बोरिस जॉन्सन आणि भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2022   
Total Views |
 
india
 
 
जागतिक राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय संबंधात एकच सत्य कायम स्वीकारले जाते ते म्हणजे स्वराष्ट्राचे हित. त्यामुळेच आज सोबत असणारे राष्ट्र उद्याही सोबतच असेल असे नाही. तेव्हा एका राष्ट्रासमवेत असणारे नाते कायम तसेच असेल असे नाही. भारत व रशिया यांचे संबंध हे असेच जुने आणि उत्तम. मात्र, सध्या रशिया अडकला आहे, युक्रेन संघर्षात. अशावेळी रशियावरच आगामी काळातही अवलंबून राहिल्यास त्याचे वेगळे परिणाम होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. जगाच्या क्षितीजावर एका नव्या आशेने व दिशेने प्रवास करू पाहणार्‍या भारताचे धोरण कधीही कुचकामी असणे स्वागतार्ह नक्कीच नाही. त्यातच भारताचे जागतिक पातळीवरील स्थान इतर अनेक देशांना सध्या आकर्षित करत आहे. त्यातच एकेकाळी भारतावर राज्य केलेला ब्रिटनदेखील सध्या भारताच्या जागतिक महत्त्वापासून दूर नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौर्‍यावर आले होते. त्यांचा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता ब्रिटन-भारत संरक्षण क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. ब्रिटन आणि भारत दोन्ही देशांनी संयुक्तपणे संशोधन, विकास आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादन करण्याचे मान्य केले आहे.
 
संरक्षण व आंतरराष्ट्रीय संबंधांतील तज्ज्ञ हा करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे या निमित्ताने सांगत आहेत. कारण, आतापर्यंत भारत रशियासह संयुक्त रशियामधून संरक्षण तंत्रज्ञान तयार करण्यावर भर देत आला आहे. ब्रिटनसोबतच्या करारामुळे भविष्यात रशियानंतर ब्रिटन भारताचा दुसरा सर्वांत मोठा मित्र देश बनण्याची सर्वांत जास्त शक्यता वर्तविली जात आहे. आजपर्यंत भारताचे जगातील अनेकविध देशांशी संरक्षण करार आहेत. त्याअंतर्गत संरक्षण खरेदीही केली जाते. पण रशिया एकमेव देश आहे ज्याच्याकडून संरक्षण सामग्रीचे उत्पादनही केले जाते. यापैकी ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आणि ‘इंडो रशियन रायफल लिमिटेड’ हे प्रमुख उपक्रम आहेत. ब्रिटनसोबतचा करार पुढे गेल्यास भविष्यात असे उपक्रम भारत आणि ब्रिटनही उभारू शकणार आहेत हे विशेष. दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, ब्रिटनची संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि भारताची ‘डीआरडीओ’ संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि उदयोन्मुख लष्करी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संयुक्तपणे संशोधन करणार आहेत. दोन्ही देश संयुक्तपणे त्यांचे उत्पादनही करणार आहेत. तसेच, हे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीदेखील आवश्यक ठरणार आहे.
 
या दोन देशांमध्ये आता ‘इलेक्ट्रिक प्रोपल्शनवर जॉइंट वर्किंग ग्रुप’ तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. नौदलाची जहाजे आणि पाणबुड्या बांधण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.एकूणच धोरणात्मक भागीदारीसाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करण्यासोबतच, दोन्ही देश प्रगत लढाऊ विमाने, जेट इंजिन प्रगत कोर तंत्रज्ञान, संरक्षण मंच, भाग आणि इतर घटक विकसित करण्यासाठी काम करणार आहेत. ब्रिटनचे तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीतून या संरक्षण वस्तूंची निर्मिती देशात केली, तर भारताच्या गरजा पूर्ण होतील आणि इतर देशांनाही निर्यात करता येणार आहे. त्याचबरोबर, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतासाठी संरक्षण सामग्रीसाठी खुल्या सामान्य निर्यात परवान्याचीही घोषणा केली आहे. यामुळे भारताला तंत्रज्ञानाशी जोडण्याची संधी मिळणार असून ब्रिटनच्या विमाने आणि जहाजांच्या बांधकामाच्या कार्यक्रमातही भारताला सहभागी होता येणार आहे. संरक्षण तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या मते, भारत-ब्रिटनची ही भागीदारी दोघांसाठी नक्कीच महत्त्वाची असणार आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन नवीन बाजारपेठांचा शोध घेत असताना भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, ‘मेक इन इंडिया’मध्ये ब्रिटनची भागीदारी महत्त्वाची ठरू शकते. ब्रिटन जगातील उच्च संरक्षण तंत्रज्ञान असलेल्या देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारतास या भेटीतून आगामी काळात नक्कीच मोठा फायदा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दुसरीकडे जगातील मोठे देश आता भारतासमवेत येऊ पाहत असल्याने भारताचे जागतिक स्तरावरील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@