अमर्याद नैसर्गिक आपत्ती मग ती महामारी जरी असली तरी विविध प्रकारच्या भिन्न आणि तीव्र भावना माणसाला जाणवणे सर्वसामान्य आहे. या भावनांचा सामना आपण एकटे आणि एकत्रितपणे कसे करतो, यावर आपण या आपत्तीतून आपल्याला कसे सांभाळणार आहोत आणि त्यातून कसे बाहेर येऊ शकू, हे अवलंबून राहणार आहे.
कोविड-१९’च्या गेल्या दोन वर्षांतील महामारीच्या संघर्षात कोणताही उद्योग त्याअर्थाने वाचला नाही. प्रत्येक माणसाचे वैयक्तिक जीवन आणि व्यवसायांना नवीन प्रकारच्या बदलांना व नवीन सामान्य परिस्थितीशी जुळवून घेण्याशिवाय खरतंर पर्यायच नव्हता. या दरम्यान जे व्यत्यय आणि अडचणी आल्या, त्यामध्ये मुख्यत्वेकरून ‘लॉकडाऊन’, कडक सीमा नियंत्रण आणि प्रवासावरील निर्बंध यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या परिस्थितीत सर्व देश केवळ कोरोना रोखण्यातच नाही, तर महामारीच्या परिस्थितीनंतर व्यवसाय कसे विकसित करायचे, काय ‘स्ट्रॅटेजी’ वापरायच्या, यावर लक्ष केंद्रित करून आहेत. या दरम्यान आपआपल्या देशांत परिस्थितीला किती विधायकपणे हाताळायला पाहिजे, यासंबंधित लोकांना आणि अधिकार्यांना दिशा दाखवण्यासाठी केलेले सरकारी प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. तरीही सामान्यतः लोकांना असे वाटते की, ‘नवीन सामान्य’ म्हणजे आपल्या सगळ्यांचे आयुष्य हे पूर्वीसारखेच सामान्य होणार आहे. हे अशावेळी घडत आहे की, महामारी अजूनही पूर्णपणे आपल्यातून गेलेली नाही. विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये आजघडीलाही ‘कोविड’चे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
आजपर्यंत झालेल्या साध्या साथी जसे, ‘मलेरिया’ असेल, ‘डेंग्यू’ असेल किंवा महामारीच्या ‘प्लेग’ वा कोरोना विषाणूच्या साथी असतील, तथापि विषाणू संसर्ग होण्याची भीती, मृत्यूची भीती आणि आपल्या माणसापासून दुरावण्याची चिंता यामुळे माणसाच्या आयुष्यात झालेला बदल अभूतपूर्व असेल. परिणामी, आपली विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन आणि वागणूक आमूलाग्र बदलली आहे. यामुळे आपल्या जगण्याच्या पद्धतीवर कसा बदल झाला आहे, हे जाणून घेणे केवळ गंभीर नाही. पण, अभ्यास करण्याजोगे आहे.
अमर्याद नैसर्गिक आपत्ती मग ती महामारी जरी असली तरी विविध प्रकारच्या भिन्न आणि तीव्र भावना माणसाला जाणवणे सर्वसामान्य आहे. या भावनांचा सामना आपण एकटे आणि एकत्रितपणे कसे करतो, यावर आपण या आपत्तीतून आपल्याला कसे सांभाळणार आहोत आणि त्यातून कसे बाहेर येऊ शकू, हे अवलंबून राहणार आहे.
