मुंबई : मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील महत्त्वाच्या नाल्यांची सफाईची कामे मुंबई महापालिकेतील भाजपच्या दणक्यामुळे सुरू झाल्यानंतर, पालिकेतील काँग्रेस पक्षाला आता नालेसफाई करून घेण्याची जाग आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही नालेसफाई आणि रस्ता दुरूस्तींची कामे दि. ३१ मेपूर्वी करावीत, अशी मागणी पालिका आयुक्त/प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
“सद्यःस्थितीत मुंबईमध्ये अजूनही लहान व मोठ्या नाल्यांची साफसफाई व मुख्य रस्त्यांची दुरुस्तीची कामे चांगल्या प्रकारे सुरू झालेली नाहीत. यामुळे मुंबईत पावसाळ्यात नाले तुंबण्याची शक्यता आहे. यामुळे काही परिसर जलमय होऊन सर्वसामान्य करदात्या नागरिकांचे हाल होणार आहेत. नालेसफाईसाठी प्रशासनाने जी रक्कम संबंधित ठेकेदाराना मंजूर केली आहे. ती यामुळे वाया जाणार आहे. याबाबत आपण स्वत: लक्ष घालून ३१ मेपूर्वी मुंबईतील नालेसफाईची व रस्ता दुरुस्तीची कामे अग्रक्रमाने पूर्ण करावीत. नाल्याच्या बाजूला जो गाळ काढून ठेवला जातो, तो गाळ पावसाळ्यापूर्वी ‘डम्पिंग ग्राऊंड’वर टाकणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबईतील अनेक ठिकाणे जलमय झाली होती. त्यामुळे यंंदा मुंबईकरांवर अशा प्रकारचे संकट ओढवू नये, यासाठी पालिका प्रशासन नालेसफाई आणि रस्ता दुरूस्तीची कामे करत असली, तरी भाजपने नालेसफाईबाबत आरोप करत पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. परिणामी मुंबई महापालिकेचे आयुक्त/प्रशासक इकबालसिंह चहल यांना काही नाल्यांच्या ठिकाणी जावे लागले आणि सफाईविषयी सूचना देण्याची वेळ आली.