शरीरं आद्यं खलु धर्मसाधनम्!
सूक्ष्मदेहाचे कार्य इच्छामात्रेकरून चालते, तर जडदेहाचे कार्य प्रत्यक्ष जड व्यवहाराविना घडत नाही. सूक्ष्मदेहाने कोणत्याही ठिकाणी जाण्यास केवळ इच्छा पर्याप्त आहे, तर केवळ इच्छामात्रेकरून कोणाचा जडदेह कोणत्याच ठिकाणी जाऊ शकत नाही. आहार, निद्रा इत्यादी सर्व जडदेहाचे व्यवहार जडदेहानेच होतात, केवळ इच्छेने नाही. सूक्ष्मदेहाचा संकल्प जडदेहाला कार्यप्रवण करतो. सर्व जडव्यवहार जडानेच अनुभवायचे असतात. सर्व व्यवहार कार्यसिद्धीचे मापन जडशरीराद्वारेच होत असते. म्हणूनच विद्वान सांगतात, ‘शरीरं आद्यं खलु धर्मसाधनम्।’ प्रत्येकाच्या देहधर्माला धरून जे उन्नयनित संस्कार करायचे त्याला ‘धर्मसाधन’ म्हटले आहे. म्हणून सर्व धर्मसाधनेचे आद्य उपकरण जडशरीर मानले आहे. जडशरीरापलीकडे जो सूक्ष्मदेह आहे, यात वृद्धी वा घट नाही, जडदेहाच्या मृत्यूने ते मरत नाही किंवा जडदेहधारणेने ते नवीन उत्पन्न होत नाही. ते अगोदरचे होते, आज आहे आणि नंतर राहील. पण, एक महत्त्वाची गोष्ट ही की, जडदेहाच्या इष्ट-अनिष्ट कर्मानुसार त्या सूक्ष्मदेहांची घटना वा क्षमता वाढत वा घटत असते.
सूक्ष्मदेह ओतरचनेत (एश्रशलीीेंपळल शुळीींशपलश) असल्यामुळे एक सूक्ष्मशरीर दुसर्या सूक्ष्म शरीरातून आरपार निघून जाईल. जसे प्रकाश काचेतून आरपार निघून जातो. वंशवृद्धी जडशरीर व्यापारात असते. सूक्ष्मशरीर वंशवृद्धी करू शकत नाही. पिशाच्चांना मैथुन, आहारादींच्या इच्छा तृप्त करण्यास इतर जडदेहाचा आश्रय घ्यावा लागतो. सूक्ष्मावस्थेत वरील व्यवहार नाहीत. हिंदू धर्मात काल्पनिक देव-देवतांना बरेच स्थान आहे. देवतांचे जडशरीरासारखे व्यवहार कोणीच पाहिलेले नाहीत. नाही म्हणायला काहींच्या अंगात देव-देवी येतात, असा अनुभव आहे. पण देवता मानवी अंगाचा आश्रय करतात. त्यांना स्वतंत्रपणे कार्य करता येत नाही. देवदेवता या उच्च अवस्थेच्या तरी मानल्या आहेत, पण एक स्थिर, सत्य या दोन्ही अवस्थांतून बाहेर येते आणि ते हे की, पिशाच्च, भूत, राक्षस, यक्ष वा गंधर्व या निम्न शरीरावस्थांना तद्वत देवदेवता, देवी इत्यादी उच्च मानल्या गेलेल्या अवस्थांना मानवी शरीराचा आश्रय घेतल्याशिवाय इच्छित कार्यदृष्टीने गत्यंतर नाही. म्हणूनच ‘शरीरं आद्यं’ही समजूत यथार्थ आहे. पुराणात असल्या मानवी देहावर आसक्त असणार्या देवदेवतांच्या कथा भरपूर आहेत. मानवी जीवनाचे परम ध्येय वा गंतव्य जी मुक्ती तीसुद्धा जडमानवी देह धारण केल्याविना संभवत नाही. इतके मानवी देहाचे महत्त्वाचे स्थान आहे.
