पर्यावरणप्रेमी ‘भरत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2022   
Total Views |
 
 
more
 
 
दहावी नापास झाल्यानंतर खचून न जाता, जिद्दीने उच्चशिक्षणातील यशशिखरे पादाक्रांत करणारे पर्यावरणप्रेमी ठाणे महानगरपालिका कर्मचारी भरत सीताराम मोरे यांच्याविषयी...
 
 
ठाणे महापालिकेचे कर्मचारी असलेल्या भरत मोरे यांचा जन्म १९७० साली झाला. त्यांचे कुटुंबीय गेल्या ७० वर्षांपासून ठाणे पूर्वेकडील चेंदणी कोळीवाड्यात चाळीत वास्तव्यास आहेत. आई-वडील अशिक्षित असल्याने घरची परिस्थिती तशी बिकटच. त्यामुळे घरात शैक्षणिक आबाळ होती. तरीही, भरत यांनी पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर घराजवळच्या मो. कृ. नाखवा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दररोजच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याने शालेय शिक्षणाची आवड असूनही कोणतेही ट्युशन वा शिकवणी लावण्याची ऐपत नव्हती. तरीही कशीबशी दहावी इयत्तेपर्यंत मजल मारली. मात्र, इंग्रजी विषयात नापास झाल्याने भरत यांच्या शिक्षणात खंड पडला. परंतु, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ’शिका आणि संघटित व्हा!’ हे ब्रीदवाक्य बालपणीच भरत यांच्या मनावर बिंबवले असल्याने खचून न जाता ‘ट्राय अगेन-ट्राय अगेन’ या कवितेचा आदर्श घेऊन लगेचच ऑक्टोबरला पुन्हा ‘इंग्रजी’ या विषयाची परीक्षा देऊन काठावर उत्तीर्ण झाले.
 
 
आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांनी कॉलेज न करता अंबरनाथ ‘आयटीआय’मध्ये ‘वेल्डर’या ट्रेडसाठी प्रवेश घेतला. शिक्षणाची आवड असल्याने मोरेंनी प्रायव्हेट कंपनीत काम करीत शिक्षण घ्यायचे ठरवले आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. आपल्या दैनंदिन कामाचे टार्गेटपूर्ण झाल्यावर मोरे कंपनीतच अभ्यास करत असत. नोकरी आणि अभ्यासाची सांगड घालून अखेर त्यांनी पहिल्या पदवीला गवसणी घातली.
 
 
अंगी तंत्रकौशल्य होतेच, त्यात पुढील शिक्षणात उत्तीर्ण होत गेल्याने ठाणे महापालिकेत ‘वेल्डर ट्रेड’साठी त्यांना नोकरी लागली. परिस्थिती हळूहळू सुधारत गेल्याने उच्चशिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देईना. ‘नॉनमॅट्रिक’ हा शिक्का पुसून काढत त्यांनी ‘बीए’ केले, त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठातून दोन वेळा ‘एम.ए’ केले. त्याचाच परिपाक म्हणून आज ते डबल ‘एम.ए’ असून ‘डिप्लोमा इन जर्नलिझम’ पदविकाधारक आहेत. शिवाय जर्नलिझममध्ये पदवीसाठीही त्यांनी प्रवेश घेतला असून यंदा ते पदवीच्या अंतिम वर्षांत शिकत आहेत. भविष्यात ‘एलएलबी’ आणि ‘पीएच.डी’ करण्याचा मानस असल्याचे मोरे सांगतात.
 
 
आई-वडील, शिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांना प्रेरणास्थानी मानणार्‍या मोरे यांना आपणही सेवाभावीवृत्तीने समाजासाठी काम करण्याची आस लागली. शिक्षणासोबतच शरीरसौष्ठव, स्विमिंगची आवड तसेच, झाडे लावणे, झाडे जगवणे, लोकांची मदत करणे, लोकांचे जीव वाचवणे, पशुपक्षांचे जीव वाचवण्याचे काम सुरू केले. जलतरणामध्ये अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत.
 
 
यामुळे नोकरी करूनदेखील सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवता येतो, याचा उत्तम परिपाठ मोरे यांनी घालून दिला आहे.
ठाण्याच्या विविध भागात झाडे लावून त्यांनी जगवली आहेत. विशेष म्हणजे, गेली २२ वर्षे विनामोबदला दररोज 365 दिवस झाडे लावून जगवत असल्यामुळे कोपरी विसर्जन घाटावर फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक मोरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करतात. एखाद्याला घरात अडसर ठरणारे झाड द्यायचे असेल, तर भरत मोरे यांनाच आवर्जून फोन केला जातो. इतकेच काय, तर मोरे यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त, आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावून जगवली आहेत. निसर्गाची आवड असल्यामुळे गडकिल्ले फिरण्याचा त्यांना छंद आहे. या फिरस्तीतून आजवर त्यांनी अनेक किल्ले पादाक्रांत केल्याचे सांगतात. अनेक विद्यार्थ्यांना अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यास प्रवृत्त करतात. जातीचे दाखले, वास्तव्याचे दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखला, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत गोरगरिबांना फायदा मिळवून देतात.
 
 
ऐपत नसतानाही ‘कोविड’ काळात गरजू तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप त्यांनी केले. तसेच पोलिसांना मदत म्हणून लोकांमध्ये ‘कोविड’बाबत भीती घालवून जनजागृती केली. रस्त्यांवर खितपत पडलेल्या बेवारस वृद्ध व महिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे पालकत्व नेहमीच निभावत असल्याचे मोरे सांगतात. खाडीत बुडणार्‍या अनेकांसाठी जीवरक्षक ठरलेल्या मोरे यांनी एप्रिल २०२१ मध्ये ऐन ‘कोविड’ काळात जीवावर उदार होऊन ठाण्याच्या खाडीत चिखलातून एका तरुणाला सुखरूप बाहेर काढल्याचा वृत्तांत सर्वच प्रसारमाध्यमांनी वाखणला होता. याशिवाय भूतदया दाखवत अनेक पशुपक्ष्यांनाही त्यांनी जीवदान दिले आहे. लिखाणाची आवड असल्याने ते मुक्त पत्रकारिताही करतात. पोलिसांची शांतता समिती तसेच भूमिपुत्रांची संघटना आदींसह विविध संस्थांशी संलग्न असलेले मोरे नेहमीच दुसर्‍याच्या सुखदुःखात सहभागी होतात. यामुळे अनेक मंडळे, संस्था व सामाजिक अधिष्ठानांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे.
 
 
शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस हाच केंद्रबिंदू मानणारे भरत मोरे नवीन पिढीला संदेश देताना, “कोणतेही क्षेत्र निवडा, पण काम मनापासून करा, यश नक्की मिळेल,” असे सांगतात. अशा या पर्यावरणप्रेमी कर्मचार्‍याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
@@AUTHORINFO_V1@@