मुंबई : "पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते." असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. १३ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तरसभेवर प्रतिउत्तर म्हणून पवारांनी ही पत्रकार परिषद आयोजित केल्याचं म्हटलं जातंय. मात्र शरद पवार हे धादांत खोटं बोलत असल्याचे मंदार चक्रदेव यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मंदार चक्रदेव आपल्या फेसबुक
मध्ये म्हणतात, "पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते. असे वक्तव्य शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केले होते. मात्र ते धादांत खोटे बोलतायत. उलट जेम्स लेन यानी जे लिखाण केले त्या पूर्ण पुस्तकावरच बंदी आणावी ही मागणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर जयंसिगराव पवार, पांडुरंगराव बलकवडे, निनादराव बेडेकर या इतिहास संशोधकांनी पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एका महिन्याच्या आत केली होती. ज्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जेम्स लेनचे 'शिवजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक प्रकाशित केले त्या संस्थेला १० नोव्हेंबर २००३ मध्ये पत्र पाठवत पुस्तक मागे घ्यायला लावले होते."
"२१ नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने यासंदर्भात माफी मागत संबंधित पुस्तक मागेही घेतले. मात्र शरद पवार यांच्या संभाजी ब्रिगेडने पुस्तकाच्या प्रती मिळवून राज्यात त्याचे वितरण करत खरी बदनामी त्यांनी केली. त्यानंतर अत्यंत दुर्मिळ ग्रंथ असलेली भांडारकर संस्थाही फोडण्यात आली. कोणी केले हे पवार साहेब? द्वेष कोणी पसरवला? ज्या शिवशाहिरांनी आपली पूर्ण हयात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साधनेत घालवली, शिवचरित्राचा जगभर प्रसार केला; त्यांच्यावर टीका करणे योग्य आहे हे तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय?", असेही ते पुढे म्हणाले.