‘जिम्नॅस्टिक’मध्ये यशाची गुढी उभारणारी राही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2022   
Total Views |
 
 
rahi
 
 
डोंबिवलीतील भोईर जिमखान्यात ‘ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक’चे धडे गिरवणार्‍या राही नितीन पाखले हिने जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तर यश संपादित केले आहेच. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या ‘वर्ल्डकप’मध्येही राहीने भारताचे प्रतिनिधीत्व करीत डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्वात लहान खेळाडू असलेल्या राहीने ‘वर्ल्डकप’मध्ये १५ वे स्थान पटकाविले. अशा या स्वकर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या राही पाखले हिच्या जिद्दीची कहाणी...
 
राहीचा जन्म अंबरनाथचा. तिचे वडील एका खासगी कंपनीत सेवा बजावत आहेत. राहीची आई प्राजक्ता या आंबिवली येथील ‘एनआरसी’ शाळेत शिक्षिका आहेत. जन्म अंबरनाथचा असला तरी राहीचे संपूर्ण बालपण डोंबिवलीतलेच. प्रारंभी काही काळ राही डोंबिवली पश्चिमेतच वास्तव्यास होती. राही अवघ्या पाच वर्षांची असल्यापासून विविध उपक्रमांत राही कशी सहभागी राहील, यासाठी तिची आई सदैव प्रयत्नशील होती. मात्र, इतर उपक्रमांपेक्षा राही भोईर जिमखान्यात जास्त रमायची. आई-वडिलांच्या आणि राहीच्या भोईर जिमखान्यातील प्रशिक्षकांच्याही ही बाब लक्षात आली. त्यामुळे राही ‘जिम्नॅस्टिक’मध्ये काहीतरी चांगले करू शकते, अशी आशा तिच्या आई-वडिलांना सुखावून गेली. पुढे ‘जिम्नॅस्टिक’मध्ये राहीला जास्तीत जास्त प्रावीण्य कसे मिळविता येईल, त्यादृष्टीने तिचा प्रवास सुरू झाला.
 
हळूहळू ‘जिम्नॅस्टिकसाठी सब कुछ’ म्हणत राहीने सरावात उद्भवणार्‍या सर्व अडथळ्यांवर मात केली. ‘जिम्नॅस्टिक’मुळे राहीला आपली शाळादेखील बदलावी लागली. कारण, राहीला सकाळच्या वेळेत शाळेत गेल्यावर सराव करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच, डोंबिवली पश्चिमेतील भोईर जिमखान्याने आपली एक शाखा डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथे सुरू केली होती. राहीला डोंबिवली पश्चिमेतून कोळेगावात जाताना जास्त दगदग होत होती. तसेच, रात्री उशीरदेखील होत होता. त्यामुळे राहीच्या वडिलांनी कोळेगावच्या जवळच असलेल्या ‘रिजन्सी अनंतम्’ या गृहसंकुलात घर घेतले. राही आता डोंबिवली पूर्वेत वास्तव्यास आहे.
 
राही सुरुवातीला ‘ओमकार इंटरनॅशनल स्कूल’मध्ये ‘आयसीएसई’ स्कूलमध्ये शिकत होती. या शाळेत तिने सातवीपर्यंत शिक्षण घेतले. पण, ‘आयसीएसई’ बोर्डाचा अभ्यासक्रम आणि सराव करताना तिची दमछाक होऊ लागली. त्यानंतर मग ‘जिम्नॅस्टिक’मधील आवड जपण्याासाठी राहीने राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या ‘सिस्टर निवेदिता स्कूल’मध्ये प्रवेश घेतला. घरापासून अगदी शाळेपर्यंत सगळ्याच बाबतीत राहीने, तिच्या कुटुंबीयांनी राहीच्या ‘जिम्नॅस्टिक’ आवडीपोटी त्यांच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केले.
 
सन २०१० पासून राही ‘जिम्नॅस्टिक’चा सातत्याने सराव करीत आहे. त्यानंतर तिने आजतागायत मागे वळून पाहिले नाही. ‘जिम्नॅस्टिक’ बरोबरच राही आता वाणिज्य शाखेत ‘मॉडेल’ महाविद्यालयातून शिक्षणही घेत आहे. भोईर जिमखान्यात लहानपणापासून ‘आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक’ प्रकारात राही खेळत होती. ‘ट्रम्पोलिन’ या प्रकाराविषयी तिलाही फारशी माहिती नव्हती. खरंतर भारतात या प्रकाराविषयी कोणालाही फार माहिती नाही. भोईर जिमखान्यातील प्रशिक्षकांना या प्रकाराविषयी माहिती मिळाली. त्यांच्याकडून हा खेळ राहीपर्यंत पोहोचला. ‘ऑलिम्पिक’ पातळीवरील हा खेळ आहे, हे सुद्धा राही आणि कुटुंबीयांना नंतर समजले. पण, आता राही केवळ ‘ट्रम्पोलिन’ या प्रकारात खेळत आहे. ‘ट्रॅम्पोलिन’विषयी लहानपणापासून माहिती असती आणि तो शिकविला गेला असता, तर आतापर्यंत आम्ही खूप पुढे गेलो असतो, असेही राही याविषयी सांगताना प्रकर्षाने अधोरेखित करते.
 
‘बीएमएस’ करून ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ करण्याचा राहीचा मानस आहे. पण, सध्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक बाहेर पाठविणा असल्यामुळे बारावीची परीक्षा तिला देता येईल अथवा नाही, याबाबत शंका आहे. अजून काही शिकण्याची संधी मिळाली, तर बारावी न करता मध्ये थांबण्याचीही राही आणि तिच्या पालकांची तयारी आहे.
 
