हजारो शेतीविषयक कात्रणांचा संग्राहक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2022   
Total Views |

manasa
 
गरिबीमुळे दहावीनंतर शिक्षण सोडले. मात्र, शेतीविषयक कात्रणांचा संग्रह त्यांनी सुरूच ठेवला. जाणून घेऊया सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते आणि हजारो शेतीविषयक दस्तावेजांचे संग्राहक संजय गुरव यांच्याविषयी...
 
 
सातारा जिल्ह्यातील नागझरी हे संजय गुरव यांचे मूळ गाव. मात्र, वडील मुंबईत माथाडी कामगार असल्याने त्यांचे बालपण भांडुपमध्ये गेले. शालेय वयात त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वडिलांसोबत सुट्टीच्या दिवशी फिरायला गेल्यानंतर वडील त्यांना ‘चांदोबा’, ‘ठकास महाठक’ अशी गोष्टींची पुस्तके घेऊन देत. बालपणीच त्यांच्यावर रा. स्व. संघाचे संस्कार झाले. सातवीनंतर त्यांनी ठाण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान, शेअर बाजार, शेतीविषयक वाचनाकडे त्यांचा कल वाढला. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्रांमधील शेतीविषयक कात्रणे, तसेच मासिके, साप्ताहिके यांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. माथाडी कामगार असलेल्या वडिलांना प्रकृतीच्या कारणास्तव काम करणे शक्य नसल्याने आईने भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. पैशांअभावी संजय यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी हमालीपासून ते पाकिटे बनविण्याचे कामही केले. त्यावेळी त्यांना ९० रुपये पगार मिळायचा. यावेळी, “तू गुरव आहे, मात्र पुजेचे काम सोडून चांभारासारखी कामे करतो,” अशा पद्धतीची टीकाही सहन करावी लागली. १९८८ साली त्यांना एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाची नोकरी लागली.
 
 
सेंद्रीय शेतीकडे संजय यांचा ओढा वाढल्याने भविष्यात सेंद्रीय शेतीचे प्रयोग करण्याचे स्वप्न संजय यांनी पाहिले. त्यासाठी ते वृत्तपत्रांमधील शेतीविषयासंदर्भातील माहिती व प्रयोगांची कात्रणे संग्रहित करू लागले. विविध मासिके, पुस्तकेही संग्रही ठेऊ लागले. कुठे काहीही वाचायला मिळाल्यास ते किमान त्याचे झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवत. विशेष म्हणजे, ते सोबत कायम कात्री ठेवत जेणेकरून कुठेही माहिती मिळाल्यास कात्रण कापता येईल. सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असताना त्यांना वाचनासाठी बराच वेळ मिळू लागला. त्यामुळे ते जे दिसेल ते वाचत. कात्रणे जमवण्यासाठी ते गरज पडल्यास कामालाही दांडी मारत. घरात नुसती कात्रणे आणि वृत्तपत्रांचा खच पडत असल्याने त्यांना घरच्यांची नाराजीही सहन करावी लागत. मात्र, भविष्यात कधीतरी सेंद्रीय शेती करण्याची संधी मिळेल, अशी आशा बाळगत ते त्याकडे दुर्लक्ष करत. मासिकातील एखाद्या लेखाविषयी माहिती मिळाल्यास ते पत्र लिहून पोस्टाद्वारे मासिक घरी मागवत.
 
 
 
 
 
१९९५ साली लग्नबंधनात अडकल्यानंतर पत्नी एका कंपनीत नोकरी करू लागली. त्यामुळे संसाराचा गाडा रूळावर येऊ लागला, तरीही आयुष्यात सेंद्रीय शेती करण्याचा ध्यास त्यांच्या मनात कायम होता. त्यातच १९९९ साली वडील आणि २००८ला आईच्या निधनाने संजय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अन् कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. दरम्यान, 2011 साली कात्रणे जमवण्याच्या संग्रहाची व सेंद्रीय शेतीविषयीच्या आवडीची दखल एका वृत्तपत्राने घेतली. सदर बातमी वाचून डोंबिवलीतील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याशी संपर्क करत स्वतःच्या 30 एकर जमिनीवर सेेंद्रीय शेतीचे प्रयोग करण्याचा प्रस्ताव संजय यांना दिला. तो मान्य करत त्यांनी सुरक्षारक्षकाची नोकरी सोडून याठिकाणी आंबा, चिकू, नारळ, आवळा यांसह मेथी, कोथिंबिरीचे उत्पादन घेतले. केवळ वाचन केलेले असल्याने, त्यांना प्रायोगिक शेतीत अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी त्यावरही मात केली.
 
सात वर्षानंतर त्यांना पुण्याहून विजय कुलकर्णी यांचा फोन आला. कुलकर्णी यांनी त्यांची नागझरीतील १५ एकर शेती करण्याचा प्रस्ताव संजय यांना दिला. मूळ गावीच शेती करण्याची संधी चालून आल्याने त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला. सुरुवातीला दोन एकरात त्यांनी शेवग्याची लागवड केली. मात्र, त्यावर प्रचंड रोग पसरला. मात्र, तरीही त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. अखेर सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या शेवग्याच्या शेंगा प्रचंड गोड आणि उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया त्यांना मिळू लागल्या. यानंतर त्यांनी बटाटा, आलं, सीताफळ, हळदीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, विजय कुलकर्णी यांनी पूर्ण स्वातंत्र्यासह संजय यांना आर्थिक भांडवल उभे करून देत एक दुचाकीदेखील घेऊन दिली.
 
हळदीची पावडर करून ती ‘पॅकेजिंग’करून विकणे व शेतीला निसर्गपर्यटन ठिकाण म्हणून विकसित करण्याचा संजय यांचा मानस आहे. तीन गायी विकत घेऊन संजय यांनी दूधविक्रीचा व्यवसायही सुरू केला आहे. गोमूत्र, कडुनिंबाचा काढा ते फवारणीसाठी करतात, तर रासायनिक खतांऐवजी शेणखताच्या वापराला प्राधान्य देतात. अनेकजण दुरवरून त्यांचे हे सेंद्रीय शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी येतात. कुठे कृषी प्रदर्शन, मेळावा असल्याचे समजताच ते त्याठिकाणी हजेरी लावतात. सध्या संजय यांच्याकडे हजारो शेतीविषयक कात्रणे आणि पुस्तकांचा संग्रह असून ते सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी खास एक खोली भाड्याने घेतली आहे. या संग्रहाचे भविष्यात संग्रहालय उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. संजय हे महिन्यातून काही दिवस भांडुप येथील घरी येऊन सर्व वृत्तपत्रांतील कात्रणे संग्रहित करतात.
 
सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. त्याचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे. भाजी विकत घेताना योग्य चौकशी करून विकत घेण्याचे आवाहन संजय करतात. हलाखीच्या परिस्थितीवर संघर्षाने मात करत सेंद्रीय शेतीसाठी आग्रही असणार्‍या व त्यासाठी धडपड करणार्‍या संजय गुरव यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
@@AUTHORINFO_V1@@