मुंबई: महापालिकेतील ढिसाळ कारभाराविरोधात पहारेकर्यांनी सुरू केलेल्या ‘पोलखोल अभियाना’च्या सभा थांबविण्यासाठी सत्ताधार्यांचा पोलिसांवर दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघात भोईवाडा येथे भाजप नेत्यांच्या वतीनेआयोजित करण्यात आलेली ‘पोलखोल अभियाना’ची सभा पोलिसांनी थांबविल्याचा प्रकार रविवारी घडला. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली. यात काही पोलीस अधिकारी भाजप नेत्यांसोबत संवाद साधत असताना याबाबत वरिष्ठांशी बोलणे झाले असल्याचा दावा करत आहेत. सभा थांबविण्याचे नेमके कारण विचारल्यावर पोलीस अधिकार्यांनीच थेट वरिष्ठांशी बोलणे झाल्याचे म्हटल्याने याबाबत संशयाचे वातावरण तयार झाल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. ‘पोलखोल’ सभा थांबविण्यासाठी पोलिसांवर सत्ताधार्यांचा दबाव आहे का, असा सवाल भाजप नेत्यांच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे.