सिद्धांत जोशी हा एका मराठमोळ्या कुटुंबातील इंटरनेटवरील गेम्सकडे आकर्षित झालेला सर्वसाधारण तरुण. महाराष्ट्रातीलच एका खेडेगावासारख्या भागात राहूनही दिवसेंदिवस सिद्धांत यशाची एक एक पायरी चढत आहे. सिद्धांत तसा एका सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेला. त्याचे वडील कौटुंबिक व्यवसाय करतात. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सिद्धांतने गेल्या साडेतीन वर्षांत युट्यूबवरील त्याच्या चॅनेलवर १५ लाखांहून अधिक ‘सबस्क्रायबर्स’ कमावले आहेत. साधारणपणे गेमिंगचे वेड असलेला सिद्धांत आज संपूर्ण भारतभर ‘श्रीमान लेजंड’ याच नावाने ओळखला जातो. आज युट्यूबवर सिद्धांत तयार करत असलेल्या कंटेंटला देखील लाखोंमध्ये ‘व्ह्यूज’ मिळतात.
मात्र, सिद्धांतला ‘श्रीमान लेजंड’ ही ओळख त्याच्या मित्राकडून मिळाली असल्याचे सिद्धांत दिलखुलासपणे सांगतो. तो म्हणतो की, “सगळ्यात आधी जेव्हा गेम्स खेळायला सुरुवात केली, त्यावेळी ‘सिड द लेजंड’ असं नाव ठेवलं होतं. कारण, मी स्वत:ला स्वयंघोषित ‘लेजंड’ समजायचो. त्यानंतर जेव्हा युट्यूबवर चॅनेल तयार करण्याची वेळ आली, त्यावेळी माझा मित्र अनुप याच्यासोबत चर्चा केल्यानंतर अनुपने ‘श्रीमान लेजंड’ हे नाव सुचवले. अनुपच्या या आग्रहामुळेच चॅनेलचे नाव ‘श्रीमान लेजंड’ ठेवण्यात आलं आणि आज हे नाव प्रत्येकाच्या मुखातून अभिमानाने घेतले जाते याचा मला आनंद वाटतो,” असं सिद्धांत म्हणतो.
आज जगभरात गाजणार्या श्रीमानच्या आड एक शांत स्वभावाचा सिद्धांतसुद्धा लपलेला आहे. या सिद्धांतला ऑनलाईन गेम्स व्यतिरिक्त प्रत्यक्ष क्रिकेटचीही आवड. लहानपणी आपण खूप क्रिकेट खेळायचो, शिवाय क्रिकेट खेळत असताना गोलंदाजीमध्ये आपला हातखंड असल्याचा सिद्धांत आवर्जून उल्लेख करतो. याशिवाय सिद्धांतला गाण्याचीही आवड आहे. स्वत:च एक ‘म्युझिक चॅनेल’ असावं, असं सिद्धांतचं स्वप्न. मात्र, गेम्सकडे आकर्षित झालेल्या सिद्धांतची शैक्षणिक वाटचाल कशी होती, या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र आपण ‘ग्रॅज्युएशन’च्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे, पण दुसर्या वर्षात दोन विषयांत ‘केटी’ लागल्यामुळे पदवी आपल्याला मिळू शकली नाही, याची प्रांजळ कबूलीही सिद्धांत देतो.
“या संपूर्ण प्रवासात आपल्याला अनेकदा अपयश आले, अनेकदा वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पण, अशा परिस्थितीत आपल्या मावशीच्या मुलाने त्याच्या आयुष्यात केलेल्या संघर्षातून प्रेरणा मिळत राहिली. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात कितीही तणाव निर्माण झाला, तरी खचून न जाता आणखी मेहनत करून यश संपादन करण्याची तयारी ठेवावी,” असा संदेश सिद्धांतने या मुलाखतीदरम्यान दिला.
वैयक्तिक आयुष्यात यश संपादन करणार्या सिद्धांतला समाजातील तळागाळाच्या आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींविषयी कळवळा आहे. त्यामुळेच जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात संकंटस्थिती निर्माण होते, त्या त्यावेळी मदतीला धावून जाणार्यांमध्ये ‘श्रीमान लेजंड’ हे नाव अग्रस्थानी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. “आज मी ज्या यशाच्या पायर्या चढत आहे, ती या समाजाने दिलेल्या प्रेमाची फळे आहेत, त्यामुळे मी आज समाजामुळे जर १०० रुपये कमावत असेल, तर त्यातील ५० रुपये समाजासाठी आणि समाजाला पुढे नेण्यासाठी खर्ची घालणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना सिद्धांत जपत असतो. याशिवाय “लोकांना मदत केली की, ती विसरून जायची. त्यामुळे आपल्या मनाला शांतता लाभते आणि वडिलांनी दिलेला हा संदेश मी आयुष्यात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करत असतो,” असे सांगत सिद्धांत प्रत्येकाने नि:स्वार्थी भावनेने मदत करण्याचे आवाहन तरुणांना करतो.
