समाजासाठीच... डॉ. नरेंद्र पाठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2022   
Total Views |

manasa
 
‘स्टुडंट पॉवर, नेशन पॉवर’ या सुत्रानुसार विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे डॉ. नरेंद्र पाठक. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणूनही त्यांचे कार्य ध्येयाप्रती समर्पित आहे. त्यांच्याविषयी...
 
 
 
अत्यंत समाजशील आणि समरस समाजाचे पाईक भागवत पाठक गुरूजी आणि त्यांची पत्नी शकुंतला. पाठक घराणे मुळचे अंमळनेरचेच. त्यांचे सुपुत्र नरेंद्र. भागवत गुरूजी रा. स्व. संघाच्या शाखेत जायचे. त्यामुळे बालपणी समजू लागल्यापासून नरेंद्र शाखेत जाऊ लागले. नरेंद्र यांना लहानपणापासूनच वाटे की, आपण शिक्षक व्हावे. ते पुढे नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्यही झाले. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात त्यांचा आलेख नेहमीच उज्ज्वल राहिला. ‘एम. कॉम’, ‘बीएड’, ‘पीएच.डी’पर्यंत शिक्षण असलेल्या डॉ. नरेंद्र पाठक यांना केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे २०१६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला. ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गौरव’ आणि ‘ठाणे भूषण’ पुरस्काराने ते सन्मानित झाले. ‘अनुभवाची या वाटा’ हे त्यांचे ललितबंध पुस्तक प्रकाशित आहे. केंद्र सरकारतर्फे २०१५ ते २०१८ या कालावधीसाठी ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’वर शासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. राज्य शिक्षण मंडळाच्या आणि बालभारतीच्या अभ्यास मंडळ सदस्यपदी ते अनेक वर्षे होते.
 
 
 
वाणिज्य विषयाची पुस्तके, लेखन आणि बाल भारतीच्या वाणिज्य विभागाचे ते अध्यक्षही होते. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदही भूषविले आहे. सध्या ते अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या उज्ज्वल कारकिर्दीमध्ये त्यांच्या जडणघडणीचा खूप मोठा वाटा आहे.१९७०-७५ साल होते ते. पण त्याही काळात १२ बलुतेदार आणि अलुतेदार यांचे हक्काचे घर म्हणजे भागवत पाठकांचे घर. भागवतगुरूजीही या सगळ्यांच्या घरी पुजापाठ करायला आवर्जून जात. भागवत गुरूजी सगळ्यांच्या घरी पूजाविधी करतात याबद्दल काही लोक वेगळाच सूर लावत. यावर भागवत गुरूजी म्हणत, “माता-पित्याचे छत्र हरवल्यापासून या समाजानेच मला मोठे केले. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत समाजबांधव धर्मनिष्ठ आहेत. त्यांच्या घरी पूजापाठ करायला जाणे म्हणजे धर्माचाच एक भाग आहे.” अशा खर्‍या अर्थाने समरस संस्कारात नरेंद्र घडत होते.
 
पुढे नरेंद्र पाठक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकू लागले. तिथे त्यांचा अभाविपशी संपर्क आला. त्याचकाळात भाजपचे सध्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अभाविपचे प्रचारक म्हणून अंमळनेरला आले. अभाविपच्या कार्यासाठी दादांनी जळगाव पिंजून काढला. त्यांच्यासोबत नरेंद्रही होते. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे, नियोजन आणि सामाजिक कार्यातले तारतम्य हे सगळे चंद्रकांतदादांसोबत अभाविपच्या माध्यमातून नरेंद्र अनुभवातून शिकत होते. हे सगळे करत असताना शिक्षण सुरूच होते. ‘एम. कॉम’ची परीक्षा झाल्यानंतर ते नशीब उजळवण्यासाठी भाईंदर येथे बहिणीकडे आले. ताईची परिस्थिती यथातथाच. त्यावेळी मीरारोड स्थानकही नव्हते. वीज नाही, पाणी नाही, शौचालय नाही. झोपडीसदृश्य घर. नरेंद्रना ‘एलआयसी’मध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकरीचा निरोप आला. नोकरी होती पार्ल्याला.
 
