नवी दिल्ली: “इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे भारताचे धोरण आहे. त्यासाठी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’ भारतात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्यास त्यांचे स्वागत आहे. मात्र, चीनमध्ये निर्मिती करून भारतात त्यांची विक्री करण्याचा प्रकार चालणार नाही,” असा स्पष्ट संदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी ‘रायसीना डायलॉग’ या कार्यक्रमात दिला.
ते म्हणाले की, “भारत ही एक मोठी बाजारपेठ असून सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायासाठी भारतात प्रचंड क्षमता आहे. अमेरिकास्थित ‘टेस्ला’ भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असल्यास सरकारची हरकत नाही. परंतु, कंपनीने चीनमध्ये निर्मिती करून त्यांची भारतात आयात करण्याचा प्रकार करू नये. भारतात वाहनांची निर्मिती करावी आणि येथूनच त्यांची निर्यातही करावी, त्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती देशातच व्हावी, यावरही सरकार भर देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत अग्रेसर असणारी अमेरिकेतील ‘टेस्ला’ ही कंपनीही भारतात व्यवसाय करण्यास उत्सुक आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भारताचे धोरण स्पष्ट केले आहे.