
मुंबई : "पोलीसांनी आम्हाला जी गोष्ट सांगितली ती आम्ही मान्य केली. आम्हाला बाहेर जाण्यापासून रोखलं आम्ही घरीच थांबलो तरीही ज्या प्रकारे आमच्यावर दंडुकेशाही दडपशाही केली जात आहे त्या प्रकारामुळे एक गोष्ट मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारायची आहे की, या राज्यात संविधान लागू आहे की नाही? ज्या पद्धतीचा गुंडाराज या देशात चालवला आहे.
एका खासदार आणि आमदाराला ज्या प्रकारे पोलीस ठाण्यात फरफटत नेण्याचे काम सुरू आहे, त्यात मी एकदा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विनंती करु इच्छीते की आज महाराष्ट्रात तुमच्यासारखे नेते असतानाही लोकप्रतिनिधींना ही वागणूक मिळत आहे. येणाऱ्या काळात जर आम्हालाच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला काय मिळणार?", असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करुन दाखवणार, असा इशारा शिवसेनेला दिल्या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम १५३ (अ) आणि (ब) अंतर्गत राणा दाम्पत्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.. पोलीस त्यांना रविवारी न्यायालयात हजर करणार आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांनी ही कारवाई होऊ शकते, असा आरोप ठाकरे सरकारच्या नेत्यांनी केला आहे.
दोन्ही कलमे अजामीपत्र असल्याने राणा कुटूंबियांना सुटकेसाठी आता न्यायालयापुढे हजर राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजची रात्र पोलीस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याविरोधात दोन गटांमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप पोलीसांनी लावला आहे.
राणा दाम्पत्यावर झालेल्या या कारवाईचा निषेध करत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. ते म्हणाले, "राणा दाम्पत्य हे लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या मागे तीन लाख लोकांचा पाठींबा आहे. अशा प्रकारे त्यांच्यावरील कारवाई ही एक प्रकारे लोकशाहीसाठी घातक आहे."
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणी राणा दाम्पत्याला पाठींबा दिला आहे. "हनुमान चालीसा म्हणायला येणाऱ्या एका दाम्पत्याच्या विरोधात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावताहेत. पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत आहे हे स्पष्ट दिसत आहे. फक्त हनुमान चालीसा पठण करण्यासाठी शिवसेनेने इतका मोठा हायवोल्टेज ड्रामा करण्याची गरज नव्हती. ज्या प्रकारे शक्तीप्रदर्शन दाखवण्यात आले त्याची गरज नव्हती. त्यामुळे या प्रकरणाला संपूर्णपणे वेगळं वळण दिलं गेलं", अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
सध्या संपूर्ण राज्यामध्ये भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असतानाच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले.
"पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. तसेच मातोश्री आमच्या हृदयात आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्या मनात आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी चालिसा न वाचणे हे या सरकारचे पाप आहे. आमची मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी ही कायम राहणार आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत आहोत," असे राणांनी सांगितले.
"मला आणि नवनीत राणांना विरोध करणे हे योग्य नाही. आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आले. आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं. पश्चिम बंगालसारखी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील. मुख्यमंत्र्यांचा अहंकार त्यांच्या डोक्यात गेल्यामुळे हे घडत आहे," अशा शब्दात रवी राणांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.