कोळीवाड्याची रणरागिणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2022   
Total Views |

rajeshree
 
 
राजेश्री भानजी... वर्सोवा कोळीवाड्याच्या रणरागिणी. नव्हे नव्हे मुंबईपासून उत्तनपर्यंच्या किनारपट्टीवर वसलेल्या कोळीवाड्यांच्या हक्काचा आधार म्हणजे राजेश्री. त्यांच्या समाजजीवनाचा घेतलेला मागोवा...
 
 
 
६३ वर्षांच्या राजेश्री यांची अख्खी हयात कोळीवाड्याचे प्रश्न, समस्या यांसाठी चिंतन करण्यात आणि त्या समस्या सोडवण्यातच गेली. त्यांच्या सोबत आज पाच हजार कोळी बांधव सदस्य आहेत. कोळी समाजाचे अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत, नव्हे नव्हे ते अगदी पारंपरिकच आहेत. विकासाच्या नावावर कोळीवाड्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे कोळी बांधवांचे म्हणणे आहे. ‘कोस्टल रोड’मुळेही समस्या उभ्या राहिल्या आहेत. कोळी गावठाणाचे प्रश्नही प्रलंबित आहेत. कोरोना काळापासून आतापर्यंत बांधवांच्या बोटी समुद्रात गेल्याच नाहीत. कामधंदे बंद तर खायचे काय? जगायचे कसे? पर्यावरणाच्या र्‍हासामुळे समुद्रात मासळीवर गाज पडली. सगळे नियम पाळून समुद्रात मासे पकडायला गेले तरी मासळी मिळत नाही. एक ना अनेक प्रश्न. या सगळ्या प्रश्नांवर अनेक लढे, अनेक आंदोलने होतात, तर या सगळ्या समस्यांसाठी अक्षरशः पदराला खार लाऊन आणि पदर खोचून लढ्यासाठी, न्याय्य हक्कासाठी उभ्या राहिल्या त्या राजेश्री भानजी. त्या मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
कोळी समाजाचा कोणताही प्रश्न असू दे, समाजाच्या व्यथा मांडायच्या, तर त्याची धुरा राजेश्री भानजींवर येणारच येणार. कारण, कोणत्याही स्वार्थात, राजकारणात न पडता, एक पैचा भ्रष्टाचार न करता कोण काम करणार हे समाजालाही चांगलेच परिचित! त्यामुळेच मरोळच्या मासळी बाजाराचा प्रश्न उभा राहिला तेव्हा,समाजबांधवांनी एकमुखाने ठरवले की, राजेश्रीच हा प्रश्न सोडवू शकतात. काही वर्षांपूर्वी या परिसरातला पुनर्विकास होणार होता. त्यावेळी ही जागा विकासक लाटणार,असे वातावरण निर्माण झाले. या जागेत आजूबाजूच्या कोळीवाड्यातल्या शेकडो भगिनी मासेविक्रीसाठी यायच्या. जर ही जागा अशी गेली असती, तर या भगिनींचा व्यवसाय, रोजीरोटी बुडाली असती. त्यावेळी राजेश्री यांनी समाजबांधवांच्या मदतीने जोरदार लढा दिला. कोळीबांधवांच्या व्यवसायासाठी ती हक्काची जागा मिळवून दिली. इतकेच काय? या मासळी बाजाराला सुविधा मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
यापूर्वीही यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होतेच. पण सुविधा मिळाल्या नाहीत. राजेश्री यांनी समाजबांधवांना एकत्रित केले. कायदेशीर मार्गाने प्रशासकीय तंत्राचा, नियमांचा वापर केला. महानगरपालिकेच्या माध्यमातून या बाजाराचा विकास करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. हा बाजार इथून उठवावा आणि ही मोक्याची जागा हस्तगत करावी, यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. साम, दाम, दंड, भेदाचा मार्ग वापरत होते. याच काळात एक व्यक्ती राजेश्री यांच्याकडे आली व म्हणाली, “ताई, या जागेतील १२०० ‘स्क्वेअर’ फूट जागा माझी आहे, असे तुम्ही बोललात तर तुम्हाला जागेची जी किंमत चालली आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही बोलाल ती रक्कम देऊ, फक्त तुम्ही बोला.” राजेश्री यांनी त्या माणसाचा प्रस्ताव तर फेटाळून लावलाच शिवाय या जागेवर समाजाच्या व्यवसायासंदर्भात आणखीन सुविधा कशा निर्माण करता येतील, याकडे त्यांनी मोर्चा वळवला.
 
