ब्रह्म जानाति ब्राह्मणः’ असे उपनिषदांपासून अनेकानेक संस्कृत साहित्यात संदर्भ आढळतात. त्याचा अर्थ जो ब्रह्म किंवा अंतिम सत्य जाणतो तो ‘ब्राह्मण.’ ब्रह्म किंवा अंतिम सत्य जाणण्याच्या उद्देशाने विद्या किंवा ज्ञान प्राप्त करण्याचे कार्य हजारो वर्षांपासून ब्राह्मण वर्ग करत आला. प्राचीन काळापासून शिक्षण, संशोधन, शास्त्रनिर्मिती आदी क्षेत्रात ब्राह्मण वर्गाने नेत्रदीपक कामगिरी केली. देशात प्रबोधनाची चळवळ सुरू झाल्यानंतरही आधुनिक शिक्षण घेण्यात आणि सर्व समाजालाही ते शिक्षण देण्यात ब्राह्मण वर्गाने पुढाकार घेतला. त्याला सुरुवातीला रुढीप्रिय ब्राह्मण वर्गाने विरोधही केला, नाही असे नाही.
पण, काळाच्या प्रवाहाबरोबर त्यांचा आवाज क्षीण होत गेला आणि आधुनिकतेचा ध्यास घेणार्या ब्राह्मण वर्गाचा आवाज गर्जत राहिला. त्यातूनच अनेक थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी ब्राह्मण वर्गातून निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतरही ब्राह्मण वर्गाचे विद्या, ज्ञान देण्या-घेण्याचे कार्य सुरूच राहिले व अजूनही सुरूच आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून देशात मतपेढ्यांचे राजकारण सुरू झाले आणि त्याचे पहिले लक्ष्य ठरला तो ब्राह्मण वर्गच. ब्राह्मण वर्गाविरोधात द्वेष पसरवण्यालाच पुरोगामित्वाची, समाजसुधारणेची, धर्मनिरपेक्षतेची विशेषणे लावली गेली. निवडणुकीच्या राजकारणात पुढार्यांसाठी जात हमखास मते बांधून ठेवण्याचे एक हत्यार झाले. त्यासाठी आपली जात विरूद्ध दुसरी जात आणि त्यातही ब्राह्मण वर्गाला एकमेकांसमोर उभे करण्याचे उद्योग सुरू झाले.
खरे म्हणजे, ज्या कोणाला आपापल्या जातीचे नेतृत्व करायचे आहे, त्यांनी ते स्वजातीच्या उत्थानासाठी जरुर करावे. जातीला पुढे घेऊन जाणार्या घटकांचा, जसे, तरुणांचे शिक्षण, महिलांचे शिक्षण, आरोग्य, व्यवसायात उभारी देणे, असे काम नक्कीच करावे. असे विधायक काम करणारे अनेक लोक आज आपल्या अवतीभवती आहेतही. पण, तसे काही करण्याचा वकुब नसला की, शरद पवार ते अमोल मिटकरी यांच्यासारख्या मंडळींवर इतर जातींविरोधात विखारी टीका करून सवंग लोकप्रियता मिळवण्याचे उपद्व्याप करण्याचीच वेळ येते.
निवडणुकीत लोकांनी नाकारलेल्या आणि मागच्या दाराने विधान परिषदेत पोहोचून आमदार झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरी यांच्या ब्राह्मण वर्गाच्या आडून हिंदू संस्कृतीला-कन्यादान विधीला लक्ष्य करण्याच्या विधानावरून महाराष्ट्रातील वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. वेदांपासून कोणत्याही हिंदू धर्मग्रंथात नसलेल्या आणि कोणत्याही हिंदू धार्मिक कार्यात वा संस्कारांत वा कन्यादानावेळी न उच्चारल्या जाणार्या ‘मम भार्या समर्पयामि’ या तीन शब्दांचा उल्लेख करून अमोल मिटकरींनी ब्राह्मण वर्ग व हिंदूंविरोधात सर्वांच्याच मनात विष कालवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला. अर्थात, अमोल मिटकरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत आणि त्याआधी ते संभाजी ब्रिगेडमध्ये होते. त्या संघटनेची स्थापनाच ब्राह्मण व हिंदूद्वेषाच्या पायावर झालेली होती, त्यासाठी त्यांनी तथाकथित शिवधर्माचीही स्थापना केली, त्यात कोणी आले नाहीत ही गोष्ट वेगळी. पण, आज तीच हिंदूद्वेषाची विकृती राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार झालेली आहे.
