‘गणपती वप्प मोरियं’च्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2022   
Total Views |

ashok
दि. ९ एप्रिल रोजी सांयकाळी ८ वाजता रवींद्र नाट्यमंदिर दादर येथे ‘मैत्रेय संघ’ निर्मित सिद्ध प्रणित ‘अद्वैत थिएटर्स’ प्रकाशित ‘गणपती वप्प मोरियं’ नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या बौद्ध समाजाची नाळ सम्राट अशोकाच्या बौद्धकाळाशी जोडण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेला की, या सगळ्या प्रयत्नात या नाटकातून तेच ते ‘एक धर्म श्रेष्ठ आणि दुसरा अत्यंत वाईट’ हे सांगण्याचा प्रयत्न केला का? याविषयी...
सम्राट अशोक महाराणी विदीशा दोघेही तथागत गौतम बुद्धांच्या विचारसरणीनुसार जीवनक्रमण करत आहेत. सगळे काही शांततेत चांगले सुरू असताना राज्यातले भटभिक्षूक पुरोहित अशांत आहेत.पुरोहितवर्गच स्वत:च्या स्वार्थासाठी कंलिगाच्या राजाला सम्राट अशोकाविरोधात लढण्यास उकसवतो. कंलिगाचा राजा अनंत पद्मनाभन सम्राट अशोकाला ‘दासीपुत्र’ संबोधन करतो. त्यावेळी मग सम्राट अशोक रागवतात. ते म्हणतात ”मी इतक्या मोठ्या राज्याचा सम्राट आहे. मी गणांचा राजा आहे. गणाधीश आहे. मग क्षुद्र म्हणून अपमान करता काय? दासीपुत्र म्हणून माझा अपमान करणार्‍या, क्षुद्र म्हणून हिणवणार्‍यांविरोधात मी लढणार! हे आमचे वप्प मोरयं आहे. ‘गणपती वप्प मोरयं” ढॅण ढॅण नाटकाचा पहिला अंक संपला...
नाटकाचा पहिला अंक पाहून वाटते, अरे यात आपण समजत असलेल्या गणपती बाप्पांचे काही नाही. मात्र, या नाटकाची जाहिरात विशिष्ट पद्धतीने केली गेली होती. तथागत गौतम बुद्धांची ध्यानमग्न चित्र, त्याखाली भारतीय इतिहासातील सोनेरी काळ, अशी ओळ त्या खाली ‘गणपती वप्प मोरियं’ असे नाव. गौतम बुद्ध आणि ‘गणपती वप्प मोरियं’ हे समीकरण पाहिले की, महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळात दोन गट पडलेच म्हणून समजा! सदासर्वकाळ हिंदू समाज आणि देवदेवता तसेच श्रद्धा परंपरांना शिवीगाळ करणे म्हणजे आपला धर्मच आहे, असा मानणारा एक अतिशय विद्वेषी गट आणि दुसरा गट म्हणजे, या विद्वेषातून आपली राजकीय पोळी भाजता येईल का, हे पाहणारा गट. त्यामुळे विद्रोही गटात तर या नाटकाबद्दल प्रचंड आत्मियता होती.
