‘समाप्तवादी पार्टी’ची वाताहत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2022   
Total Views |

uttarpradesh
 
उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या २७ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यापैकी भाजपने २४ जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर एका जागी जनतांत्रिक लोकसत्ता दल आणि दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. दरम्यान, विधान परिषदेच्या एकूण १०० पैकी ३६ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या ३६ पैकी नऊ ठिकाणी याआधीच भाजपने बिनविरोध विजय प्राप्त केला होता. त्यामुळे परिषदेच्या ३६ पैकी ३३ जागांवर भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपला नामोहरम करण्याच्या वल्गना करणार्‍या समाजवादी पक्षाला मात्र भोपळाही फोडता आला नाही. या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक यशामुळे भाजपने नवा इतिहास रचला आहे. भाजपने प्रथमच विधान परिषदेत दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले असून, तब्बल ४० वर्षांनंतर प्रथमच एखाद्या पक्षाला उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेत बहुमत मिळाले आहे. उत्तर प्रदेशात विधान परिषेदच्या एकूण १०० जागा आहेत. निकालानंतर आता भाजपचे संख्याबळ ६७ झाले असून जे बहुमतापेक्षाही १६ ने अधिक आहे. सध्या सभागृहात सपाचे १७, बसपा चार, काँग्रेस, अपना दल, निषाद पार्टीचा प्रत्येकी एक, पाच अपक्ष आणि दोन शिक्षक आमदार आहेत. तसेच, दोन जागा रिक्त आहेत. भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही आपला दबदबा कायम ठेवत सलग दुसर्‍यांदा बहुमताने आपले सरकार स्थापन केले. पाच वेळा गोरखपूरचे लोकसभेचे खासदार राहिलेल्या योगी आदित्यनाथ यांची २०१७ साली भाजपने मुख्यमंत्रिपदी अनपेक्षितपणे निवड केली आणि सर्वांनाच धक्का दिला आणि तिथूनच खर्‍या अर्थाने मोदी आणि योगींच्या जोडीची कमाल सुरू झाली. योगी ते बुलडोझर बाबापर्यंतच्या प्रवासाला जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला आणि योगी दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पार्टीचा प्रवास १० मार्चनंतर ‘समाप्तवादी पार्टी’ असा सुरू होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता खरोखरच विधानसभा आणि आता विधान परिषदेच्या निकालांवरून त्याची प्रचितीदेखील येते. योगींचा जलवा कायम असला तरीही हा विजय अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. आता अनेक महत्त्वपूर्ण विधेयके सहज मंजूर करता येतील. तसेच, येत्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही याचा भाजपला फायदा होऊ शकतो.
 
 
सेक्युलरवाद्यांची जळकट मशाल
 
नुकताच श्रीराम नवमीचा उत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध राज्यांमध्ये श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्राही काढण्यात आल्या. मात्र, हिंदूंच्या या उत्सवादरम्यान अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये शोभायात्रेवर तुफान दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात पोलीस अधीक्षक आणि काही पोलिसांसह २४ हून अधिक जण जखमी झाले. गुजरातमध्ये आणंद जिल्ह्यातील खंभात येथे हिंसाचार आणि दगडफेक झाली. साबरकंठा जिल्ह्यातील हिंमतनगरमध्येही हिंसाचारामुळे ‘कलम १४४’ लागू करण्यात आले. झारखंडमधील हिर्‍ही गावाजवळ श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळून आला. यात एक जणाचा मृत्यू, तर १२ हून अधिक जण जखमी झाले. यावेळी दहा दुचाकी आणि एक पिकअप व्हॅनदेखील जाळण्यात आली. महाराष्ट्रातील मालवणी, मालेगाव याबरोबरच गोव्यातील वास्को, पश्चिम बंगालमधील बांकुरामध्ये हिंसाचार उफाळला. हिंदूचा पवित्र श्रीराम नवमी उत्सव साजरा करताना जाणीवपूर्वक घडवून आणला जाणारा हिंसाचार चिंतेची बाब आहे. मात्र, उदारमतवादाचे गळे काढणार्‍या काही तथाकथित विचारवंतांना मात्र, यातही हिंदूंनाच दोषी धरणे आवश्यक वाटते. सगळं काही सत्य समोर असतानाही आपली सेक्युलरवादाची जळकट, कळकट आणि मळकट मशाल उगाच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी घेऊन फिरायची हौस मात्र, काही केल्या फिटता फिटत नाही. त्यात कळस म्हणजे, एका मीडिया हाऊसच्या महाशयांनी तर अजब तर्क लावला. “अनेक अहवाल आणि व्हिडिओ सूचित करतात की, हिंसाचाराच्या या ताज्या लाटेचा एक सततचा ‘ट्रिगर’ म्हणजे श्रीराम नवमीच्या मिरवणुका मुस्लीम भागातून जात असताना प्रक्षोभक संगीत वाजवणे किंवा घोषणा देणे” आणि तरीही ’संघर्ष’ अशा आशयाचे हे ट्विट या तथाकथित महाशयांनी केले. त्यामुळे पुन्हा नवा वाद उभा ठाकला आहे. मुस्लीम भाग म्हणजे नेमका काय असतो, तिथून जायला हिंदूंनी नियम का पाळावे आणि भारताच्या भूमीत हिंदूंनी घाबरून का राहावे, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात. केवळ मुस्लीम भाग आहे, म्हणून तिथूनच मिरवणुका काढल्या जातात, हा तर्क अर्थहीन म्हणावा लागेल. उद्या हिंदू समाजही हिंदू भागातून मिरवणुका काढू नये म्हणतील. मग ही लिबरल गँग पुन्हा बोंबाबोंब करायला मोकळीच.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@