मुंबई : गेल्या काही दिवसांत कळीचा मुद्दा ठरलेल्या प्रार्थनास्थळांवरील भोग्यांबाबत राज्य सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री १० ते सकाळी ६ याच वेळात वापरण्यावर बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात २००५ साली हे आदेश दिले.
अन्य काही न्यायालयांनीही यासंदर्भात निर्णय दिले. त्याआधारे महाराष्ट्र सरकारने २०१५ ते २०१७ या कालावधीत काही शासन निर्णय काढले आणि त्याआधारे ध्वनिक्षेपकांचा वापर, त्याला द्यायची परवानगी, अटी, शर्थी, वेळ आणि आवाजाची मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्याच आधारे आजपर्यंत राज्यात ध्वनिक्षेपकांचा वापर करता येतो. गेल्या काही दिवसांत ध्वनिक्षेपकांच्या वापरासंदर्भात इशारे दिले जात आहेत. पण, सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावले आहेत, वापर करत आहेत त्यांनीच विचार करायचा आहे,” असे दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.