भारत सरकारविरोधात जिहाद पुकारणे हा पृथ्वीवरील सगळ्या मुस्लिमांचा अधिकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2022   
Total Views |
 
Jihad
 
मुंबई: भारत सरकारविरोधात जिहाद पुकारणे हा पृथ्वीवरील तमाम मुस्लिमांचा अधिकार असून हिंदुत्व-ब्राह्मण वर्चस्ववादी फॅसिस्टांची बाजू घेणार्‍या ‘सूफी इस्लामिक बोर्डा’ला संपवले पाहिजे, असे पत्र ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (पीएफआय) पाठवले आहे. ‘सूफी इस्लामिक बोर्डा’नेच ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ने ‘पीएफआय’ला पाठवलेले एक पत्र उजेडात आणले आहे. विशेष म्हणजे, ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ कुख्यात दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’चाच एक गट असून त्याचा म्होरक्या सौदी अरेबियातून पळून गेलेला आणि युनायटेड किंग्डममध्ये आश्रय घेतलेला मोहम्मद अल-मसारी आहे. मात्र, यातून ‘पीएफआय’चे जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांशी असलेले लागेबांधे समोर येतात.
 
दरम्यान, ‘सूफी इस्लामिक बोर्ड’ सातत्याने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा बुरखा फाडण्याचे काम करत आहे. मात्र, त्यावरुनच आता ‘पीएफआय’ने थेट ‘सूफी इस्लामिक बोर्डा’ला संपवण्याची धमकी दिली आहे. ‘सूफी इस्लामिक बोर्डा’नेच आपल्या ट्विटर खात्यावरुन सामायिक केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून ‘पीएफआय’च्या या धोकादायक मनसुब्यांचा खुलासा केला आहे.
‘सूफी इस्लामिक बोर्डा’ने आपल्या पत्रकात म्हटले की, दि. 7 एप्रिल रोजी रात्री 11.15 वाजता आम्हाला आमच्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक ट्विट मिळाले. त्यात, मुस्लीम अर्थात ‘हिजाब’वाल्या शालेय मुस्लीम मुली आणि ‘पीएफआय’ आदींविरोधात हिंदुत्व-ब्राह्मण वर्चस्ववादी ‘फॅसिस्टां’ची बाजू घेणार्‍या ‘सूफी इस्लामिक बोर्डा’ने आपण ‘मुनाफीक-काफीर’ असल्याचेच दाखवून दिले, असे म्हटलेले आहे.
 
दरम्यान, या ट्विटसोबतच इतरही अनेक ट्विट्सना टॅग करण्यात आले होते. टॅग केलेल्या ट्विट्सपैकी एका ट्विटमध्ये ‘लेटर टू द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या शीर्षकाने जोडलेले एक पत्र होते. ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ने सदरचे पत्र ‘पीएफआय’ला लिहिलेले आहे. त्यात, आगामी गृहयुद्धात निर्बंधांचे उल्लंघन करत क्रांतिकारी सैन्याच्या रुपात पुन्हा संघटित व्हा, असे लिहिलेले आहे. तसेच ‘सूफी इस्लामिक बोर्ड’ भारतीय मुस्लिमांचे रक्षण करत नसेल, तर त्यांनाही ‘काफीर’ समजून त्यांना सैनिकी कारवाईने संपवले पाहिजे, असे आवाहनही केलेले आहे.
 
