उस्मानाबाद : "ऊस हे आळश्याचं पीक आहे. रान तयार केलं, पाण्याची व्यवस्था केली की मग काहीच चिंता करायची गरज नाही. त्यानंतर त्याठिकाणी कोणी ढुंकुनही बघत नाही.", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. सोमवारी (दि. १८ एप्रिल) उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषि मंत्र्याने असं भाष्य केल्याने त्यांच्या या वक्तव्यावर राज्यात बऱ्याच चर्चा होत आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
"ऊस हे आळश्याचं पीक आहे. रान तयार केलं, पाण्याची व्यवस्था केली की मग काहीच चिंता करायची गरज नाही. त्यानंतर त्याठिकाणी कोणी ढुंकुनही बघत नाही. गडी मोकळा होतो. गावाच्या चावडीवर जातो आणि पंतप्रधान मोदींपासून ते गावात काय चाललंय याची चर्चा करत बसतो. ही अवस्था सध्या आमच्या ऊस वाल्यांची आहे." शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पवारांच्या वक्तव्यावर राजू शेट्टींचा हल्लाबोल
"पवार साहेबांना अजून माहित नाहीये की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय काय करावं लागतं. १८ महिने त्या ऊसाची जोपासना तळ हाताच्या फोडाप्रमाणे करावी लागते. आधी पूर्वमशागत, मशागत, खताचं योग्य नियोजन, रात्री-अपरात्री पाण्यासाठी शेतात जाणं, रासायनिक खत फवारणं ते अगदी ऊसाला कारखान्यांपर्यंत घेऊन जाणं; अशी कित्येक कामं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागतात. त्यामुळे ऊसाला आळशी शेतकऱ्याचं पीक म्हणणं चुकीचं आहे. आज ऊसाला हमीभावाचं कायदेशीररित्या संरक्षण आहे.", असे म्हणत स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर हल्लाबोल चढवला आहे.