५ हजार किमी अंतर कापत नवी मुंबईतील पक्षी पोहोचला सायबेरियात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2022   
Total Views |
Redshank21
 
 
मुंबई (उमंग काळे): नवी मुंबईत रिंग केलेला 'लाल टिलवा' पक्षी (रेडशॅंक) सायबेरियामधील अल्टाई भागात आढळून आला आहे. 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) रिंग केलेल्या पक्ष्याने या प्रवासादरम्यान तब्बल ५ हजार किमीचे अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
पक्षी स्थलांतराच्या एकूण आठ आकाशमार्गांपैकी 'सेंट्रल एशियन फ्लायवे' या आकाशमार्गामध्ये भारताचा समावेश होतो. या आकाशमार्गावरून उत्तर आशियातील बहुतांश पक्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात. 'बीएनएचएस'कडून या स्थलांतराचा शास्त्रीय अभ्यास गेल्या सहा ते सात दशकांपासून सुरू आहे. हा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीद्वारे केला जातो. 'रिंग' आणि 'कलर फ्लॅग' ही त्यामधील सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत जगभर वापरली जाते. यामध्ये पक्ष्याच्या पायाला सांकेतिक क्रमांक असलेली ‘रिंग’ आणि विशिष्ट रंगाचा ‘फ्लॅग’ लावण्यात येतो. या 'फ्लॅग'चा रंग हा प्रत्येक देशानुसार वेगवेगळा असतो आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार संशोधकांना रंगाचा हा नियम पाळूनच पक्ष्यांच्या पायात 'फ्लॅग' लावावा लागतो. आतापर्यंत 'बीएनएचएस'च्या टीमने गेल्या तीन वर्षांमध्ये १० हजाराहून अधिक पक्ष्यांना 'रिंग' केले आहे.
 
 
 
 
सध्या उन्हाळ्याच्या तोंडावर भारतात स्थलांतरित झालेले पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परतत आहेत. यामाध्यमातून पक्षी स्थलांतरासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. रेडशॅंक पक्ष्याच्या स्थलांतराबाबत अशीच एक नोंद समोर आली आहे. 'बीएनएचएस'ने नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य पाणथळीवर ५ फेब्रुवारी, २०२० रोजी रेडशॅंक पक्ष्याच्या पायात रिंग लावली होती. आता साधारण दोन वर्षांनंतर हा पक्षी सायबेरियातील अल्टाई या भागात आढळून आला आहे. अल्टाई हे दक्षिण सायबेरियातील एक रशियन प्रजासत्ताक आहे. देशाच्या भूभागात अल्टाई पर्वत आणि आसपासच्या बर्फाळ प्रदेशात अल्पाइन कुरण आणि हजारो तलाव आहेत. हा एक जैवविविधतेने नटलेला प्रदेश आहे. याठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या पक्षीनिरीक्षकांना १८ एप्रिल रोजी रिंग केलेला रेडशॅंक पक्षी दिसला. त्यांनी यासंदर्भातील माहिती 'बीएनएचएस'ला कळवली. त्यानंतर 'बीएनएचएस'ने यासंदर्भातील माहिती टि्वट करुन दिली. रेडशॅंक पक्ष्याच्या स्थलांतराविषयी झालेली ही नोंद महत्त्वाची असून त्याने या प्रवासात ५,१०० किमी अंतर (सरळ रेषेत) कापल्याची शक्यता आहे.
 
 
 
रेडशँकबद्दल माहिती:
रेडशँकचे पाय लाल रंगाचे, लांब आणि चमकदार असतात. रेडशँक हा एक मोठा 'सँडपाइपर' आहे. तलाव, दलदल, चिखल आणि किनारी ओलसर जमिनीच्या सभोवतालच्या उथळ पाण्यात हे अन्न शोधतात. आणि खुल्या दलदलीत, चिखलात आणि खारट जमिनीवर वीण करतात
 
 
@@AUTHORINFO_V1@@