हे सगळे वाचले-ऐकले की वाटते, राजेश्री कुणीतरी नेत्याच्या कुटुंबातली महिला असावी, नाही तर उच्चशिक्षित असावी किंवा सामाजिक चळवळीतली महिला असावी. पण यापैकी तसे काही नाही. राजेश्री भानजी या वर्सोव्यातल्या कोळी समाजाच्या महिला. त्यांचे वडील हरिश्चंद्र कठीण आणि आई चंद्राबाई कठीण. त्यांचे कुटुंब बोटीवरून आलेलीमासळी सुकवण्याचा व्यवसाय करायचे. इयत्ता तिसरीला असल्यापासूनच राजेश्री मासे सुकवण्याचे काम करू लागल्या. पहाटे लवकर उठून त्या आई-भावासोबत वर्सोवा खाडीला जायच्या. तिथे उतरवलेली मासळी सुकवण्याच्या कामात मदत करायच्या. यामुळे त्यांची शाळा सुटली. राजेश्री यांना शाळेत जायची, अभ्यास करायची खूप इच्छा, पण त्यांना शाळा सोडावी लागली. पुढे त्या भेंडीबाजार परिसरात मासे विक्रीसाठी जाऊ लागल्या. या सगळ्या काळात स्वत:च्या, आणि समाजातील भगिनींच्या जगण्याबाबत त्या विचार करत.
 
पुढे १६व्या वर्षी त्यांचा विवाह प्रकाश भानजी यांच्याशी झाला. घरात २५ पेक्षा जास्त माणसं. सासरचे सगळे मिळून-मिसळून राहणारे. घरात दोन बोटी. पण एक बोट अपघातामध्ये जळाली. पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी सरकारी योजनेतून बोट घेतली. पण ही प्रक्रिया आणि त्याचे परिणाम काय असतात हेसुद्धा राजेश्री यांनी जवळून पाहिले. व्याज त्यावर चक्रवाढ व्याज, यामुळे पिचलेली कोळी कुटुंब पाहताना राजेश्री विचार करत की, सरकारी योजनांचा सुविधांचा या कोळीवाड्याला कधी उपयोग होणार? गटतट न करता एकत्रितरित्या सगळा समाज गोळा झाला, तर समाजाचे भले होऊ शकते. या सगळ्याबाबत नुसता विचार न करता त्या याबद्दल जुन्या जाणत्या लोकांशी संपर्क करत संवाद साधत. त्या अल्पसाक्षर आहेत. पण जीवनाचे उच्चशिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यामुळेच समाजाचे प्रश्न त्या कोणत्याही व्यासपीठावरून तळमळीने मांडू शकतात.
 
त्यांच्या एका आवाजावर हजारो समाजबांधव एकत्रित होतात. आज त्या समाजाच्या व्यावसाययिकांसोबतच समाजात कौटुंबिक सलोखा कसा राहील? शिक्षणाचा स्तर कसा वाढेल? आधुनिक आणि प्रगतीच्या आयामात समाज कसा विकसित होईल, यासाठी जागृती करतात. कष्टकरी कोळी भगिनी ठरवून कधी सहलीला घेऊन जातात. चार-आठ दिवस या भगिनी माहेरपण अनुभवतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यातही अनेक वैयक्तिक समस्या आल्या, संकटे आली. पण त्या डगमगल्या नाहीत. घरातल्यांच्या सोबतीने त्यांनी ते प्रश्न मार्गी लावले. मुंबईच्या किनारपट्टीवरील कोळी समाजाचे प्रश्न न्यायपूर्वक सोडवण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक क्षणी कार्य करायचे आहे, असे राजेश्री भानजी म्हणतात. राजेश्री भानजी म्हणजे कोळीवाड्याची रणरागिणीच...
 
 
@@AUTHORINFO_V1@@