जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील राजगढमध्ये अनेक वर्षे जुने हिंदू मंदिर जमीनदोस्त करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अधिकाऱ्यांनी मास्टरप्लॅनचा हवाला देत 'रस्ता रुंदीकरण' मोहिमेत 85 हून अधिक हिंदू कुटुंबांची घरे पाडली मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे.
तिनशे वर्षे जुने मंदिर पाडण्यासाठी जेसीबी मशीन आणण्यात आले होते. मंदिरात ठेवलेले शिवलिंगही ड्रिल मशीनच्या सहाय्याने उखडले गेले. स्थानिक आमदार जोहरीलाल मीना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते काँग्रेसची पालिका पाडण्याची मोहीम थांबवता आली असती, असे म्हणताना ऐकू येते. ३४ नगरसेवकांना आपल्याकडे आणले असते तर ते पाडण्याची मोहीम थांबवू शकले असते, असेही ते म्हणाले.
राज्यातील गेहलोत सरकारवर तिनशे वर्षे जुने शिवमंदिर पाडून हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष करत आहे. जहांगीरपुरीचा बदला घेण्यासाठी गेहलोत सरकारने अलवरच्या राजगडमधील शिवमंदिर पाडले, असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदू मंदिराव्यतिरिक्त, अधिकाऱ्यांनी मास्टरप्लॅनचा हवाला देत 'रस्ता रुंदीकरण' मोहिमेत ८५हून अधिक हिंदू कुटुंबांची घरे पाडली. 'अर्बन मास्टरप्लॅन'च्या नावाखाली महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी ८५ दुकाने आणि घरांसह शंभरहून अधिक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले. या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अहवालानुसार, जागेवर केवळ ६० फूट रस्ता आहे, असा स्थानिक अधिकाऱ्यांचा युक्तिवाद होता. जेथे कमी आहे, तेथे मास्टरप्लॅनप्रमाणे रुंद करण्यासाठी बांधकामे तोडण्यात आली. मात्र, त्यांनी स्वत: बांधलेल्या गौरव पथाची सरासरी ४५ फूट रुंदी नसल्याने पालिकेचा हा युक्तिवाद भक्कम नाही.ज्या स्थानिक लोकांची घरे आणि दुकाने पाडण्यात आली त्यांच्या सर्व मालमत्तांची वैध कागदपत्रे होती. असे असतानाही पालिकेने त्यांची घरे पाडली आहेत. राजस्थानमध्ये १७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत जुन्या मंदिरांसह दीडशेहून अधिक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.