नाट्यक्षेत्रात ३९ वर्षांचा प्रवास करणारी ‘श्री कला संस्कार’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2022   
Total Views |
 

kala
 
 
... तो काळ होता १९८३ चा. मुलांना आपली कला सादर करता यावी याकरिता व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘श्री कला संस्कार, डोंबिवली’ या संस्थेची स्थापना झाली. गेली ३९ वर्षे ही संस्था नाट्यक्षेत्रात विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहे. संस्थेचे काम आजही कोणताही खंड न पाडता अविरतपणे सुरू आहे. जनसामान्यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या या संस्थेच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
 
 
श्रीकला संस्कार, डोंबिवली’ या संस्थेची स्थापना १९८३ साली झाली. ज्येष्ठ रंगकर्मी पांडुरंग झागरेकर, सुधाताई साठे, अशोक मेहेंदळे आणि दीपाली काळे यांनी एकत्र येऊन नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ‘श्री कला संस्कार’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला मुलांना केवळ नाट्यस्पर्धांना घेऊन जाणे एवढेच मर्यादित स्वरूप संस्थेचे होते. दीपाली काळे या राष्ट्रीय शिक्षण संस्थेत सुरुवातीच्या काळात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे शाळेतील मुलांना त्या अनेक स्पर्धेसाठी घेऊन जात असत. पण तीच संधी डोंबिवलीतील मुलांनाही मिळाली पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. डोंबिवलीतील मुलांना आपली कला सादर करता यावी, यासाठी त्यांनी संस्थेची स्थापना केली. त्याकाळात संपूर्ण मुंबईत दोन ते तीन बालनाट्य संस्था होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने सुधाताई करमरकर यांची बालरंगभूमी ‘लिटिल थिएटर’, सुलभा देशपांडे यांच्या ‘आविष्कार’ अशा संस्थांचा समावेश आहे. तसेच वैद्य यांच्या ‘कुमारकेंद्र कला’ या संस्थेनेदेखील गेली २५ वर्षे नाट्यक्षेत्रात मुलांना घडविण्याचे काम केले आहे. ‘कुमार केंद्र’सारख्या संस्था आज बंद आहेत. ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून आज ही कार्यशाळा सुरू आहेत. गेली ३९ वर्षे तग धरून कोणताही खंड पडू न देता ‘श्री कला संस्कार’चे काम मोठ्या जोमाने सुरू आहे. ‘श्री कला संस्कार’ संस्थेच्या स्थापनेच्या वेळी केवळ मुलांना बालनाट्य स्पर्धांना घेऊन जाणे एवढाचा उद्देश होता. मात्र, काळानुसार अनेक बदल संस्थेत घडवावे लागले. मुलांना प्रशिक्षण देण्याची गरज भासू लागली. प्रशिक्षणाची सोय नसल्याने मुले प्रशिक्षणासाठी डोंबिवली बाहेर जात होती. या गरजेतूनच ‘श्री कला संस्कार’ संस्थेने प्रशिक्षण शिबिराला सुरूवात केली. या प्रशिक्षण शिबिराला तज्ज्ञ येत असतात. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रशिक्षण शिबीर असते. या शिबिरात १०० हून अधिक मुले येत असतात. केवळ कोरोना काळात मुलांची संख्या कमी होती. कोरोना काळातही ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. संस्थेतर्फे बसविण्यात आलेल्या नाटकांचे सादरीकरण मोठ्या व्यासपीठावर केले जाते, हे या संस्थेच्या प्रशिक्षण वर्गाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. दरवर्षी ‘स्वामी विवेकानंद विद्यामंदिरा’त या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात संकेत ओक, मधुरा ओक आणि वृषांक कवठेकर मुलांना मार्गदर्शन करीत असतात. या संस्थेतून आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यामध्ये आघाडीच्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, संकेत ओक, वृषांक कवठेकर,विहंग भणगे, मिलिंद अधिकारी, तर ‘बॅकस्टेज’ला काम करणारे मयुरेश केळुस्कर, इंद्रजित मोरे असे अनेक दिग्गज घडले आहेत.
