ठाणे/शहापूर (प्रतिनिधी): उन्हाळा सुरू झाला की, शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. ही टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजनांसह गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. सध्या तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, अशा गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बुधवारी संयुक्त दौरा करून पाण्याची सद्यःस्थिती जाणून घेतली. तसेच, महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी तत्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश ग्रामीण पाणीपुरवठाविभागाला दिले.
मुंबई, ठाण्याची तहान भागवणार्या शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, तालुक्यातील अनेक गावपाड्यांवरील कूपनलिकांसह विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायतीमधील वरचा गायदरा, आटगावमधील पेंढरघोळ, धामणीतील गोलभन, वरस्कोलमधील कुंभईपाडा, शिरोळमधील कुंदनडॅम या टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, गावातील नागरिकांसह महिलांशी पाण्याच्या समस्येविषयी चर्चा करत समस्या जाणून घेण्यात आल्या.
दरम्यान, गावातील पाण्याच्या विविध स्त्रोतांची पाहणी करून, पारंपरिक स्रोतांना बळकट करून आगामी काळात पाणीटंचाई होणार नाही, अशा स्वरुपाची शाश्वत उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन यावेळी ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच, सद्यःस्थितीत टँकरने मुबलक पाणीपुरवठा करण्याबरोबर अधिक साठवणूक क्षमता असणार्या टाक्यांमध्ये पाणीसाठा करणे, पाणी नसलेल्या विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडणे आदी उपाययोजनावर भर देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहापुरातील 11 गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 50 कोटी
शहापूर तालुक्यात पाणीटंचाई जाणवणार्या व भातसा बॅकवॉटरमधून पाणी उपलब्ध असलेल्या 11 गावांमध्ये भावली धरणाचे काम पूर्ण होईपर्यंत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यास पाणीपुरवठा विभागाने मान्यता दिली आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निर्देशानंतर सुमारे 50 कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भावली धरण योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर या गावांतील पाणीयोजना तेथे जोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे धामणी, गोलभण, जरंडी, रातांधळे, उंबरखांड, वेळूक, साकडबाव, पाटोळ, आवरे, कोठारे, लाहे या गावांना दिलासा मिळाला आहे.