इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत गडकरींचा मोठा निर्णय

    22-Apr-2022
Total Views |
 
 
nitin gadkari
 
 
मुंबई : इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी घरात चार्ज करत असताना पेट घेतल्यामुळे हैद्राबादमध्ये एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. यापूर्वीही देशभरात अनेक ठिकाणी ओला, ओकिनावा आणि जितेंद्र या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.
 
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक दुचाकींनी पेट घेण्याच्या प्रकारामध्ये ज्या कंपन्या निष्काळजीपणा करताना आढळतील, त्या कंपन्यांना दंड ठोठावण्यात येणार असल्याचे गडकरींनी ट्विट करत सांगितले आहे. तसेच दंडात्मक कारवाई करण्यापूर्वीच इलेक्ट्रिक गाड्या तयार करणाऱ्या कंपन्यांनी सर्व सदोष गाड्या मागे घ्याव्यात असंही गडकरी यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली असून त्याद्वारे चौकशी होणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
 
 
 
 
 
पुण्यामध्ये ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडल्यानंतर सरकारने कारवाई करत हा अपघात कसा झाला हे स्पष्ट करण्यास कंपनीला सांगण्यात आले होते. तसेच असे अपघात रोखण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियमावलीनुसार कोणते उपाय करता येतील याबद्दलची माहिती देखील देण्यास सांगितले होते. तसेच इलेक्ट्रिक गाड्यांच्या गुणवत्तेसंबंधी नियमावलीही सरकार लवकरच जारी करणार असल्याचेही संकेत गडकरी यांनी दिले.