ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या दिवा येथील पाहणी दौऱ्याची आगाऊ माहिती (टीप) देऊन अनधिकृत बांधकामे कटाक्षाने बंद करण्याचा आदेश देणाऱ्या 'त्या' महिला अधिकाऱ्याच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशीचे निर्देश देण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. काही हितसंबंधी व्यक्तींची बांधकामे वाचविली जातात. तर किरकोळ बांधकामांवर कारवाईचा देखावा निर्माण केला जातो, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. या आरोपांना दुजोरा देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये `नाना, उद्या सकाळीच कमिशनर साहेब दिव्यात आहेत. सगळी कामे कटाक्षाने बंद ठेवा', अशा सुचना एका महिला अधिकाऱ्याकडून दिल्या जात आहेत. या ऑडिओ टेपसंदर्भात महिला अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी आज राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांना निवेदनाद्वारे केली. त्यानंतर या प्रकरणी तातडीने चौकशीचे निर्देश देण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले.
आयुक्तांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी दौऱ्याची माहिती आदल्या दिवशी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच मिळते. त्यामुळे ती महिला अधिकारी कोण, याबाबत ठाण्यात चर्चा सुरू असताना राज्यपालांनी या प्रकाराची दखल घेतल्याने त्या महिला अधिकाऱ्याची आता 'खैर ' नाही. असेही बोलले जात आहे. दरम्यान,या प्रकारामुळे ठाणे महापालिकेची बदनामीही होत असल्याकडे राज्यपाल कोश्यारी यांचे लक्ष वेधण्यात आले.