ओसिनाचीचा मृत्यू आणि प्रश्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2022   
Total Views |
 

osinachi 
 
 
तू जे बोलतोस ते करतोस
बघू दे आमच्यासाठी काय करतोस
बघू दे कधी आम्हाला मुक्त करतोस...



ओसिनाची न्वाचुक्वूने गायलेल्या या गीताला जगभरात करोडो लोकांनी डोक्यावर घेतले. तिचा आवाज ख्रिस्ती धर्मीयांच्या श्रद्धेचा भाग बनला. जगभरातल्या ख्रिस्ती धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नायजेरियातील ‘डुनामिस गोसपेल इंटरनॅशनल सेंटर’मध्ये ती धार्मिक गायन करायची. या सेंटरची बातच काही और. जरा गुगलवर शोध घ्या. कळेल की, या सेंटरमधून साक्षात येशूची कृपा होते. दृष्टीहिन पाहू शकतात, दिव्यांग चालू-फिरू लागतात. अगदी मरायला टेकलेले ताजेतवाने होतात, अशा प्रकारची निवेदन दिसतील, तर येशूची दया लाभलेल्या सेंटरच्या गायिकेचे दि. ८ एप्रिल रोजी निधन झाले. तिच्या मृत्यूने ख्रिस्ती परंपरा, चर्च आणि पास्टरचा पगडा तसेच, नायजेरियातील घरगुती हिंसेेसंदर्भात नसलेला कायदा या सगळ्या गोष्टी वादाच्या भोवर्‍यात सापडल्या. पास्टर पिटर हा ओसिनाचीचा पती.
 
 
तो तिला छळायचा, मारायचा. तिला जगभरातून गायनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण असायचे. पण, पिटर त्याला वाटेल तेच कार्यक्रम तिच्यासाठी स्वीकारायचा. त्यातून मिळालेले मानधन, पैसे तो स्वतःकडे ठेवायचा. ओसिनाचीचे स्वतंत्र बँक खातेही नव्हते. तो तिला माहेरी पाठवत नसे. तिची आई, बहीण आणि मित्र मैत्रिणी तिला घटस्फोट घे सांगायच्या. पण, ओसिनाची म्हणे ”विवाह स्वर्गात जुळतात. आपल्या ख्रिस्ती मान्यतेप्रमाणे घटस्फोट घेणे म्हणजे पाप.” त्यामुळे तिला सगळे सहन करायला हवे. येशूची प्रार्थना केल्यावर त्याच्यात बदल होईल आणि आमचा संसार चांगला होईल, असे ती श्रद्धाळू माने. एक वर्षापूर्वी ती आजारी पडली. त्यावेळी चर्चच्या पास्टरकडे ती आणि तिचा पती गेले होते.


पास्टरने प्रार्थना केल्यास ती बरी होईल, असे तिचे म्हणणे. पण, खूप प्रार्थना करूनही ती बरी झाली नाही. श्रद्धा माणसाला तारते. पण ती श्रद्धा की, अंधश्रद्धा आहे हे समजणे महत्त्वाचे. तेच नेमके ओसिनाचीच्या बाबतीत घडले. तिच्या मृत्यूपूर्वी काही दिवसांआधी एका व्यक्तीने ओसिनाचीच्या बहिणीला आणि आईला सांगितले की, ”पिटरने ओसिनाचीच्या छातीवर लाथ मारली. त्यामुळे तिच्या छातीमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या. तिला रुग्णालयात दाखल केले.” मात्र, पिटरने तिच्या माहेरच्यांना तिला भेटू दिले नाही. यावर तिच्या नातेवाईकांनी पिटरशी वाद घातला. त्यावेळी ओसिनाची रडत त्यांना म्हणाली, “तुम्ही घरी जा, येशू त्याच्यात नक्की बदल घडवेल.” मात्र, ओसिनाची मृत्यू पावली.

असो. येशूची प्रत्यक्ष कृपा असणार्‍या सेंटरमधल्या प्रमुख गायिकेच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर नायजेरियामध्ये वादळ उठले. घरगुती हिंसेविरोधात याचिका दाखल केली. हजारो लोकांनी त्यावर समर्थनार्थ सह्या केल्या. नायजेरिया सरकारला घरगुती हिंसाचारासंदर्भात सध्या बैठका घ्याव्या लागत आहेत. दरम्यान, तिच्या पतीला अटक झाली असून त्याचा आणखी एक विवाह उघड झाला आहे. दुसरीकडे ख्रिस्ती वर्तुळातही घटस्फोटाला बायबलची मान्यता आहे अथवा नाही, याची पारायणं केली जात आहेत. पाश्चिमात्य वर्तुळातील समाजमाध्यमांवर याबद्दल विशेष ‘ट्रेंड’ आणि ‘हॅशटॅग’ सुरू आहे. यावर ‘डुनामिस गोसपेल इंटरनॅशनल सेंटर’चे पास्टर पॉल इनेनचे ओसिनाचीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करून म्हणाले, “तिच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत काही माहिती नव्हती,” तर ओसिनाचीच्या आई आणि बहिणीचे म्हणणे की, ”दुसर्‍या अपत्याच्या जन्मानंतर ओसिनाचीचा फोन आला होता की, तिचा नवरा तिचा खून करू पाहातो. त्यावेळी आम्ही तिला माहेरी आणले. मात्र, ओसिनाचीचा पती पास्टर पिटर दुसर्‍या काही पास्टरांना घेऊन ओसिनाचीला परत न्यायला आला होता. तसेच, चर्चच्या वास्तूमध्येही पिटर ओसिनाचीला मारहाण करीत असे.” ओसिनाचीच्या मित्र-मैत्रिणींचे म्हणणे की, ”ओसिनाचीला भीती वाटे.


तिने तिच्या नवर्‍यापासून घटस्फोट घेतला, तर तिला धर्ममान्यतेप्रमाणे पापी ठरवले जाईल. तिला चर्चमध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमात गाणी गायला बोलावणे येणार नाही. मग ती काय करणार?” दुर्दैवी ! यावर असेही वाटते की, जगभरात येशू मर्सीचे कार्यक्रम घेऊन लोकांना दुःख आणि आजार निराशेपासून बरे करणार्‍यांना ओसिनाचीच्या मृत्यूचे क्रूर कारण समजले का? ओसिनाचीचा मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करून गेला हे नक्की. त्या प्रश्नांचे उत्तर ना तिच्या धर्मसंस्थेकडे आहे ना तिच्या धर्ममान्यतेकडे आहे.



@@AUTHORINFO_V1@@