नाट्यगृहात प्रचंड गर्दी. माझे नाटकाचे तिकीट पहिल्या रांगेतले होते. तिथे पोहोचले,तर तिथे आधीच भंतेजी बसलेले.खरे तर त्यांना मान्यवर अतिथी म्हणून यजमानांनीच तिथे बसवलेले.त्यात त्यांची काही चुकच नव्हती. नाट्यगृहात दर्शकांच्या मदतीसाठी ‘मैत्री संघटने’ची तरुणाई मदत करत होती. त्यांनी त्याच रांगेतल्या एका रिकाम्या खुर्चीवर मला बसायला सांगितले. ‘कुणी आले तर ‘अ‍ॅडजेस्ट’ करू’ म्हणून ते निघून गेले. त्यानंतर नाटक एकदाचे रात्री 8.45 मिनिटांनी वाजता सुरू झाले. सुरुवातीपासून नाटकाच्या लेखकाने लेखन स्वातंत्र्याचा उपयोग स्वत:चे विचार मांडण्यासाठी केलेला दिसतो. समाजात सम्राट अशोकांच्या कारकिर्दीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जातात. ते प्रश्न क्षीण आहेत, पण आहेतच.या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी या नाटकाचे प्रयोजन आहे का, असेही वाटू लागते. जसे काही लोकांचे म्हणणे आहे की, सम्राट अशोकांच्या बौद्धमय भारतामुळे भारतावर हिंसक परकीयांना आक्रमण करून विजयी होणे सोपे गेले. तर या नाटकातून सम्राट अशोकांच्या क्षात्रतेजाबद्दल भरभरून सांगितले गेले आहे. सम्राट अशोकाने राज्य रक्षणासाठी कशा विविध योजना अंमलात आणल्या वगैरे पाहायला मिळते.
तसेच, आस्तिक आणि नास्तिक हा आजही समाजात वादाचा मुद्दा. बौद्ध समाजातील एक अतियश नगण्य संख्येचा गट देवाला न मानणारा आणि कुणी मानणारा असेल, तर त्यावर बहिष्कार वगैरे टाकण्याची भाषा करणाराही आहे. या नाटकात सम्राट अशोक आणि कलिंगाच्या राजाचे देव मानणे आणि न मानणे यावर स्वतंत्र मनोगत आहे. अनंत पद्मनाभन मनोगतामध्ये म्हणतो, ”या देवा, तुझ्या शक्तीचे सामर्थ्य दे. देवशक्तीला न मानणार्‍या लोकांचा मी विरोध करतो,” तर दुसरीकडे सम्राट अशोक म्हणतात, ”देव-दैवत ही काल्पनिक शक्ती आहे. आम्ही काल्पनिक शक्ती मानणार नाही. आम्ही निसर्गाला मानतो. काल्पनिक शक्तीला मानणार्‍यांना सत्य सांगणार.” मात्र, देव वगैरे नाकारताना या नाटकातला सम्राट अशोक स्वत:च्या नावापुढे ‘देवनामप्रिय’ ही उपाधी लावतो. एकंदर नाटकात सम्राट अशोक नास्तिकेचा ‘उदोउदो’ करतो, तर कंलिगाचा राजा अस्तिकता दाखवून असमर्थता दर्शवून रडत राहातो.
आजपर्यंत इतिहासात असा उल्लेख ऐकला होता की, कलिंगाच्या युद्धानंतर सम्राट अशोक बौद्ध धर्म स्वीकारतात. पण, या नाटकामध्ये सुरुवातीपासूनच सम्राट अशोक बौद्धमय असतात. प्रत्येक नाट्य प्रसंगानंतर बौद्ध धर्म कसा तत्कालीन दुसर्‍या धर्मापेक्षा श्रेष्ठ, चांगला आहे, राज्यातला तत्कालीन धर्म कसा अधर्मी आहे, यावर तर सम्राट अशोकांना मोठमोठी मनोगतं म्हटलेली दिसतात. पुढे या नाटकात कलिंगाच्या युद्धानंतर जवळ जवळ शत्रू पक्षातील जवळ जवळ दीड लाख सैनिकांना कैद केले, असे सुचित केले जाते. सम्राट अशोक भिक्खू संघाला या लाखो कैदी सैनिकांना सद्धर्म शिकवण्यासाठी पाठवतात. पुढे हे सैनिक बौद्ध धर्म स्वीकारतात. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर सम्राट अशोक म्हणताना दाखवलेत की, ”हे सैनिक अधर्मातून धर्मात आले. हे आमचे वप्प मोरयं.” हा प्रसंग नाटकापुरता आहे की खरा? नाटकात काही काल्पनिक असू शकते. पण, हे इतिहासात घडलेच असेल, तर मग हे प्रश्न आहेतच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हे प्रश्न विचारण्याचा हक्क आहेच म्हणा. कैदेतल्या, हरलेल्या आणि सर्वस्वी पराधिन लोकांनी सम्राटांच्या इच्छेनुसार धर्म प्रवचन ऐकून तो धर्म स्वीकारला यात त्यांची मनापासून धर्म स्वीकारण्याची इच्छा होती का? हे सगळे सैनिक त्यापूर्वी अधर्मात जगत होते का? राजाच्या इच्छेनुसार युद्धात उतरणे हेच त्यांच्या हातात होते.