 
 
 
नरेंद्र सकाळी ६ वाजता घर सोडू लागले. ७.३० ते ९.३० मालाडला कोचिंग क्लासला शिकवू लागले. नंतर ‘एलआयसी’ कार्यालयात नोकरी. पुन्हा संध्याकाळी ७ ते ९ मालाडला कोचिंग क्लास आणि नंतर भाईंदरला घरी येत. त्यानंतर काही दिवसांनी ‘एम. कॉम’चा निकाल लागला. ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नरेंद्र यांना ‘एलआयसी’मध्ये कायमस्वरूपाची नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचकाळात नरेंद्र यांना बँकेतूनही नोकरीची संधी प्राप्त झाली. मात्र, शिक्षक व्हावे, या ध्यासापोटी त्यांनी या दोन्ही कायमस्वरूपी नोकरीच्या संधी नाकारल्या. असो. याच काळात चंद्रकातदादांना समजले की, नरेंद्र आता मुंबईत राहतो. त्यांनी नरेंद्र यांच्याशी संपर्क साधला व म्हणाले की, “मुंबईतही अंमळनेरसारखे अभाविपचे काम कर.” नरेंद्र चंद्रकांतदादांना म्हणाले, “मला एक वर्ष द्या. मी मुंबईत स्थिर होतो. प्राध्यापकाचीं नोकरी लागली की, पुन्हा कामाला सुरुवात करीन.”
 
त्यानंतर काही काळातच ते ग्रॅण्टरोडला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. महाविद्यालयात वर्षाचा पगार वर्षाच्या शेवटी एकदाच एकरकमी मिळणार हे आधीच कळले. नरेंद्र मग दुपारी ग्रॅण्टरोडच्या महाविद्यालयात नोकरी आणि संध्याकाळी ग्रॅण्टरोड ते गिरगाव चालत जात आणि तिथल्या रात्र महाविद्यालयात अर्धवेळ नोकरी करत. या सगळ्या काळात संपर्कात येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी, समाजाविषयी, देशाविषयी प्रेम आणि कर्तव्यभावना जागृत व्हावी यासाठी त्यांनी अथक कार्य केले. पुढे ते लालबागलाच राहायला आले. त्यांचा विवाह झाला. याचकाळात लालबाग परिसरात अभ्युदय बँकेच्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. कामगार वस्तीत अनुभवी प्राध्यापक कोण काम करणार? पण, नरेंद्र स्थिर नोकरी सोडून या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. कारण, त्यावेळी लालबाग-परळमध्ये परिस्थितीमुळे दहावीला दोनदा तीनदा नापास होऊन उत्तीर्ण होणार्‍या मुलांची संख्या वाढत होती. उत्तीर्ण होऊनही महाविद्यालयाची दारे त्यांच्यासाठी बंदच. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचेच, अशी नरेंद्र यांची इच्छा होती. ते या महाविद्यालयात रूजू झाले.
 
 
 
 
पहिल्या बॅचचे विद्यार्थी किमान दोन वेळा तरी दहावीला बसलेले. पण, बारावीला यातील ७७ टक्के विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढे या कामगार वस्तीमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले हे सांगायला हवे का? नरेंद्र यांनी अभाविपच्या कार्यात ‘स्टुडंट पॉवर नेशन पॉवर’चे सुत्र खर्‍या अर्थाने अंमलात आणले. आज अ. भा. साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना ते म्हणतात, “२०२५ साली रा. स्व. संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे काम करताना मी ध्येय ठेवले आहे की, २०२५ सालापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात परिषदेचे संघटन वाढवणार.” महाराष्ट्राच्या शैक्षणिक आयामात डॉ. नरेंद्र पाठक यांचे ध्येयपूर्ण कार्य अविस्मरणीय आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@