आमचं काही बरंवाईट झालं तर हे तिघेच जबाबदार : राणा दाम्पत्य
23-Apr-2022
Total Views |
मुंबई : आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवाहन मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे जबाबदार राहतील, अशी तक्रार खार पोलीसांत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. यावेळी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेविरोधात आरोप करण्यात आले आहेत. काल सायंकाळी मातोश्रीवर बैठक बोलवून दिवसभरासाठीचं नियोजन करण्यात आले.
त्यानुसार, प्रत्येकाला आराखडा तयार करुन दिला. त्यामुळे शेकडोंचा जमाव हा खार येथील राणा यांच्या निवासस्थानी जमाला, मातोश्रीवरही शिवसैनिकांची गर्दी जमविण्यात आली. त्यांच्या हातात बॅट, हॉकी आणि इतर हत्यारसदृश वस्तू देण्यात आल्या. आम्हाला जीवे मारण्यात येईल असे वातावरण तयार करण्यात आले होते. त्यासाठी रुग्णवाहिकाही तयार ठेवण्यतात आली होती. ही रुग्णवाहिका आमच्यासाठीच तयार ठेवण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत चिथावणी दिली.
आम्ही फक्त हनुमान चालिसा म्हणणार होतो. |मात्र उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासह इतर नेतेमंडळींनी चिथावणी दिली. आम्हाला शारीरिक नुकसान होईल, अशी परिस्थिती निर्माण केली गेली..आमच्या जीविताला धोका झाल्यास उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब जबाबदार राहतील, अशी लेखी तक्रार खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याने केली आहे.