लाखो पुस्तकं वाचण्याचा अनोखा संकल्प

आटपाडीतल्या वाचन कट्टा चळवळीच्या उपक्रमास देश-विदेशातून प्रतिसाद

    25-Apr-2022
Total Views |

Pustak Vachan Upakram
 
 
 
पुणे (दि. २५ एप्रिल) : सांगली येथे असलेल्या आटपाडी तालुक्याचे शिल्पकार आणि माजी सभापती कै. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तब्बल '१ लाख पुस्तकांचे वाचन आणि आकलन' करण्याचा संकल्प वाचन कट्टा चळवळीमार्फत आखण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या अनोख्या उपक्रमास थेट परदेशातूनही प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात अनेक शाळकरी मुलांसह ८० वर्षांवरील ज्येष्ठ वाचकही जोडल्याचे दिसत आहे. आटपाडी तालुका साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि बाबासाहेब देशमुख यांचे चिरंजीव अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
 
 
 
आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया अशा अनेक देश-विदेशातील शेकडो वाचकांनी या उपक्रमात आपला सहभाग उत्साहाने दर्शविला आहे. या उपक्रमात विशेषतः स्पर्धात्मक सहभाग वाढवून वाचनाची गोडी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. ९६ वर्षाचे ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब पुजारी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून त्यांनी स्वतः अमरसिंह देशमुख यांना पत्र पाठवून उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. तसेच यात ८२ वर्षाच्या पुष्पावती मुळे यांही या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.    
 
 
 
समाजात वाचन चळवळीचा प्रसार करण्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू केला असल्याचे अमरसिंह देशमुख यांनी सांगितले. या उपक्रमात आज स्थानिक पातळीपासून ते अगदी जागतिक स्तरापर्यंत विविध वाचकांचा सहभाग आणि सहकार्य मिळत आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार वर्ग, गृहिणी, इ. अशा समाजातील विविध स्तरावरच्या घटकांनी या पुस्तक वाचनाच्या अनोख्या चळवळीत सहभाग घेतल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. 'मानसिक ताणतणावातून बाहेर येण्यासाठी वाचन आणि आकलन हा एक उत्तम मार्ग असू शकतो', या विचारांनी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 
 
 

Aatpadi 
 
 
 
"कै. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने १ लाख पुस्तकं वाचायचा उपक्रम रबवण्याचं आम्ही काही काही वर्षांपूर्वी ठरवलं. प्राथमिक शाळेपासून, महाविद्यालय ते अगदी ज्येष्ठ नगरिकांपर्यंत सर्वांना यात सहभागी आहेत. मुलांना वाचनाची सवय लागवी हा यामागचा मूळ हेतु आहे. कारण आजच्या मुलांमध्ये अवांतर वाचन हा प्रकार बंद झाला आहे. त्यामुळे सध्या अशी चळवळ उभारण्याचा प्रयत्नात आम्ही आहोत. गावात प्रत्येक शनिवारी प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबावला जातो."
 
- अमरसिंह (बापू) देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद (ता. आटपाडी)
 
 
 
"उपक्रमाच्या सुरुवतीच्या दोन वर्षात साधारण चारशे ते पाचशे जणांचा यात सहभाग होता. त्यानंतर कोरोना काळात प्रत्यक्षात हा उपक्रम घेणं शक्य झालं नाही. त्यामुळे ऑनलाइन सरूपात तो घेण्यात आला. यंदा साधारण २० हजात जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या उपक्रमास वयाचे आणि भाषेचे बंधन नसल्याने कुठल्याही वयाची व्यक्ती यात सहभागी होऊन आपल्या आवडत्या भाषेचे पुस्तक वाचू शकते. फक्त वाचन नव्हे तर पुस्तकाचे आकलन करून त्याबद्दलचे लिखाणसुद्धा आम्ही यावेळी वाचकांना करायला सांगतो. त्यामुळे आज बरीच जणं यात प्रचंड उत्साहाने सहभागी होत आहेत."
 
 - दिनेश देशमुख, कार्यवाह, पुस्तक वाचन व आकलन उपक्रम