काबुल: आफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल मध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. विद्यार्थी सकाळच्या वर्गातून बाहेर पडत असताना हा स्फोट झाला. या दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान सहा जण ठार आणि 11 जण जखमी झाले आहेत.
शहराच्या पश्चिमेकडील शियाबहुल अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये हे स्फोट झाले. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जवळच असलेल्या एका शिकवणी केंद्रालाही ग्रेनेड हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले.
अजून तरी कोणत्याही संघटनेकडून या स्फोटांच्या जबाबदारीचा दावा करण्यात आला नाही. परंतु इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी यापूर्वीही या भागात हल्ले केले आहेत. या बद्दल बोलताना काबूलमधील मुहम्मद अली जिना रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, त्यांना शाळेतील हल्ल्यात आतापर्यंत चार मृतदेह आणि १९ लोकं जखमी अवस्थेत सापडले आहेत.
बॉम्बस्फोट झालेल्या दश्त-ए-बर्ची या भागात हजारा शिया मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे इस्लामिक स्टेट'च्या स्थानिक शाखेने या पूर्वीही इथे हल्ले केले आहेत.