राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

    25-Apr-2022
Total Views |

rana
 
 
 
 
 
मुंबई: ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणासाठी आक्रमक पवित्रा घेणार्‍या अमरावतीतील राणा दाम्पत्याला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने रविवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.राणा दाम्पत्याच्यावतीने वकील रिझवान मर्चंट यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र, त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. दरम्यान, राणा दाम्पत्याविरोधात पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचे समजते.

 
 
 
...तर आम्हाला फाशी द्या!
 
या सर्वप्रकारानंतर खा. नवनीत राणा यांनी ‘ट्विट’ करत आपले म्हणणे मांडले. त्यांनी म्हटले की, “हनुमान चालीसा पठण करणे, गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या. हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? ‘कलम १२४ (अ)’ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की, हनुमान चालीसा पठण करणे जर गुन्हा असेल, तर आम्हाला फाशी द्या,” असे त्यांनी म्हटले. तर, अन्य एका ‘ट्विट’मध्ये त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसाचे पठण केले,” असे त्यांनी सांगितले.
 
 
 
हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही, तर पाकिस्तानमध्ये बोलणार का?
 
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याबाबत म्हणाले की, “हनुमान चालीसा बोलू, असे म्हणणार्‍या लोकांना त्यांच्या घरी जाऊन अटक केली जाते. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही, तर पाकिस्तानमध्ये बोलणार का? पोलिसांनी एका महिलेला रात्रभर कोठडीत ठेवले. एका महिलेला घाबरून शिवसैनिकांना तिच्यावर हल्ला करायला सांगण्यात आला,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.