प्रथम आपण या महामारीतील जे सामान्य नकारात्मक बदल आहेत ते पाहूया. पहिली गोष्ट झाली ती म्हणजे आपली भावनिक सक्षमता कमी झाली. कारण, आपण आपल्या सगेसोयर्यांना अभिवादन करू शकत नव्हतो, आलिंगन देऊ शकत नव्हतो, पाश्चत्य संस्कृतीत मिठी मारणे वा चुंबन घेऊन आपल्या प्रिय माणसाबरोबर आपले प्रेम व सख्य प्रदर्शित करायची सर्वमान्य सर्वसामान्य गोष्ट आहे. आपल्याकडे विविध समारंभात एकत्र भेटून एकमेकांचा हालहवाल विचारणे नटूनथटून आनंद व्यक्त करणे, अशी पारंपरिक प्रथा आहे.या सर्व सवयीतून आपण आपल्या प्रिय व्यक्तींशी, नातेवाईकांशी आणि मित्रमैत्रिणींशी सकारात्मक, भावनिक पातळीवर जोडले जातो. आपल्याला आनंद व सुरक्षितता या दोन्हींचा छान भावना समृद्ध करणारा अनुभव मिळतो. दैनंदिन जीवनात या अशा मानसिक सख्य निर्माण करणार्या भावनांना नितांत महत्त्व आहे. अनेक देशांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि विशिष्ट वयोगटातील मुलांना मैदाने वा सामाजिक कट्टे, अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करायची परवानगी नव्हती, याचा परिणाम या विशिष्ट लोकांमध्ये खूप नकारात्मक झाला. त्यांचा भावनिक दर्जा ढासळला. विशेषत: जे ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, त्यांना यामुळे खूप अस्वस्थता आली. स्मृती विसरल्यासारखे वाटले.
जीवनशैली विषयकआजारात वाढ झाली. मुलांमध्ये अगदी साध्यासाध्या गोष्टी जसे मनमिळावू वृत्तीने एकमेकांना भेटणे वा वाढदिवसासारखे आनंदी प्रसंग उत्साहात साजरे करणे, यांसारख्याआनंदी घटनांवरही मर्यादा आली. या दरम्यान नैराश्याच्या विकारामध्ये १५.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. नोकर्या कमी होण्याचे साध्य प्रमाण चिंता करण्यासारखे आहे आणि उत्पन्नाचे कोणतेही स्रोत मिळत नसल्याने लोकांना त्यांची जीवनशैली गुणवत्तेच्या दर्जातून समायोजित करण्यास भाग पडले आहे. म्हणजे कोरोना आता जातो आहे म्हणून जीवाला जी भीती वाटत होती, ती आज जरी कमी झाली असली तरी प्रसन्नता मिळवता येणार्या अनेक सवयींना आता सगळ्यांना बांध घालावा लागत आहे. ‘कोविड’ प्रभावित बहुतेक देशांमध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बंद पडल्याने आर्थिक निरीक्षक जागतिक मंदी आणि अमर्याद महागाईचा अंदाज वर्तवत आहे. अनौपचारिक अर्थव्यवस्थेतील कामगार आज विशेष करून असुरक्षित आहे. कारण, बहुतेक लोकांना सामाजिक संरक्षण, आर्थिक संरक्षण आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही.
या सर्व कामगारांना या घडीला उत्पादक व्यवसायांमध्ये मुळात प्रवेश मिळणे केवळ अशक्य आहे. अनेकजण उत्पन्न मिळवण्याच्या संधी न मिळाल्यामुळे स्वत:चे आणि त्यांच्या कुटुंबांचे पोट भरण्यास असमर्थ आहेत. बहुतांश लोकांना उत्पन्नाचे मार्ग नसल्याने अन्न नाही किंवा कमी अन्न आणि कमी पौष्टिक आहार यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या खूप प्रमाणात जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये ‘कोविड-19’साथीच्या आजाराचे काम आणि करिअरवर जे नकारात्मक व्यापक परिणाम झाले आहेत, त्याचा उत्तम अभ्यास झाला आहे. लाखो व्यावसायिकांनी त्यांच्या कर्मचार्यांच्या पगारात कपात केली आहे. एकट्या अमेरिकेमध्ये जवळजवळ चार ते पाच दशलक्ष नोकर्या आधीच नाहीशा झाल्या आहेत. अनेकांनी त्याचे जीवनमान गमावले आहे. (क्रमश:)
- डॉ. शुभांगी पारकर