आधुनिकतेशी समन्वय साधून भारताची आध्यात्मिक, राष्ट्रीय आणि पारंपरिक गृहरचना हे महापुरुषांच्या निर्मितीचे एक शक्तिकेंद्र बनले पाहिजे. स्वच्छ राष्ट्रचरित्र, सुदृढ राष्ट्रनिर्मितीला महत्त्वाचा हातभार लागतो तो म्हणजे एका मातेचा, जी आपल्या अपत्यामध्ये चारित्र्य, संस्कार राष्ट्रप्रेम रुजवते. या मातृशक्तीच्या वैचारिक विकासासाठी आणि कल्याणासाठी ‘विश्व मांगल्य सभा’ ही राष्ट्रीय महिला जनसंघटना गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत आहे. त्याविषयी सविस्तर...
माता हा घराचा आत्मा असतो आणि राष्ट्राचा आत्मा हा घर असतो. घर हे राष्ट्राच्या सामूहिक जीवनाचे अंतिम एककदेखील असते. राष्ट्रधर्माप्रति कर्तव्यनिष्ठ असणारे मातृत्वच देशाचा भावी राष्ट्रवादी, धर्मद्रष्टा, समाजसुधारक, विचारवंत महापुरुष घडवते. या भावनेचे जागरण विश्व मांगल्यसभा व्रतस्थ भूमिकेतून घरोघरी जाऊन करत आहेत. प्रत्येक घराला एक प्रगल्भ, चिंतनशील व सुसंस्कारी मातृत्व प्राप्त व्हावे व प्रत्येक घरातून सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी तेजस्वी संतान निर्माण व्हावी या प्रेरणेने दि. १९ जानेवारी २०१० साली विश्वमांगल्य सभा या संघटनेची स्थापना सुर्जी अंजनगाव (अमरावती जिल्हा) स्थित श्रीदेवनाथ पीठाधिश्वर परमपूज्य आचार्य श्रीजितेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे झाली. संस्थेला प्रशांत हरताळकर यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. वृषाली जोशी या संघटनेच्या अखिल भारतीय संघटन प्रमुख आहेत. रेखादेवी खंडेलवाल (अकोला) संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वी मुंबई प्रांतात या संस्थेची वाटचाल सुरू झाली आहे. नलिनीताई सुरेश हावरे या कोकण प्रांत अध्यक्ष आहेत. डॉ. दीपाली धनंजय देशमुख (आयुर्वेद) या ‘विश्व मांगल्य सभे’च्या कोकण प्रांत संयोजिका आहेत. त्याचबरोबर त्या संघटनेच्या बाल संस्कार सभेच्या अखिल भारतीय प्रमुखसुद्धा आहेत.राष्ट्रसेवेचा ध्यास घेऊन (विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या, कुटुंब आणि करिअरचा मोह आवरून) तेरा संपूर्णवेळ प्रचारिका देशातल्या २१ प्रांतांत संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी सदैव प्रवासात असतात. आज देशाच्या विविध प्रांतातल्या एका लाखांहून अधिक महिला संस्थेशी जोडलेल्या आहेत. दीड हजारांहून अधिक महिला संस्थेच्या दायित्व धारी कार्यकर्ता आहेत. महिला सदाचार सभा, छात्र सभा आणि बाल संस्कार सभा हे ‘विश्व मांगल्य सभे’चे प्रमुख आयाम आहेत. याव्यतिरिक्त संस्थेतर्फे विविध सेवाकार्य, धर्म शिक्षा वर्ग, भारतीय संस्कृती महोत्सव, संस्कृती ज्ञान सभा असे उपक्रम हाती घेण्यात येतात.
लक्षवेधी कार्यक्रम
काही वर्षांपूर्वी नागपूर येथे अखिल भारतीय मातृशक्ती संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात जवळपास एक लाख महिलांनी भाग घेतला होता. संत, आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले होते. तत्कालीन लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनीसुद्धा या संमेलनात संबोधन केले होते. या फेब्रुवारीत नवी मुंबई येथे भारतातील प्रथम महिलांच्या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धर्मातील सगळ्या समाजातून या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी कर्णावती (गुजरात, अहमदाबाद) येथे संस्थेच्या संमेलनाला गुजरातच्या राज्यपालांनी संबोधित करताना, मातृशक्तीचा जागर केला. माता ही परमात्म्याचे एक रूप आहे. ती सामर्थ्यवान, शक्तिस्वरुप आणि करुणामय आहे. वेळोवेळी ‘विश्व मांगल्य सभा’ विविध लोकप्रतिनिधींनासुद्धा आपल्या कार्यात सहभागी करते. मागच्या वर्षी दिल्लीमध्ये महिला खासदार, आणि खासदारांच्या धर्मपत्नी यांना एकत्रित करून मातृशक्तीचा जागर केला गेला होता. येत्या काळात मुंबईमध्ये पण असा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. नुकत्याच नवी दिल्लीत आयोजित केलेल्या मातृचिंतन कार्यशाळेत कांचनताई नितीनजी गडकरी यांनी मार्गदर्शन करताना एक संस्कारी माताच श्रेष्ठ राष्ट्रभक्ताचे निर्माण करते हा संदेश दिला.
