नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): “देशाची आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे, त्या राज्याच्या काही नेत्यांमध्ये खंडणीखोरीची प्रवृत्ती आहे. त्याच राज्यातील दोन नेते तुरुंगात आहेत. एक राष्ट्र म्हणून ही बाब चिंताजनक आहे,” अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी विरोधी पक्षांना टोला लगाविला.
विरोधी पक्षांच्या 13 नेत्यांनी शनिवारी देशातील जातीय हिंसाचार आणि द्वेषपूर्ण भाषणाच्या घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती. या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यास भाजपतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी देशवासीयांना उद्देशून लिहीलेल्या खुल्या पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “केंद्र सरकारवर आरोप करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपल्या कार्यकाळात आणि आपल्या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, त्याचा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारमधील दोन नेते तुरुंगात असून त्यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणीखोरी आणि समाजविघातक तत्त्वांशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे. ज्या राज्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी आहे, त्याच राज्यातील नेत्यांमध्ये खंडणीखोरीची प्रवृत्ती आढळणे, ही बाब राष्ट्र म्हणून चिंताजनक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठ वर्षांमध्ये देशातील राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदलत असल्याचे नड्डा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “देशात आता मतपेढी आणि घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येत असून विकासाच्या राजकारणास देशातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे जनतेने नाकारलेल्या राजकीय पक्षांचे लांगूलचालनाचे राजकारण यशस्वी होणार नाही,” असेही नड्डा यांनी पत्रात म्हटले आहे.
तेव्हा कुठे असता...?
नड्डा यांनी आपल्या पत्रात विरोधकांना टोकदार प्रश्न विचारले आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थानातील करौली हिंसाचाराविषयी तुमची भूमिका काय, असा सवाल विचारला आहे. त्याचप्रमाणे 1966 साली इंदिरा गांधी यांनी हिंदू साधूंवर केलेला गोळीबार, राजीव गांधी यांचे शीख हिंसाचाराचे समर्थन करणारे वक्तव्य, गुजरात, मुरादाबाद, भिवंडी, भागलपूर येथील जातीय दंगली, 1980च्या दशकात काश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या याविषयी भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्ष नेमके कोठे असतात, असेही नड्डा यांनी पत्रात म्हटले आहे.