पूरस्थितीला उल्हास नदीकाठची अनधिकृत बांधकामेच कारणीभूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2022   
Total Views |
 
 
ulhasb river
 
 
कल्याण : जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीचा श्वास नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांनी कोंडला आहे. परिणामी, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि शेतकर्‍यांना बसतो. मात्र, याही परिस्थितीत भिंत खचली, चूल विझली तरीही ते नव्या उमेदीने उभे राहतात. वाढते प्रदूषण आणि नदीत सोडल्या जाणार्‍या विषारी सांडपाण्यामुळे उल्हास नदी अखेरच्या घटका मोजत असताना नदीकाठावरील अनधिकृत बांधकामेदेखील कळीचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही वर्षात उल्हास नदीच्या किनारी अनधिकृत बांधकामांचे अक्षरशः पेव फुटले आहे. नदीकाठच्या परिसरात तसेच पूरनियंत्रण रेषेच्या आतील जागेतही मोठमोठी निवासी संकुले उभी राहत आहेत. नदीकिनारी भराव टाकूनही बांधकाम केले जाते. त्यामुळे पावसाळी व पारंपरिक नाले बुजून नदीच्या पाण्याला अडथळा निर्माण होतो व पाणी नदीकिनारी असलेल्या घरांमध्ये व वस्त्यांमध्ये शिरते. ज्यांच्या घरात कधीही पाणी आले नाही, त्यांच्या घरांमध्येही गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पुराचे पाणी शिरते. त्यातच मागील पाच वर्षांपासून ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.
 
 
नदीकाठच्या परिसरात ‘जिन्स’चे उत्पादन करणारे काही कारखाने असून त्यातील सांडपाणीही नदीत सोडले जाते. पारंपरिक पद्धतीने मत्स्यपालन न करता मत्स्यपालनाची आधुनिक पद्धतही मारक ठरत आहे. रिसॉर्ट आणि हॉटेल्सची वाढती संख्या आणि कृषी पर्यटन केंद्र, स्विमिंग पूल व वॉटर पार्कसाठीही नदीचे पाणी वापरले जाते. नंतर हेच पाणी अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा नदीत सोडले जाते. अनधिकृत बांधकामांमुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याने पूरस्थितीची समस्या निर्माण होते. या अनधिकृत बांधकामांकडे मात्र, प्रशासनाचेे सर्रास दुर्लक्ष होत आहे. या अनधिकृत बांधकामांना नेमका कुणाचा आश्रय आहे, याचाही छडा लावणे आवश्यक आहे, अन्यथा पुरस्थितीचा प्रश्न आणखी गंभीर होण्यास वेळ लागणार नाही.
 
शेती आणि शेतकरी संकटात
 
शहाड येथील बिर्ला गेटकडून टिटवाळाकडे जाणार्‍या मार्गावर मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी निवासी संकुले उभारली असून वाढत्या शहरीकरणामुळे शेती-जमिनी कमी होत आहे. काही मोजकेच शेतकरी आता शेतीत राबत असून प्रामुख्याने भात आणि चारा ही पीके घेतली जातात. कर्जत परिसरात भेंडी, वांगी, वालाच्या शेंगा, भुईमुग अशी पीके घेतली जातात. मात्र, पुराचे पाणी अधिक काळ शेतात राहिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अनधिकृत बांधकामांमुळे पूरस्थिती निर्माण होते आणि त्याचा फटका मात्र, शेती व्यवसायासह स्थानिक शेतकर्‍यांना सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.
 
 
 
जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे दुर्लक्ष
 
नदी किनार्‍यापर्यंत अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. ‘सीआरझेड’ आणि पूरनियंत्रण रेषेच्या नियमांचे उल्लंघन करून ही बांधकामे उभी राहत आहेत. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचेही याकडे लक्ष नाही. पूरनियंत्रण रेषेच्या आत भराव टाकल्याने नैसर्गिक नाले अरूंद झाले आहेत. याआधी कधीही पूर येत नव्हता. मात्र, नदीकाठच्या परिसराला अनधिकृत बांधकामांचा वेढा पडल्याने पहिल्याच पावसात घरात पाणी शिरते. एका पावसाळ्यात चार ते पाच वेळा पूरस्थितीचा सामना करावा लागतो. पुराचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि शेतीला बसतो.
- अश्विन भोईर, स्थानिक शेतकरी, वरप गाव
@@AUTHORINFO_V1@@