“राजकारणाच्या हस्तक्षेपामुळे सहकार क्षेत्राचा ऱ्हास होतो.” : देवेंद्र फडणवीस

    27-Apr-2022
Total Views |

fadanvis

 
 
मुंबई (ओंकार मुळ्ये): “सहकार क्षेत्रात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर सहकाराचा विकास होत नाही. जिथे सरकारनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तिथे सहकाराचा ऱ्हास झाल्याचंच दिसून आलंय. सहकारातली दिशा समाजसेवेची आणि भावना सहकार्याची असेल तरच अशा सहकारी संस्था चांगल्या चालतात. आज सहकार क्षेत्रात मोठ्याप्रमाणात स्थित्यंतर झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच सहकाराला मजबूती देण्याचं काम मोदी सरकारतर्फे केलं जातंय. कारण, सामान्य माणसाची समृद्धी ही सहकारानेच होते.”, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. रायगड सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा 'मुख्यालय व शाखा स्थलांतर सोहळा' मंगळवार, दि. २६ एप्रिल रोजी चिंचपोकळी येथे पार पडला. त्यादरम्यान ते बोलत होते.
 
बँकेच्या नवीन मुख्यालय आणि शाखेचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमास रायगड सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, मनसे नेते बाळा नांदगावकर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, कालिदास खोळमकर, आमदार प्रशांत ठाकूर, विनायक मेटे, आमदार निरंजन डावखरे, नागरी बँक असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार रमेश पाटील, विठ्ठलराव भोसले, प्रकाश दरेकर इत्यादी मान्यवार उपस्थित होते.
फडणवीस यावेळी म्हणाले की, “जी नागरी बँक पूर्णतः अडचणीत होती, विविध प्रकारचे निर्बंध तिच्यावर लागले होते अशा बँकेला आज दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नेतृत्व लाभले. कुठल्याही परिस्थितीत ही बँक पुनर्जीवित झाली पाहिजे आणि चांगल्याप्रकारे चालली पाहिजे, हा विचार दरेकरांनी त्यावेळी केला. त्यामुळे आज पुन्हा एकदा रायगड सहकारी बँकेचे मुख्यालय आणि शाखा यशस्वीपणे सुरू झाले. आता यापुढे ही बँक मागे वळून न पाहता पुढेच जात राहील असा विश्वास आहे.”

Devendra Fadnavis1
 
महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य सहकार क्षेत्र राज्य
“आपल्या महाराष्ट्रात सहकार क्षेत्र हे १९०४ साली सुरू होऊन सहकार कायदा आला. त्यानंतर १९११ साली त्याचं मॉडीफिकेशन करण्यात आलं. धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता या दोन तत्कालीन नेत्यांनी सहकार क्षेत्र सुरू केला. त्यामुळे सध्या महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य सहकार क्षेत्र राज्य आहे. या सहकाराला बळकटी मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार खातं सुरू केलं आणि या सहकार खात्याचे पहिले मंत्री म्हणून गृहमंत्री अमित शाह यांची निवड केली. त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार खात्यास बळकटी येईल यात कुठलीच शंका नाही. मोदी सरकारमुळे आज देशातल्या बऱ्याच बँक नफ्यात असून त्यांची परिस्थिती सुधारली आहे, हे निश्चित.
- भागवत कराड, केंद्रीय मंत्री
सहकार क्षेत्राला उर्जिता अवस्था आणण्याची गरज
“अनेक सहकारी बँक, सहकारी संस्था आज अडचणीत आहेत. त्यामुळे केवळ भाषणं न करता त्यासंदर्भात एक मॉडेल केस तयार केली पाहिजे. सहकार क्षेत्रातल्या शेकडो सहकारी संस्था, पतपेढ्या मुंबईच्या परिसरात आहेत. त्यामुळे एकप्रकारे सहकाराचं माहेरघर असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रात आज सहकार क्षेत्राला उर्जिता अवस्था आणण्याची गरज आहे. एखादी अडचणीतली बँक जगवायची असेल, मोठी करायची असेल तर केवळ नेतृत्व असून पुरेसे नाही. आपल्या सहकारातल्या संस्थांनी, कार्यकर्त्यांनी, ग्राहकांनी मला माझी बँक मोठी करायची आहे, ही बँक कामगारांची आहे, सहकारी संस्थांची आहे, सर्वसामान्यांची आहे; या भावनेनं सर्वांनी थोडाथोडा पुढाकार घेतला तर राज्यातली एकही बँक बुडणार नाही, याची मला खात्री आहे.”
- प्रविण दरेकर, अध्यक्ष, रायगड सहकारी बँक लिमिटेड आणि विरोधी पक्षनेते
 
नागरी सहकारी बँक... सामान्य जनतेच्या अर्थव्यवस्थेचा कणा
“सामान्य जनतेच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकडे पाहिलं जातं. या बँकांचा व्याप आणि प्रसार ही अर्थव्यवस्थेची गरज आहे असं मला वाटतं. यासाठी अशा बँकेचं अस्तीत्वं टिकवणं ही आपली गरज आहे. ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या नागरी सहकारी बँकेकडून घडणं ही सध्या काळाची गरज आहे. त्यासाठी रायगड सहकारी बँक कटिबद्ध आहे.”
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, नागरी बँक असोसिएशन महाराष्ट्र