तेलउत्खनन प्रकल्पांच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात तेलचोरी केली जाते. एवढेच नाही, तर या तेलाची तेथील काळ्या बाजारातही तितकीच चलती. असेच गैरमार्गाने लुटलेले तेल शुद्ध करणार्‍या नायजेरियामध्ये बेकायदेशीर ‘रिफायनरी’सुद्धा मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. मुख्य शहरांपासून कोसो दूर असलेल्या या ‘रिफायनरी’ दुर्गम रानावनात तरी थाटलेल्या किंवा नदी-खाड्यांच्या खोर्‍यात दडलेल्या. तसेच, स्थानिक प्रशासनालाही या अनधिकृत ‘रिफायनरीं’च्या काळ्या कारभाराची पूर्ण कल्पना असूनही सरकारी अधिकार्‍यांना चार पैसे चारले की, तिथेही आपसुकच दुर्लक्ष केले जाते. पण, याच भ्रष्टाचारामुळे आणि सरकारच्या भोंगळ कारभारामुळे नायजेरियातील १०० जणांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या मृतदेहांची ओळख पटविणेही आता शक्य नाही!
 
 
मुळात इतर आफ्रिकी देशांप्रमाणे नायजेरियातसुद्धा गरिबी आणि बेरोजगारीने कळस गाठलेला. परिणामी, दोनवेळच्या रोजीरोटीसाठी नायजेरियातील गरीब तरुण या काळ्या सोन्याकडे आकर्षित होतात. तेलाच्या मोठमोठाल्या पाईपला भगदाडं पाडून क्रूड तेलाची बेमालुमपणे चोरी केली जाते. त्यानंतर टँकरमध्ये हे तेल साठवले जाते आणि नंतर अशा अनधिकृत ‘रिफायनरी’मध्ये ते शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. तेलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत या कच्च्या तेलाला उच्च तापमानावर आणून शुद्ध केेले जाते. नेमकी हीच प्रक्रिया त्या अनधिकृत ‘रिफायनरी’त सुरू असताना भडका उडाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कारण, शेवटी ‘रिफायनरी’च अनधिकृत म्हटल्यावर तिथे कामगारांची सुरक्षा, अग्निरोधक यंत्रणा वगैरे अशा कुठल्याही उपाययोजनांचा मागमूसही नव्हता. परिणामी, १०० जणांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही नायजेरियन सरकारने व्यक्त केली आहे. पण, अशा तेलचोरीची आणि अनधिकृत ‘रिफायनरी’मधील दुर्घटनांची ही काही नायजेरियातील पहिलीच घटना नाही. सहा महिन्यांपूर्वीच अशाच एका दुर्घटनेत २५ जणांचा बळी गेला होता. त्याहीपेक्षा भीषण दुर्घटना घडली होती ती १९९८ साली.
 
 
अशाच एका अनधिकृत ‘रिफायनरी’तील आगीच्या भक्ष्यस्थानी एक अख्खे गाव सापडले आणि त्या दुर्घटनेत तब्बल एक हजार नायजेरियन नागरिकांचा अक्षरश: होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही नायजेरियातील सरकारने अशा अनधिकृत ‘रिफायनरी’वर तोंडदेखली कारवाई केली खरी, पण पहिले पाढे पंचावन्न. जसजशी देशातील गरिबी आणि बेरोजगारी फोफावली, तसतसा अशा ‘रिफायनरीज’चा प्रश्न अधिक गंभीर ठरला. जीवितहानीबरोबरच या तेलचोरीमुळे देशाला प्रचंड वित्तहानीला सामोरे जावे लागते. एका आकडेवारीनुसार, दररोज उत्पादित होणार्‍या दीड ते दोन दशलक्ष बॅरल कच्च्या तेलापैकी तब्बल दोन लाख बॅरल तेलाची सर्रास चोरी केली जाते. २०१९ साली नायजेरियन सरकारने यासंबंधी केलेल्या चौकशीअंती, देशाला ४० दशलक्ष बॅरल तेल अशा चोरट्यांमुळे गमवावे लागले, ज्याची किंमत ही २.७७ अब्ज डॉलर इतकी प्रचंड होती. त्यामुळे नायजेरियातील तेलचोरीला केवळ आर्थिक पैलू नसून ही एक मोठी सामाजिक समस्यादेखील आहे. म्हणूनच नायजेरियन सरकारने केवळ एका राज्यातील १४२ पैकी १२८ अनधिकृत ‘रिफायनरी’ जमीनदोस्त केल्या आहेत.पण, तरीही काळ्या सोन्याच्या या लोभाचा तेथील सरकार जोपर्यंत मूळापासून नायनाट करत नाही, तोपर्यंत असे कित्येक जीव आपले आयुष्य स्वाहा करून बसतील!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@