शाश्वत विकासाचे प्रणेते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2022   
Total Views |
 
 

maans
 
 
 
 
शेती आणि शेतकर्‍यांच्या शाश्वत विकासासाठी झटणारे उच्चशिक्षित अवलिया राजेंद्र भट यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेख...
 
 
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी आणि शेती तसेच शेतकर्‍यांचा शाश्वत विकास घडावा, या ध्येयाने पछाडलेले उच्चशिक्षित राजेंद्र श्रीकृष्ण भट यांना ’शाश्वत विकासाचे प्रणेते’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही!
 
 
 
राजेंद्र यांचा जन्म १९५७ साली पुण्यात झाला. लहानपणापासून उपजत बुद्धिमत्तेच्या जोरावर राजेंद्र ‘बॅचलर ऑफ अ‍ॅग्रीकल्चर’ पूर्ण करून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत रुजूही झाले. मात्र, नोकरीत त्यांचे मन रमेना. शाश्वत विकासाचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देईना. वयाच्या ३५व्या वर्षी पुणे येथील नोकरी आणि जागा सोडून बदलापूरपासून जवळच असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील बेंडशिळ या गावात राजेंद्र भट स्थायिक झाले. तेथे १९९० साली शेतजमीन विकत घेऊन काकांकडून प्रेरणा घेत ते शेती करू लागले. मात्र, रासायनिक पद्धतीने शेती न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा संकल्प करून त्यांनी तडीस नेला. गेल्या सुमारे तीन दशकांत त्यांनी येथील पाच एकर जमिनीत शेती संदर्भात असंख्य प्रयोग यशस्वी करुन दाखवले आहेत. भारतीय पारंपरिक कृषी पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी बहुउत्पादन पद्धती अवलंबत कृषी उत्पन्न कसे वाढवता येईल, याचा एकप्रकारे वस्तुपाठ घालून दिला. वयाच्या ६५व्या वर्षीही अभ्यास करून नवनवीन प्रयोग यशस्वी तर केलेच, शिवाय आपल्याला माहिती असलेल्या ज्ञानाचा उपयोग व माहिती अन्य शेतकरी बांधवांना व्हावी, यासाठी ते सतत झटत असतात. गेल्या ३० वर्षांत त्यांच्याकडे विपुल निसर्गसंपत्ती जमा आहे. ज्यात 187 जातीच्या वनस्पती, सहा जातीची बेडके, चार प्रकारच्या मधमाशा, ५१ जातींची फुलपाखरे, ५७ जातींचे कोळी, १३८ जातींचे पक्षी वर्षभरात त्यांच्याकडे आढळतात. त्यांच्या या परिश्रमाची राज्य आणि केंद्र शासनानेही दखल घेतल्याचे ते सांगतात.
 
 
 
पावसाने ओढ दिली की, धरणे आटून, पाणीटंचाई भेडसावू लागते, पाण्यासाठी वणवण अशा गावगप्पा सर्वत्र रंगू लागतात. प्रसारमाध्यमांमध्येही दुष्काळी चित्रण आणि रकानेच्या रकाने दिसू लागतात. तेव्हा, हे दुष्काळी चित्र बदलण्याचा ध्यास राजेंद्र भट यांना लागला. त्यांच्या शेतजमिनी जवळून वाहणार्‍या ओढ्यावर त्यांनी २००४ मध्ये एक सिमेंटचा पक्का बंधारा बांधला. पावसाळ्यात धो धो वाहून जाणार्‍या पाण्याला अडवून ते पाणी साठवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. या बंधार्‍यामुळे या भागातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. भूजल पातळी वाढल्याने परिसरातील अन्य शेतकर्‍यांनाही या बंधार्‍याचा चांगलाच लाभ झाला. या जलक्रांतीनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
 
 
 
आपल्या परिसरातील शेताच्या बाजूने पावसाळ्यात वाहणार्‍या ओढ्यावर राजेंद्र भट हे बंधारे बांधत आहेत. पहिला बंधारा 2004 साली बांधल्यानंतर दुसरा बंधारा त्यांनी जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने बांधला. या बंधार्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे, पावसाळ्यात प्रवाहाला कोणताच अडथळा नसतो. किंबहुना, असे बिनखांबी बंधारे म्हणजेच निसर्गमित्र बंधारे शेतकर्‍यासाठी वरदान ठरले आहेत. या बंधार्‍यांचा उद्देश भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे, यामुळे आजूबाजूच्या सजीव जीवसृष्टीसाठी काही कालावधीकरिता का होईना पाण्याची उत्तम सोय होते.
 
 
 
राजेंद्र भट यांचे नेहमी सांगणे असते की, धो धो वाहणार्‍या पाण्याची गती कमी करा, त्याला अडथळा आणा, धावणारे पाणी चालायला लावा, चालणारे पाणी थांबवण्याचा प्रयत्न करा. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये जिरवण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा, असे आवाहन ते नेहमीच करत असतात. केवळ आवाहन करीत नाहीत, तर त्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील असतात. आजपर्यंत त्यांनी उभारलेल्या तीन बंधार्‍यांमुळे तब्बल ७८ लाख लीटर पाणी साठून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. सतत प्रयोग करताना त्यातील चुका सुधारण्याचा नेहमी प्रयत्न असतो. ज्याठिकाणी निसर्गमित्र बंधारा निर्माण केला, त्याठिकाणी त्यांनी एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला. ओढ्यातील बंधार्‍यात प्लास्टिकचा मोठा फुगा फुगवून पाणी अडवले. म्हणजे पावसाळा संपल्यावर पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत हा फुगा त्या ओढ्यात राहून पाणी अडवले जाते. हा प्रयोग बर्‍यापैकी यशस्वी झाला. हा बंधारा अत्यंत कमी खर्चात होत होता. परंतु, मासेमारी करणारे हा फुगा खिळ्याने फोडून टाकत. त्यामुळे आता नवीन पद्धत अंमलात आणण्याच्या प्रयत्नात राजेंद्र आहेत.
 
 
 
सेंद्रिय शेती व परिसंस्था अभ्यास हे उद्दिष्ट ठेवून पर्यावरणपूरक शेतीसाठी आग्रही असणारे राजेंद्र शाश्वत शेती व शाश्वत जीवनपद्धती आचरणात आणण्याचा संदेश सर्वांना देतात. शेतीबरोबरच फोटोग्राफी, चित्रकला, मूर्तीकला, जिम्नॅस्टिक, गिर्यारोहण आदी कला क्रीडांमध्येही राजेंद्र यांना रस आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.२०१२-१३ वर्षात ‘कृषीभूषण’ (विभागीय) पुरस्कार प्राप्त झाला. २०१७ मध्ये ‘धरतीमित्र’ पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले. समाजासाठी, शेतकर्‍यांसाठी जे जे प्रयोग केले, त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, अशी मनीषा बाळगणार्‍या राजेंद्र यांच्या हातून भविष्यात नवनवीन प्रयोग यशस्वी व्हावेत, यासाठी त्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक बळ मिळो, याच त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@