‘स्लाव्ह मित्र मंडळ’ची २०१० साली स्थापना झाली. अजय मुरूडकर,अदिश देसाई, आनंद पंडित, मंदार मिराशी, संचनि नेमाने, योगी चव्हाण हे या संस्थेचे सदस्य. सात सदस्यांनी ‘स्लाव्ह मित्र मंडळा’च्या माध्यमातून हिंदू संस्कृती परदेशात जागृत राखली आहे. त्याविषयी...
‘हॅप्पी न्यू इअर आजोबा’ असे म्हणत आरव दोन दिवसांपूर्वीच भारतातून इंग्लंडमधल्या स्लाव्हला आलेल्या त्याच्या लाडक्या आजोबांच्या गळ्यात पडला. त्याच्या बाबांनी कालच त्याला गुढीपाडव्याची गोष्ट सांगितली होती. त्यामुळेच त्याला आपलं मराठी ‘न्यू इअर’ इथल्या इंग्लंडमधल्या ‘न्यू इअर’पेक्षा कसं वेगळं असतं याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. आईच्या मदतीने मग आजोबा आणि बाबांनी गुढी उभारून पूजा केली. गुढीला पाहून बाबा, why we are whispering scarecrow? आरवचा प्रश्न आला आणि सगळेच एकदम दचकले. आजोबा काही बोलणार तेवढ्यात मागून “काय काका येताय का शोभायात्रेला?” असा शेजारच्या मंदारचा आवाज आला. मंदारने मग ‘स्लाव्ह मित्र मंडळ’(डचच) आणि ते साजरा करत असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची माहिती दिली.
आपल्या रूढी आणि परंपरा स्थानिक पातळीवर इथल्या भारतीयांमध्ये रुजत ठेवण्याचं काम गेली १२ वर्ष ‘स्लाव्ह मित्र मंडळ’ अव्याहतपणे करत आहे. भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून ‘इंडियन कल्चरल रोड शो’ दरवर्षी आयोजित केला जातो. गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे रद्द केलेल्या शोभायात्रेला या वर्षी नव्या जोमाने स्थानिकांनी प्रतिसाद दिला. तीन वर्षांच्या लहानग्यांपासून अगदी ६५ वर्षांचे आजीआजोबा असा जवळपास २५० हून अधिक जमाव पारंपरिक पोशाख करून मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाला होता. कुणाची नऊवारी साडी, नाकातली नथ, कुणी नेसलेले धोतर, सुरवार, डोक्यावर वेगवेगळे फेटे, पगड्या हे असं रंगीबेरंगी वातावरण बघून आरव चकितच झाला.२५ जणांच्या ढोल-ताशांच्या पथकाच्या आवाजाने सगळाच रस्ता दुमदुमला होता. ’भारतमाता की जय’च्या घोषणा घुमत होत्या. ते बघून आरवसुद्धा त्यांच्यात सामील झाला. एका लयीत वाजणारे ढोल, त्याच्या ठेक्यावर चालू असलेली लेझीमची कवायत, महिलांच्या फुगड्या, हातात सजवलेल्या गुढ्या, भगवे झेंडे, विजयपातका यांनी शोभायात्रा खूपच दिमाखदार झाली होती. जवळपास दोन तास चाललेल्या या मिरवणुकीनंतर ‘स्लाव्ह मित्र मंडळा’च्या कार्यकर्त्यांनी मग गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तामधलं मराठी सणांमधलं त्याच महत्त्व सांगितलं. शोभायात्रेचा शेवट स्थानिक मुलींनी केलेल्या सात पारंपरिक नृत्यांनी झाला. ‘स्लाव्ह मित्र मंडळा’ने दमलेल्या जमावासाठी उपाहार आणि चहाची सोय केली होती. परतताना सगळेजण शोभायात्रेमध्ये काढलेले भरपूर फोटो आपापल्या मित्रमंडळींना मोबाईलवर शेअर करत होते. आजोबा मात्र दोन्ही लहान हातांनी छोटी गुढी खूप काळजीने घेऊन जाणार्या पाठमोर्या आरवकडे बघत होते.
- सचिन नेमाने