ते युद्धात उतरले म्हणून ते अधर्मी कसे? प्रवचनाने त्यांच्यातला मूळ स्वभाव गेला का? तर असे प्रश्न उपस्थित होतात. असो. हे नाटक पाहण्यासाठी मुंबईबाहेरील भंंतेंनाही पाचारण करण्यात आले होते. (मी भंतेंच्याच बाजूला बसले होते.) खरोखर उपस्थित भंते प्रज्ञावान, नम्र होते. काही लोकांनी भंतेंना प्रश्न केला, “नाटक कसे वाटले?” यावर एका भंतेंनी सांगितले, “नाटकामध्ये मला गती असल्याने मी याबद्दल सविस्तर सांगेन.” यावर नाटकाशी संबंधित एकजण म्हणाले, ”हो सम्राट अशोकांच्या जीवनावरचे नाटक असूनही रंगमच फिका होता. साधा होता हेच ना? काय करणार, नेपथ्यकार मुद्दाम वेळेवर आला नाही. त्यामुळे स्टेज लावता आला नाही. मळमळ ना? आम्ही आमच्या राजावर नाटक करतो म्हटल्यावर त्यांना आवडेल का? आम्हाला थांबवू शकत नाहीत तर असा त्रास द्यायचा.” यावर एक जण म्हणाले ”तुम्हाला माहिती होते, मग तुम्ही आपल्या माणसाला का दिले नाही काम.” मी ही मग म्हणाले, ”बोलवा त्या नेपथ्यकाराला आपण जाब विचारू.” यावर उत्तर आले, ”उशीर होतोय. चलचला नाटक सुरू होते आहे.” हे सगळे ‘याची देही याची डोळा’ पाहिल्याने हे खरे असेल, तर खूपच वाईट आहे. पण, तरीसुद्धा एकच बाजू ऐकली. त्यामुळे खरे-खोटे देवाला माहिती.
एकंदर ‘गणपती वप्प मोरियं’ नाटकाने बौद्ध धर्माचे माहात्म्य आणि सम्राट अशोकांचे महत्त्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकातील कलाकारांनी भूमिकाही चांगल्या साकारल्या आहेत. संगीतही नाविन्यपूर्ण आहे. प्रमुख नायक सतेज आणि सौंदर्याच्या चौकटीतला असावा असे समीकरणही नाटकात मोडलेले आहे. कलिंगाचा राजा उजळ गोरा देखणा, तर सम्राट अशोक सावळा. (चौकट मोडायचे धाडस केले याचे कौतुक) वरवर पाहताना यात काहीच गैर वाटत नाही. पण, या पाठीमागचे तर्क तपासताना मला अमेरिकेत ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ प्रसंग घडल्यानंतरचे दिवस आठवले. त्यावेळी काही तथाकथित पुरोगाम्यांनी माझ्याशी वाद घातला होता. आपण काळे-सावळे आहोत. आपण त्या साडेतीन टक्क्यांसारखे शुभ्रगोरे नाहीत. कारण, ते आपले नाहीतच. तुझ्या-माझ्यासोबत तेच होणार, जे अमेरिकेत त्या काळ्यांबरोबर झाले. पण, आपण श्रेष्ठ आहोत. अर्थात, त्यानंतर माझ्याबरोबर काय त्यांच्याबरोबर पण काहीच घडले नाही ही गोष्ट निराळी! तर ‘गणपती वप्प मोरयं’च्या निमित्ताने असे काही मला वाटले...
 
 
v
@@AUTHORINFO_V1@@