गदाधारी ते दगाधारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2022   
Total Views |

rana
 
 
 
आमचे सैनिक काय करतील ते पाहा,” इती संजय राऊत. हो हो ते काय करतील ते दिसेलच पण त्यांच्या हातून कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन झाले तर? त्यातून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली तर? त्या सैनिकांच्या घरच्या जबाबदार्‍या हे नेते घेणार का? ते म्हणाले, “हजारो सैनिक ‘मातोश्री’समोर जमलेत.” पण नारायण राणे यांनी ‘मातोश्री’समोर किती सैनिक जमले हे आकडेवारीनिशी सांगितले. अर्थात ८०-९० च्या दशकात गाव तिथे शिवसेना शाखा पोहोचली. पण आता? आता ८०च्या दशकात, ९०च्या दंगलीत हिंदुत्वासाठी, सामान्य मराठी माणसांच्या हक्कासाठी उतरलेले ते सैनिक, त्या रणरागिण्या कुठे आहेत? मुंबई आणि ठाण्यातून जादुईरित्या हद्दपार होत तो हाडाचा सैनिक कुठे गेला? उत्तर नाही.
 
 
 
राणा दाम्पत्य आणि सैनिक यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “आमच्यासमोर माज नको आम्ही जन्मताच माजोर्डे आहोत.” पण हा माजोर्डेपणा कुणामुळे? दिवस दिवस उपाशी तापाशी आंदोलन करणारा, हक्कासाठी राडा करणारा तो शिवसैनिक नितीमान होता. त्याला काय मिळाले? सांगा? त्यांचा मुलगा ना मंत्री झाला ना त्याला थेट ‘युवा नेता’ बिरूदावली मिळाली. या कट्टर सैनिकांच्या मुलांच्या नावावर विकएंडसाठी रिसॉर्टस, हॉटेल आणि मोठमोठ्या जागा मिळाल्या का? छे! त्याचं मुंबईतलं राहतं घर पुनर्विकासाच्या नावाखाली गिळलं गेलं. त्या खर्‍या मुंबईकरांच्या घराला गिळणार्‍या, कष्टाचे घर मोडणार्‍या बिल्डरचे लागेबांधे कुणाशी आहेत? शेतकर्‍यांना मोबदला मिळत नाही, वीजसंकटाने शेतपीक आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण या शेतकर्‍यांतील सैनिकांनाही काही मिळाले का? खस्ता खात हप्त्यावर घेतलेल्या रिक्षा, त्या रिक्षांवरही आवाज कुणाचा लिहिणार्‍या, पक्षासाठी वाट्टेल ते करणार्‍या त्या रिक्षाचालकाला कोरोनादरम्यान अनुदान मिळाले का? शिवभोजन थाळीचे वास्तव तर जगजाहीर. या अशा पार्श्वभूमीवर जेव्हा हे स्वयंघोषित नेते (पक्षी : मुख्यमंत्रिपदी डोळा ठेवणारे स्वप्नाळू) म्हणाले की, माझे सैनिक रस्त्यावर उतरतील तेव्हा वाटते की, मराठी माणसांचे अंतरंग यांना समजत नाही का? की, आमचे हिंदुत्वच गदाधारी म्हणत ते दगाधारी झाले म्हणून त्यांना काहीच कळेनासे झाले.
 
 
 
 
जनता ही शक्तीमान
 
भोंगे, हनुमान चालीसा, अमोल मिटकरी या सगळ्यांच्या गदारोळात नवाब मलिक, देशमुख, मुख्यमंत्री आणि परिवाराभोवती नऊ बंगल्यांचे उठलेले कथित वादळ, सरकारी वकिलाच्या कारस्थानाने गाजलेली घटना सगळे सगळे शमले. इतकेच काय? संजय राऊत यांच्या मालमत्तेवरही टाच आली, ते प्रकरणही शांत झाले. अगदी तसेच शांत जसे हिरेनचा मृत्यू, पूजा चव्हाण, दिशाचा आणि सुशांतची आत्महत्या त्या साधुंचे हत्याकांड. या देशात नव्हे नव्हे सध्या तरी महाराष्ट्रात सगळे हेच सुरू आहे. एक घटना घडली, तिचे पडसाद जनतेत महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताधार्‍यांविरोधात उमटू लागले की, मग लगेच दुसरी घटना घडते. सोपे आहे. महाराष्ट्रातली जनता मग पहिली घटना विसरून दुसर्‍या घटनेवर बोलू लागते. कदाचित हा ‘प्लॅन ए’, ‘प्लॅन बी’ आणि ‘प्लॅन सी’, अशी नियोजनबद्ध तयारी असेल का? म्हणजे असे की, सगळ्यात शेवटचा प्लॅन यशस्वी करायचा आहे.
 
 
त्यासाठी कोंबड्यांना जसे दाणे टाकतात तसे एकामागून एक घटना घडवत जायची. लोक एकामागोमाग घडलेल्या घटनांवर तावातावाने मत मांडतील. आक्षेप घेतील. पण या घटनांची तीव्रता इतकी वाढवायची की, शेवटी जनतेला या घटनांचे अप्रुपच वाटेनासे होते. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ म्हणत जनता म्हणते इतके सगळे घडले त्याचे काही झाले नाही. आपण का विरोध करायचा? जाऊ दे आपल्याला काय करायचे आहे? तर ही अशी मानसिकता सध्या महाराष्ट्रात आहे. सत्ताधारी आणि राजकीय मंडळी काय वाट्टेल ते करत आहेत. वरकरणी दृश्य आहे की, जनता हतबलपणे सारे पाहते. कारण, इथे विपक्षातल्या मोठमोठ्या नेत्यांवर हल्ले होतात. काही ना काही कारण दाखवून कारवाया होतात. पण हेच सदासर्वकाळ राहील का? नाही, तर ही जनताच जनार्दन आहे. ही जनशक्ती अजूनही संयमी आणि नितीमान आहे. पण, सहनशक्तीलाही मर्यादा आहेतच. त्यामुळे ज्या भ्रष्टाचार्‍यांनी स्वतःच्या सत्तेेसाठी महाराष्ट्राला अक्षरशः त्राही केले आहेे त्यांना ही जनशक्ती जाब विचारेलच. कारण, शेवटी गाव करेल ते राव करू शकत नाही. महाराष्ट्राची जनता जे करू शकेल ते कोणत्याही पातळीवर कुरघोडी करून सत्ता हस्तगत करणारे करू शकणार नाहीत, ‘आशा है वो सुबह कभी तो आयेगी...’
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@