सिद्ध पुरुष सूक्ष्म देहावस्थेत असतात. ते त्या सूक्ष्म देहावस्थेत आपापल्या पिंडधर्माला धरून तप व साधना करीत असतात. देहभाव असेपर्यंत संपूर्ण मुक्ती नाही. म्हणून सिद्धांना व मानलेल्या देवदेवतांनासुद्धा मुक्तीकरिता मानवी देह धारण करणे म्हणजे मानवी देहात जन्म घेणे आवश्यक असते. हे सत्य भागवतात कथारुपाने व्यासांनी बरेच प्रकारे सांगितले आहे. संपूर्ण मुक्तीकरिता पुन्हा नवीन देहाची आवश्यकता पडू नये म्हणून ज्ञानेश्वरांनी आपल्या जडदेहासकट आळंदीला समाधी घेतली. नियत कार्य असेपर्यंत त्याच दिव्य देहाचा ते उपयोग करतील. काळानुसार भाषा अथवा पेहराव बदलता येतो, पण तसले अतिउच्चधारणायुक्त शरीर पुन्हा जन्माला येणे संभव न वाटल्याने संत ज्ञानेश्वरांनी तोच देह समाधीआड केला. असल्या देहावस्थेला ‘कल्पशरीर’ म्हणतात. ते शरीरकल्पांतापर्यंत राहू शकते. संजीवन समाधीचा खरा उद्देश हा आहे. अशा संजीवन समाधी भारतात अनेक ठिकाणी आहेत. ज्ञानेश्वर माऊली त्या सर्वांचे रक्षणकर्ते आहेत.
सुषुम्नेतील कृष्णवर्ण आणि भयानक वेग
देहभाव हरवून जीवात्मा तीन सूक्ष्मदेहांसकट सुषुम्नेतून प्रवास करीत असता दोन अनुभव प्रकर्षाने जाणवत असतात. एक म्हणजे सुईसुद्धा जाणार नाही, असा गडद अंध:कार व दुसरा म्हणजे भयानक वेग. ‘शक्तिसवे संचारे मध्यमे लागी’ असे ज्ञानेश्वर माऊली त्या प्रवासाचे वर्णन करतात. हा अंध:कार नित्याच्या अनुभवाचा प्रकाशछायेसारखा वा दिवसरात्र यासारखा नसून एक सदासर्वदा नांदत असलेली गंभीर कृष्ण अवस्था आहे. हे सर्व जग प्रकाशातून उत्पन्न झाले आहे. प्रकाशाचा व्यवहार उत्पत्ती आहे, तर प्रकाशाचा अभाव म्हणजे अंध:कार, विनाश वा संहार वा लय आहे हे ओघानेच आले. यावरून सुषुम्नेतील अंध:कारमय प्रवास म्हणजे कशाचा तरी विनाश असला पाहिजे, हे उघड आहे. आणि तसेच ते आहे. देहभावाचा नाश झाल्याशिवाय जीवात्मा त्यावर उठून पलीकडील दिव्य अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून देहभावाच्या वर जाणारा साधक सुषुम्नेमधून प्रवास करताना गडद कृष्णवर्णाचा म्हणजे अंध:काराचा अनुभव करतो. या घोर जीवघेणा अनुभवालाच धरून कालिदेवतेची निर्मिती झाली आहे. तद्वत मृत्यूनंतर येणार्या काही अनुभवात काळ्या जीवघेऊ यमाची कल्पना प्रामुख्याने समोर येते. यम, त्याचा रेडा, त्याचा काळदोर सर्व काळ्या वर्णाचेच मानले आहेत. कालिमाता तर सर्व संहारक मानली आहे. मनाचे त्या-त्या अवस्थेनुसार ते ते अनुभव येत असतात. असा दर्शनशास्त्राचा सिद्धांत आहे. मरणार्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूकालात असाच कृष्णविवराचा अनुभव येतो. पण, मृत्यूनंतरचे घोर अनुभव सांगण्याकरिता कोणी परत येत नसतो. जो येतो तो नवीन जन्म घेऊनच. मागील मृत्यू आणि प्राप्त जन्म यामध्ये देहातीत अवस्थेतील विस्मरणाचा दाट पडदा असल्यामुळे नवीन जन्म घेणार्याला मागील मृत्यूचे मुळीच ज्ञान नसते. केवळ मृत्यूबद्दलच्या भयाच्या स्वरूपात त्यांचे मृत्यूचे ज्ञान शिल्लक असते. प्रत्येक प्राणी मरणाला भितो, हे मागील मृत्यू अनुभवाचे कारण आहे. अन्यथा मरेपर्यंत प्रत्यक्ष मृत्यूचा अनुभव कोणालाच येत नसतो. सुषुम्ना नाडीतील प्रवास देहभावातीत असल्याने त्यावेळचा अनुभव अंध:काराचा अथवा काळेपणाचा असतो.
-योगिराज हरकरे