आंतरराष्ट्रीय कार्यविस्तार
‘विश्व मांगल्य सभा’ ही देशातील हिंदू धर्मातील विविध स्तरांतील महिलांसाठी कार्यरत तर आहेच, पण त्याचबरोबर विविध देशांतील भारतीय कुटुंबातील मातांना आणि बालकांना एकत्रित करून देव आणि धर्माचे संस्कार रुजविण्याचेसुद्धा कार्य करते. स्वित्झर्लंड, बेल्झियम, जर्मनी, कॅनडा, इंग्लंड, नेदरलॅण्ड, स्वीडन, अमेरिका, सिंगापूर, इजिप्त, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती अशा अनेक देशांतील सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने एकत्रित करून महिलांच्या सदाचार सभा आणि बाल संस्कार वर्ग नियमितरित्या घेतले जातात. कोरोना काळात आभासी पद्धतीचा पुरेपूर वापर करून संस्थेचे कार्यक्रम सुरू होते. गीता जयंतीला बालकांकडून गीतेचे श्लोकपठण करण्यात आले. ग्रीष्म शिबिरामध्ये संस्कृती आणि संस्कार रुजविण्याचे कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांची विस्तृत माहिती गडप्रेमी मोरे यांच्याकडून देण्यात आली. या सगळ्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. संस्थेकडून मागील वर्षांपासून ‘विश्व मांगल्य संवादिनी’ त्रैमासिक प्रकाशित करण्यात येते. भारतीय इतिहास, संस्कृती, परंपरा व त्यामागील तात्त्विक तसेच वैज्ञानिक विचार या बाबींचा समावेश यात व्हावा, असा यामागचा मानस आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले आहे, ‘देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि आपण त्या देशाचे (मातृभूमी चे) देणे लागतो,’ या भावनेतून दीपाली देशमुख आपले कुटुंब, वैद्यकीय व्यवसायाचा ताळमेळ घालून संस्थेचे कार्य कोकण प्रांतात रुजविण्यासाठी अग्रेषित आहे. त्याआधी त्यांनी नागपूर जवळ असलेल्या देवलापार या ठिकाणी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘गोविज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
विविध संस्कृतींनी नटलेल्या मुंबई भागात संस्थेचे काम रुजवून पुढे नेण्याचा त्यांचा प्रवास सुरू आहे. शहरातील विविध वस्त्यांमध्ये, उदाहरणार्थ संघर्ष नगर चांदिवली येथे महिलांचे एकत्रीकरण करून त्यांना देश, धर्म आणि कर्तव्य याची जाणीव करून देणे, विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रम घेणे, असे कार्यक्रम राबविले जात आहेत.
‘एमएमआर’ भागात ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई संस्थेचे कार्य सुंदर पद्धतीने रुजलेले आहे. शहरातील इतर मध्य आणि पश्चिम उपनगरातसुद्धा याचा विस्तार करण्याचे प्रयोजन आहे.
राष्ट्राला समर्पित असलेले हे कार्य आदी शक्तीच्या आशीर्वादाने अविरत घडत राहो, ही शुभेच्छा...!
तू विश्वाची रचिली माया,
तू शीतल छायेची काया...
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई,
तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती...
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई,
संघटनेची अधिक माहिती हवी असल्यास वैयक्तिक निरोप पाठवू शकता.
विश्व मांगल्य बालसभचे माध्यमातून छान पद्धतीने मुलांना बरेच काही शिकवले जाते. श्रीमद्भगवद्गीता, मनाचे श्लोक, रामरक्षा, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र यांसारख्या श्लोकांचे माहिती मुलांना मिळाली. आपली भाषा, संस्कृती यांच्या संवर्धनाची माहिती मुलांना मिळाली. मुलांना त्यांच्या वक्तृत्व कलेला सादर करण्याची उत्तम संधी मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. या बालसभेच्या माध्यमातून मिळाली.
- स्वाती भिसे,कल्याण
‘विश्व मांगल्य सभा’ या संघटनेची सभासद संख्या वाढत आहे. समाजासाठी उपयुक्त कार्य करुन, समाजात काही अंशी चांगले बदल घडवतात. ‘विश्व मांगल्य’ सभासद तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन कार्य करत आहेत. मला ‘विश्व मांगल्य’ची सभासद झाल्याचा खूप आनंद झाला. ‘विश्व मांगल्य सभा’ हे झाड दिवसेंदिवस बहरो, ही ईश्वरचरणी प्रार्थना...!
- संगीता हेमंत ब्रह्मे, खारघर
- डॉ. दीपाली देशमुख