औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या तथाकथित एकजुटीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे उघड झाले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतीत खुलासा केला आहे. शिवसेना नेते संदीपान भुमरे आणि अब्दूल सत्तार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास होत असून त्यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण होत असल्याचे त्यांनी मंगळवारी (दि. १९ एप्रिल) सांगितले. औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या एका मेळाव्यात टोपेंकडून असा आरोप करण्यात आला आहे.
"शिवसेनेच्या संदीपान भुमरे आणि अब्दूल सत्तार यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. केवळ सत्तेसाठी त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आघाडी सरकारमध्ये एकजूट असूनही फोडाफोडीचे राजकारण होत आहे.", असे टोपे यांचे म्हणणे आहे.
काही ठराविक कार्यकर्त्यांकडून कायम तक्रारी केल्या जातात"राजेश टोपे यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता शिवसेनेत घेतलेला नाही. महाविकास आघाडीत सर्वांना एकत्र घेऊन आम्ही काम करतो. मात्र काही ठराविक कार्यकर्त्यांकडून कायम तक्रारी केल्या जात आहेत. मी जर दादागिरी केली असती तर गेली ३५ वर्ष राजकरणात टिकलो नसतो. दादागिरीनं राजकारण होत नसतं.", असा दावा शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी केला आहे.