अनेकदा आपण केलेली मदत ही अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते, अशीच काहीशी घटना सिद्धांतच्या आयुष्यातही घडली. गोष्ट आहे काही महिन्यांपूर्वीची. महाराष्ट्रातील एका कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे, अशी माहिती सिद्धांतच्या कानी पडली. त्यानंतर सिद्धांतने या गोष्टीची शहानिशा केली आणि गरजू कुटुंबापर्यंत शक्य तितकी मदत पोहोचवली. काही कालावधीनंतर सिद्धांतने केलेल्या मदतीची रक्कम सिद्धांतच्या बँक खात्यात जमा झाली. त्या रकमेसोबत कुटुंबाचा एक संदेशही होता- “आमच्या कुटुंबावर संकट असताना अनेक जणांनी आम्हाला मदत करण्यास नकार दिला, अशा कालखंडात आम्हाला तू मदत केलीस, आज तू केलेल्या मदतीमुळेच आमची आर्थिक परिस्थिती स्थिरस्थावर झाली आहे. घरातील तरुण मुलाला नोकरी मिळाली आणि त्याच्या पगाराच्या पैशातून तू केलेल्या मदतीची आम्ही परतफेड करत आहोत,” असे काहीसे शब्द त्या संदेशामध्ये लिहिले होते. हा संदेश वाचल्यानंतर सिद्धांत भारावून गेला. शिवाय समाजात मदतीची परतफेड करण्याचे धारिष्ट्य असणारे अनेक जण आजही आहेत, याच गोष्टीचा आनंद वाटत असल्याची भावना सिद्धांतने व्यक्त केली.
सावलीसारखा सोबत असणारा मित्र परिवार
“सिद्धांत अनेक ठिकाणी समाजाला मदत करत असतो, पण त्याने केलेली मदत उघडपणे सांगायला त्याला आवडत नाही आणि याच गोष्टीवरून आमच्यामध्ये अनेकदा वादही होत असतात. त्याने केलेले आणि सातत्याने करत असलेले सामाजिक काम सर्वांसमोर यायला हवे असे आम्हाला वाटते,” असे सिद्धांतचा मित्र सौरभ राणे सांगतो. “याशिवाय आमच्या सर्व मित्रांसाठी ‘श्रीमान’ आणि ‘सिद्धांत’मध्ये जास्त फरक नाही. सिद्धांत आमच्यासाठी कुठेही तडजोड करत नाही, याच गोष्टीमुळे आमच्यातील मैत्री टिकून राहिली आहे,” असे मत सिद्धांतचा आणखीन एक मित्र चेतन गायकवाड याने व्यक्त केले. सोबतच “चार वर्षांपूर्वी आमच्या गावात आम्हाला ‘टवाळ पोरं’ म्हणून ओळखले जाई. पण, गेल्या साडे तीन वर्षार्ंत सिद्धांतसोबत असल्याने आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जाऊ तिथे आदराची वागणूक दिली जाते. या गोष्टीची आम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. इतकी लोक आज आम्हाला ओळखत आहेत आणि हे केवळ सिद्धांतमुळे शक्य झाले, या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे म्हणत करण शिंदे याने सिद्धांचे आभार व्यक्त केले.
मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात इंटरनेटच्या अॅडिक्शनबाबत विचारले असता सिद्धांत सांगतो की, “इंटरनेटच्या मदतीने आपण खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतो. मात्र, आताची युवा पिढी सोशल मीडियावर वेळ वाया घालवत असते. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या गोष्टी शिकून आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी इंटरनेटचा चांगला उपयोग करून घेणे गरजेचं आहे,” असं सिद्धांत आवर्जून सांगतो.
“आज प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. आपल्याला ज्या गोष्टी आकर्षक वाटतात, त्याच गोष्टींचा ध्यास घेतला, तरच आपण यश संपादन करू शकतो; अन्यथा आपण आयुष्यात कधीच यश संपादन करू शकत नाहीत,” असा संदेश सिद्धांत देतो.
- प्रणव ढमाले
लहानपणी घरच्यांसाठी आणि स्वत:च्या प्रगतीसाठी अनेक स्वप्ने बघितली. ती स्वप्ने पूर्ण करावी, यासाठी मेहनत घेतली. या मेहनतीमध्ये अनेकांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या ‘स्ट्रगल’मधून काही गोष्टी शिकलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आज यशाची पायरी चढत आहे. - सिद्धांत जोशी