संस्थेतर्फे दरवर्षी ‘बालझुंबड’ हा ज्ञान आणि मनोरंजन यावर आधारित उपक्रम राबविला जातो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, असा या उपक्रमांमागे उद्देश. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर कार्यक्रम, नाट्यवाचन किंवा एखाद्या कार्टूनिस्टला बोलावून त्यांच्याकडून मुलांना कार्टून काढून दाखविले जाते.मोठ्यांची ‘दिवाळी पहाट’ आणि डोंबिवली यांचे एक अनोखे नाते आहे. फडके रोडवर मित्र-मैत्रिणी भेटतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. पण छोट्यांचे काय, असा विचार करून संस्थेने छोट्यांसाठी ‘दिवाळी पहाट’ सुरू केली. ‘दिवाळी पहाट’च्या दिवशी बच्चे कंपनी नटूनथटून येतात. मुलांनी मुलांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमांचा आनंद लुटतात. त्यानंतर त्यांना फराळ दिला जातो. ‘छोट्यांसाठी दिवाळी पहाट’ ही संकल्पना ‘श्री कला संस्कार’ने चार वर्षांपूर्वी अस्तित्वात आणली. या प्रकारची छोट्यांसाठी ‘दिवाळी पहाट’ साजरी करणारी ‘श्री कला संस्कार’ ही पहिलीच संस्था असल्याचे दीपाली काळे सांगतात. कला आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलांना संस्थेतर्फे ‘कलाश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. विविध गुणदर्शन स्पर्धा संस्थेतर्फे घेतली जाते. संस्थेतर्फे मुले ओडिशा, जमशेदपूर, देहरादून, शिमला, वाराणसी, दिल्ली या अनेक ठिकाणी महोत्सवात सहभागी होत असतात.
तसेच दिल्ली येथे महामंडळातर्फे गणेशोत्सवात नृत्याचे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील अनेक अकादमीतील मुली एकत्र येत असतात. या कार्यक्रमासाठी ‘श्री कला संस्कार’च्या बॅनरखाली अनेक मुली दिल्लीला जाऊन आपली कला सादर करतात. शिवाय पारितोषिकेदेखील पटकवितात. कोरोना काळातही संस्थेने ‘अ‍ॅक्टिव्हिटीज्’मध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. स्पर्धकांकडूनही स्पर्धांना चांगला ‘रिस्पॉन्स’ मिळाला. बालनाट्य लेखन स्पर्धा शिक्षक आणि इच्छुकांसाठी घेतली जाते. त्यामुळे संस्थेला नाटक बसविण्यासाठी लागणारी संहिता मिळते. या स्पर्धेतून जी संहिता चांगली वाटते, तिच्यावर नाटक बसविले जाते. नाट्य वैयक्तिक अभिनय आणि सुगम संगीत अशा विविध स्पर्धा ‘लॉकडाऊन’मध्ये घेतल्या होत्या. या स्पर्धा ऑनलाईन असल्याने त्याला अगदी अमेरिकेपासून प्रतिसाद आला होता. तसेच याशिवाय संस्थेतर्फे विविध गुणदर्शन स्पर्धा, कथाकथन, नाट्यवाचन, सुगम संगीत स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. ‘श्री कला संस्कार’ने सामाजिक बांधिलकीही जपण्याचा प्रयत्न केला आहे. ‘काका धीट मुलं सुपरहिट’ या नाटकाचे शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे काही दौरे त्यांनी केले. याशिवाय जांभूळपाडा येथेही नाटक सादरीकरण केले होते. रत्नाकर मतकरी यांच्या ‘अदृश्य माणूस’चे थोडाफार प्रयोग केले. हे प्रयोग दादर येथील ‘छबिलदास’ येथे झाले. ‘श्री कला संस्कार’मध्ये आता दुसरी पिढी घडत आहे. ज्या मुलांनी नाटकाचे धडे या संस्थेतून गिरवले आहेत, आता त्यांची मुले या संस्थेत येऊन नाटकाचे प्रशिक्षण घेत आहे. या संस्थेत रामाधर वाजपेयी, राम मुंगी, योगेश सोमण, अद्वैत दादरकर, सजीव वढावकर, प्रसाद गोखले, संकेत ओक, राजा मयेकर आदींनी संस्थेत येऊन मुलांना नाट्य प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी संस्थेला भेट देऊन मुलांना मार्गदर्शनदेखील केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्मिता तळवलकर, सुलेखा तळवलकर, अविनाश आणि ऐश्वर्या नारकर, शन्ना, व. पु. काळे, सुहास जोशी, रिमा लागू यांनी संस्थेला भेट दिली आहे. संस्थेतर्फे एक कथाकथनाचा कार्यक्रम करण्यात आला होता त्या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाला व. पु. काळे आले होते.संस्थेला या सगळ्या कामात अनेकांचे सहकार्य लाभले आहे. श्रीपाद दाते, ज्योती दाते, आशा वेलणकर, प्रसिद्ध नाटककार आनंद म्हसेवेकर, प्रवीण दुधे, मनोज मेहता, माधव जोशी यांची लक्ष्मीनारायण संस्था, राष्ट्रीय शिक्षण संस्था, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@