‘जिम्नॅस्टिक’ हा शेवटी क्रीडाप्रकार. पण, कोरोना महामारीच्या काळात सगळेच क्रीडाप्रकार बंद असल्यामुळे क्रीडापटूंचे, अ‍ॅथलिट्सचेही हाल झाले. याविषयी बोलताना राही सांगते की, “कोरोना काळात आमचे खूपच नुकसान झाले. सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर असे ग्रुप असतात. पहिली राष्ट्रीय स्पर्धा मी सब ज्युनियर गटातून खेळले. त्यावेळी मात्र मी लहान होते. पण, आता ज्युनियर गटातून खेळू शकते. ” त्यामुळे आपले एक वर्ष कोरोना काळात वाया गेल्याचे राही सांगते. कोरोनामुळे राहीला ज्युनियर गटातून खेळता आले नाही. २०२० आणि २०२१ या दोन वर्षात शिकण्याची संधीही हुकली. त्यामुळे आता दोन ते तीन वर्षं हातात आहेत. त्याकाळात सर्व प्रशिक्षण आत्मसात करायचे लक्ष्य राहीने निर्धारित केले आहे. १८ वर्षांनंतर ‘जिम्नॅस्टिक’ शिकण्याची संधी असतेच. पण, वयोमानापरत्वे शरीरातील लवचिकता कमी होत जाते. त्यामुळे १८ वर्षांखाली असतानाच ‘जिम्नॅस्टिक’शी संबंधित विविध कौशल्य आत्मसात करणे कधीही सोयीस्कर. ‘श्रवण’ अकादमीचे संचालक पवन भोईर आणि प्रशिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राही सध्या ‘जिम्नॅस्टिक’चे धडे गिरवत आहे.
 
‘जिम्नॅस्टिक’ प्रकारात सक्रिय असल्यामुळे आहारात तेलकट पदार्थ आणि बाहेरील खाद्यपदार्थ (जंक फूड) खाता येत नाही. ‘पॅकिट फूड’ तर राहीने सात ते आठ वर्षांपासून साधा स्पर्शही केलेला नाही. ‘प्रोटिन्स’चाही राहीला मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करावा लागतो खासकरुन अंड्यांचा आहारात अंतर्भाव करावा लागतो. राही सांगते की, ‘वर्ल्डकप’ला गेले असताना तिचे वजनही कमी झाले होते. आठ दिवसांत मसालेदार पदार्थ खाल्ले नव्हते. त्यामुळे वजनात फरक पडला. ‘डाएट’ ठरलेला होता. त्यामुळे देशाबाहेर स्पर्धेसाठी गेल्यावर हे सर्व अनुभव येत असल्याचे राही सांगते.
 
दि. ७ एप्रिल रोजी अमरावती येथे होणार्‍या राज्य स्पर्धेत सहभागी होण्याची राहीची ही तिसरी संधी आहे. यापूर्वी एकूण दोन राज्य स्पर्धेत राही सहभागी झाली होती. एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॅम्पमध्येही राही उपस्थित राहणार आहे. राहीने जिल्हा पातळीवर ‘आर्टिस्टिक’ प्रकारात दहा वर्षार्ंखालील गटातून आंतरशालेय स्पर्धेत रौप्यपदक, १२ वर्षांखालील गटातून सुवर्णपदक, १४ आणि १६ वर्षांखालील गटातून कांस्यपदक पटकाविले आहे. जिल्हा पातळीवर ‘ट्रम्पोलिन’ प्रकारात २०१८ मध्ये वैयक्तिक पातळीवर राहीने प्रथम क्रमांक मिळवित ३२.२० गुण मिळवित सुवर्णपदक मिळविले. २०१९ मध्ये ‘सब ज्युनियर’ गटातून प्रथम क्रमांक मिळवित ४१.२० गुण मिळवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
 
२०२२ मध्ये तिने ‘सब ज्युनियर’ गटातून प्रथम क्रमांक मिळवित ४२ गुण मिळवून तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. राज्यपातळीवर देखील ‘ट्रॅम्पोलिन’ प्रकारात दोन वेळा सुवर्णपदकाची राहीने कमाई केली आहे. राष्ट्रीय पातळीवर बंगळुरुमध्ये झालेल्या स्पर्धेत खुल्या गटातून दोन सुवर्ण, रौप्य आणि कांस्य, अशी पदकाची कमाई तिने केली आहे. डोंबिवलीत झालेल्या ‘राष्ट्रीय जिम्नॅस्टिक’ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकाविण्यात राही यशस्वी ठरली. ‘एशियन जिम्नॅस्टिक कोचिंग कॅम्प’मध्ये राही सहभागी झाली होती. गुजरातमधील वडोदरा याठिकाणी हा कॅम्प पार पडला होता. तेव्हा, अशा या डोंबिवलीकन्येला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम.
 
"सरकार क्रिकेट, कबड्डी अशा सगळ्याच खेळांकडे लक्ष देते. पण, याच खेळांप्रमाणे ‘जिम्नॅस्टिक’कडेदेखील सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ‘जिम्नॅस्टिक’च्या खेळाडूंमध्ये देखील क्षमता आहे. हे खेळाडू जागतिक स्पर्धेत सहभागी झाले तरच ते देशासाठी पदक जिंकून आणतील. म्हणूनच सरकारने ‘जिम्नॅस्टिक’कडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे." - राही पाखले
 
@@AUTHORINFO_V1@@