तथापि, अमोल मिटकरींनी आजच असे विधान केले असे नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून ते वरील शब्दांच्या माध्यमातून ब्राह्मण व हिंदू संस्कृतीविरोधात अपप्रचार करत आले. त्यांना याविषयीचे पुरावे अनेक जणांनी मागितले. पण, त्यांनी ते कधीही दिले नाहीत. आताही ते तसे काही पुरावे देऊ शकणार नाहीतच. कारण, सध्या ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि अमोल मिटकरींचे मालकही बिनपुराव्याचे दावे करण्यात पटाईत आहेत. त्याचा दाखलाही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राजा शिवछत्रपती ग्रंथाविषयीच्या वादावरून नुकताच मिळाला. बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती दिल्यानेच जेम्स लेनने आपल्या शिवाजी महाराजांवरील पुस्तकात शिवरायांची बदनामी केली, असा आरोप संभाजी ब्रिगेड अनेक वर्षांपासून करत होती. त्यात पुरंदरेंच्या ब्राह्मण असण्याचा मोठा वाटा आहे, ते ब्राह्मण वर्गातले नसते, तर संभाजी ब्रिगेडने त्यांच्याकडे लक्षही दिले नसते. मात्र, इतकी वर्षे शरद पवारसुद्धा याच विचारांचे आहेत, असे कधी पुढे आले नव्हते.
पण, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनेही बाबासाहेब पुरंदरेंवर संभाजी ब्रिगेडच्याच भाषेतला आरोप केला आणि स्वतः शरद पवारांनीच आपण या सगळ्यावरून शिवशाहीरांविरोधात भूमिका घेतल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. पण, त्यानंतर खुद्द जेम्स लेननेच शरद पवारांच्या दाव्यातली हवा काढली आणि बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्याला कसलीही माहिती दिली नसल्याचे रोखठोक सांगितले. यावरूनच अमोल मिटकरी आणि त्यांचे मालक शरद पवार खोटारडेपणा करण्यात निष्णात असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. कारण, शिवाजी महाराजांना एकदा जातीत वाटून घेतले की, त्यांनी ज्या पायवाटा तयार केल्या, त्यावर चालण्यापेक्षा इतर जातींचा द्वेष करण्याचे घाणेरडे प्रकार सडक्या डोक्यात पटकन शिजतात आणि रुजतात अन् त्या आधारावर राजकारण करणे सोपे असते. संभाजी ब्रिगेडसारख्या इतरही अनेक संघटनांना प्रोत्साहन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने तेच केले. असे राजकारण सुरू झाले की, मग विकृत इतिहासकारांकडून निराधार, पुराव्याशिवायच्या वायफळपणाचा प्रसार करण्याचे उद्योग चालू केले गेले.
तसे करण्यातून संबंधित जातीतल्या तरुणांची टाळकी भरकटतात आणि आपल्या म्होरक्याची राजकीय कारकिर्द देदीप्यमान व्हावी म्हणून ती जळत राहतात. तशी अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेल्यांची झाली आहे. पण, असे करून त्या बिचार्यांच्या हाती खरेच काहीही लागत नाही, लागलेही नाही. उलट वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणार्या सर्वसामान्यांमध्येच शत्रुत्वाची भावना तयार झाली. अमोल मिटकरींसारख्यांच्या वक्तव्यातून ती भावनाच वणव्यासारखी फैलावते. खरे म्हणजे सत्तेत आल्यानंतर कोणत्याही वर्गाविरोधात अतिरेकी विचार बाळगणार्या विषारी प्रवृत्तींना दडवून ठेवावे लागते, हा संकेत मानला जातो. पण, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते होताना दिसले नाही, अमोल मिटकरींची ब्राह्मण व हिंदू धर्म-संस्कृतीला लक्ष्य करणारी विधाने आणि बाबासाहेब पुरंदरेंविषयीचे शरद पवारांचे मत त्याचेच उदाहरण. मात्र, यातून शरद पवारांचा वैचारिक चेहरा किती भेसूर आहे, हेदेखील प्रकर्षाने समोर आले. त्यामुळे शरद पवार, असे आहेत हे गृहित धरुन त्यांच्या सुसंस्कृततेच्या झांजा वाजवणार्यांनी आता गप्प राहिलेलेच बरे!