दरम्यान, ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ने ‘पीएफआय’ला लिहिलेल्या पत्रात भारताविरोधात मुस्लिमांनी जिहाद पुकारावा, असेही म्हटले आहे. भारत सरकारविरोधात जिहाद करणे हा पृथ्वीवरील सगळ्या मुस्लिमांचा अधिकार असून ‘पीएफआय’च्या माध्यमातून भारतीय मुस्लिमांची एकजूट होत असल्याचे पाहणे सकारात्मक बाब आहे. अशाचप्रकारे भारतीय मुस्लिमांना मुस्लिमांच्या उत्पीडनात सहभागी भारत सरकारच्या अधिकार्‍यांबरोबरच सैनिक आणि पोलीस अधिकार्‍यांविरोधात विद्रोह, तोडफोड आणि हेरगिरी करण्याचा इस्लामी पद्धतीने वैध अधिकार आहे, असेही या पत्रात लिहिलेले आहे.
पुढे सरकारविरोधी, भारतविरोधी आणि हिंदूविरोधाचा पुनरुच्चार करत ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ने ‘पीएफआय’ला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आधीपासूनच ‘सूफी इस्लामिक बोर्डा’ने (शौकत अली) मुस्लिमांना कट्टरपंथी करण्यावरून ‘पीएफआय’वर टीका केलेली आहे. ही ‘फॅसिस्ट’वादी भाजप/रा. स्व. संघाची हिंदुत्व/ब्राह्मण वर्चस्ववादी धोरणे आहेत, त्या माध्यमातून ते मुस्लिमांमध्ये फूट पाडत आहेत. जर ‘सूफी इस्लामिक बोर्डा’सारखे गट भारतीय मुस्लिमांचा छळ आणि संभावित नरसंहारातून बचाव करण्याच्या योजनेत सहभागी होत नसतील, तर त्यांना (शौकत अली, सुफी इस्लामिक बोर्ड) मुनाफीक/काफिरांप्रमाणे संपवले पाहिजे.”
 
दरम्यान, कुराणातील काही आयतींचा उल्लेखही ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्युएल’ने ‘पीएफआय’ला पाठवलेल्या आपल्या पत्रात केला आहे. युद्धाला तोंड फुटले आणि ते (सूफी इस्लामिक बोर्डासारख्या संस्था वा लोक) इस्लाम व मुस्लिमांच्या शत्रूंना लष्करी वा प्रचारकी मदत करत असतील, तर त्यांच्याशी मुस्लिमांना त्रास देणार्‍या हर्बी/मुनाफिक काफिरांच्या सैनिकांप्रमाणे वागले पाहिजे. तसेच, आपल्याला विजय मिळवायचा असेल तर घरातली (म्हणजेच मुस्लिमांतल्याच सुफी इस्लामिक बोर्डसारख्यांची) साफसफाई करावी लागेल.
 
पुढे ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्युएल’ने, फॅसिस्टवादी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या राजवटीने भारतीय मुस्लिमांवर अत्याचार करुन मुस्लिमांच्या सुरक्षेचे वचन मोडले आहे, जे खेदजनक आहे. त्यातूनच भारत सरकार आणि भारतातील मुस्लिमांदरम्यान सध्याच्या घडला युद्धाची स्थिती असल्याचे दिसते, असे लिहिलेले आहे.
दरम्यान, ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्युएल’ ‘पीएफआय’ला वरील सल्ले केवळ अल्लाहच्या अनुमतीने भारतीय मुस्लिमांच्या विजयात तुम्ही नेतृत्व करण्यात मदत कराल, या आशेने देत आहोत, असेही लिहिलेले आहे.
दरम्यान, या पत्रातून ‘पीएफआय’च्या जिहादी विचारसरणीला अनुसरून काम न करणार्‍या आपणांस जीवानिशी मारण्याची धमकी दिल्याचे ‘सूफी इस्लामिक बोर्डा’चे म्हणणे आहे.

‘पीएफआय’चाही ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’शी संबंध
 
‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएनल’ने ‘पीएफआय’ला लिहिलेले पत्र आमच्या ट्विटर खात्यावरुन सामायिक केले व त्यात ‘पीएफआय’च्या अधिकृत खात्यांना ‘टॅग’ही केले. आम्ही ‘पार्टी ऑफ रिन्यूएल’चे पत्र सामायिक करुन अनेक दिवस झाले तरी ‘पीएफआय’च्या कोणत्याही नेत्याने, शाखेने ते पत्र नाकारलेले नाही, ही मोठी घटना आहे. ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’ने ‘पीएफआय’च्या बाजूने त्या पत्रात लिहिलेले आहे. ‘पार्टी ऑफ रिन्यूएल’चे ‘अल-कायदा’बरोबरचे संबंध पाहता ‘पीएफआय’ने सदरचे पत्र नाकारायला हवे होते, पण तसे झालेले नाही. हा धक्कादायक प्रकार असून त्यातूनच ‘पीएफआय’चा ‘पार्टी ऑफ इस्लामिक रिन्यूएल’शी संबंध असल्याचे सिद्ध होते.
- मन्सूर खान, संस्थापक/अध्यक्ष, सूफी इस्लामिक बोर्ड
@@AUTHORINFO_V1@@