काकासाहेब, तुमची शपथ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2022   
Total Views |

sharad

 
काकासाहेब, १९९३ साली तेरावा बॉम्बस्फोट झाला, असे सांगून केवढे सगळ्यांवर उपकार केलेत. ते ‘कमळवाले’, ते महाराष्ट्रातले लोक तुम्हाला काहीही म्हणोत. पण तुम्हीच माझे तारणहार. तुमचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मी तुमच्या सिद्धांतानुसार चालतो. श्रीराम नवमीला शोभायात्रांवर दगड फेकले गेले. हिंसा झाली. पण मला कुणी विचारले नसताना, मी म्हणालो, “मशिदीच्या बाहेर हंगामा केला, त्याचा परिणाम म्हणून हिंसा झाली.” बोलले काकासाहेब, मी बोललो. मी तुमच्या लाडक्या आणि तुमचे लाडके म्हणून माझे लाडके असलेल्यांच्या बाबतीत बोललो. इतकेच काय? मी गुजरातमधल्या बिचार्‍यांबद्दलसुद्धा बोललो. मी म्हणालो, “मोदी-शाह यांच्या गुजरातमध्ये ते दगड फेकतील का?” थोडक्यात, ते घाबरलेले आणि त्यांच्यासमोरचे माजलेले, दुष्ट असे चित्र उभे करायचा प्रयत्न मी केला ना! मग ‘सेक्युलर रोखठोक’ आहे मी.
 
काकासाहेब, तुमचे मानलेले माजी पुतणे काल आमच्या थोरल्या साहेबांसारखे भगवी शाल घेऊन होते. ते म्हणे, अयोध्येला पण जाणार आहेत. आता काय करावे? काकासाहेब, आपण डझनवारी हिरव्या शाली घेऊया का? मी तर इतका उत्साही आहे, फक्त दाढी राखून लांब सदरा आणि आखूड तुमान घालायचा विचार करतो. काकासाहेब, कुठल्यातरी पवित्र दर्ग्यावर जाऊया का? जाऊन येऊ. तिकडचे फोटो व्हिडिओ दाखवत राहू. मग, आपण खरे निधर्मी आणि पुरोगामी आहोत, असा शिक्का बसेल. हो आधीच सांगतो काकासाहेब, या सगळ्या कल्पनांचे आणि संकल्पनांचे ‘क्रेडिट’ माझे आहे बरं. नाहीतर पुन्हा मुंब्र्याचे ‘सेव गाझा’वाले येतील आणि ‘क्रेडिट’ घेऊन जातील.बरं तर बरं... नवाबांची नवाबी संपली. काकासाहेब, तुमची शपथ मीच तुमचा आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ असे म्हणणार्‍या उमर खलिदला भेटायला कोण गेलेले सांगा? ‘फ्री-काश्मीर’चे बॅनर मुंबईमध्ये झळकवणार्‍या मुलीचे समर्थन कुणी केले सांगा? मीच तो ‘सौ दाऊद एक...’ काकासाहेब तुमच्यानंतर मलाच काय तो ‘महाराष्ट्राचा चाणक्य’ बनवा. लोकांना काय कळते? मोठ्या साहेबांचे नाव घेतले, महाराष्ट्राची अस्मिता, मुंबई तोडण्याचा डाव आहे म्हटले की झाले. असे काहीबाही बोलून दिवस ढकलायचे म्हणजे झाले आमचे हिंदुत्व.. हिंदू तरुणाईला इतके दिवस असे दिशाहिन केले. त्यासाठी तरी मला बक्षिसी द्या. काकासाहेब!
 
अशांत शांतता...
 
कुणी काही म्हणत नाही, कुणाचीच तक्रार नाही,
आमच्या महाराष्ट्रात कसं आलबेल आहे...
 
हो नाही म्हणायला बंद-मोर्चे वगैरे होत नाहीत. कसे होणार? एसटी कामगारांच्या संपाचे काय झाले? सामान्य एसटी कामगार, त्यांचे कुटुंबीय काय विचार करतो, याबद्दल कुणीही काही म्हणत नाही आणि एसटी कामगारही प्रतिक्रिया देणार नाही. का? त्यांना कसली भीती आहे? याबद्दलही कुणी काही म्हणणार नाही. एका पीडित महिलेच्या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. पण पुढे काय झाले? ते तसे का झाले? पालघरचे साधू हत्याकांड, पूजा चव्हाण आणि दिशाचा मृत्यू, हिरेन मनसुखचा मृत्यू, सुशांत सिंहचा मृत्यू या सगळ्यांचे मृत्यू प्रकरण म्हणजे ‘रात गयी बात गयी.’ कोरोना काळात ढिसाळ कारभारामुळे ज्यांच्या घरचे कर्ते पुरुष गेले, ज्यांच्या डोक्यावरची मातापित्याची सावली हरवली ते आजही काय विचार करतात. ते बोलतात का? नाही. कारण, महाराष्ट्रात कसं सगळं शांत-शांत आहे, ही अशी अशांत शांतता खरंच महाराष्ट्रात यापूर्वी कधी होती का?
 
आज महाराष्ट्रात कोणत्याही अत्याचार आणि अन्यायाबद्दल बोलण्यास कुणीही पुढे येत नाही. उलट झालेला अन्याय-अत्याचार झालाच नाही आणि तो कसा चांगला आहे, हे सांगणार्‍या झुंडीच्या झुंडी तयार केल्या जातात. जनतेची सेवा, राज्याचा विकास अशा बातम्या सहसा दिसतच नाहीत. ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरते ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात येणे ही. ऐन कडक उन्हाळ्यात विजेचे ‘लोडशेडिंग’, पाण्याची भीषण टंचाई यावर जनता काही बोलत नाही. मुकी आणि बधिर होऊन सहन करत आहे. महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती निर्माण करणार्‍या या सगळ्या राजकारण्यांबद्दल सामान्य महाराष्ट्रीयन माणूस काय विचार करतो? नाही, पण त्याने विचार करायची खोटी की, त्याच्यासमोर महाराष्ट्र आणि दिल्लीच्या तख्ताचे पुराण उकरण्यात येते. ८०च्या दशकातल्या महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितेची पुन्हा-पुन्हा आळवणी करण्यात येते. पुणेरी पगडीवाद काढण्यात येतो. आरक्षणाचा मुद्दा गाजवण्यात येतो. संविधान बचाव वर चर्चा झोडण्यात येतात. अगदीच काही झाले नाही, तर थोरामोठ्यांच्या पुतळ्यांची विटंबना करणे आहेच. कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र?
@@AUTHORINFO_V1@@