मुंबईः राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर जोपर्यंत अंतिम कारवाई होत नाही, तोपर्यंत झुकणार नाही, मागे हटणार नाही, असा निर्धार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी व्यक्त केला.
सोमय्या यांनी मंगळवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपली एक चित्रफीत जारी केली. यात ते म्हणाले की, “२०१३मध्ये त्यावेळच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेला भंगारात ६० कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. भाजपने या निर्णयाचा निषेध केला. १० डिसेंबर, २०१३ रोजी ‘सेव्ह विक्रांत’साठी निधी संकलनाचा कार्यक्रम केला. फक्त हा एकच कार्यक्रम केला होता, यात ११ हजार रुपये जमा झाले.
आता १० वर्षांनंतर शिवसेना नेता संजय राऊत म्हणताहेत की, किरीट सोमय्यांनी ५८ कोटींची घोटाळा केला. चार बिल्डरच्या मदतीने ‘मनी लॉण्ड्रिंग’ करुन आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवले. पण, याआधीही संजय राऊत यांनी सात आरोप केले, एका आरोपाचा पुरावा नाही, मुंबई पोलिासंकडे एक कागद नाही,” असे ते म्हणाले.